Ad

Saturday, 26 February 2022

तू आणि मी..

तू आणि मी....

तू गूळ मी डोंगळा
तू पाला मी मुळा
तू बटाटा मी कांदा
तू नोट मी रुपया बंदा

तू बनारसी पान
मी नशीला गुटखा
तू तर लवंगी माळ
अन मी दादा फटाका

तू नाजूक स्कुटी
मी बुलेटचा दणका
तू हलकी कुजबुज
मी गोंगाट गलका

तू घडीचा कागद
मी चुरगळलेला बोळा
तू गोड पुरणपोळी
मी  कणकेचा गोळा

तो गोल गोड जिलेबी
मी एक मठ्ठ मठ्ठा
तू एक कवितेचे पान
मी तर रद्दीचा गठ्ठा

तू रसदार मलई
मी ताकाची कढी
तू काजूकतली नाजूक
मी खोबऱ्याची वडी

तू  भारी आयफोन 
मी भंगार नोकिया
तू करलॉनची गादी
मी गावठी तकीया

तू नाजूक तीळ
मी फक्त चामखीळ
तू उंच उंच पतंग
मी फक्त ढील...

तू नाजूक फुलवात
मी पेटता पलीता
तू अलिबागची सुपारी
मी रत्नांग्रीचा अडकित्ता

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday, 21 February 2022

प्रिय कुकु

प्रिय कुकु...

हो मी तुला कुकुच म्हणायची...ते कुक्कुटराज वगैरे आपले कडकनाथ आजोबा म्हणायचे तुला ...त्यांचा तू लाडकाच होतास ना रे...का नाही असणार .!.तू होतासच तसा... अगदी राजबिंडा..तुझी रंगीत पिसं.. डोक्यावरचा लाल भडक तुरा..तुझ्या पायासारखे पाय अख्ख्या पोल्ट्रीफार्म मध्ये नव्हते कोणाचे..मक्याच्या दाण्याच्या रंगाचे तुझे पाय आणि ती हस्तिदंती नखे   अहाहा...!! आणि तुझी चाल तर एखाद्या सैनिकासारखी...
    पण कुकु, मी भाळले ते तुझ्या स्वभावावर..तू इतर कोंबड्यांसारखा लोचट नव्हतास..दिसली कोंबडी की धर फेर तिच्याभोवती... अस नव्हतं तुझं ...तू वेगळाच होतास... कितीजणी तुझ्या रंगरूपावर भाळून तुझ्या मागे पुढे करायच्या...पण नाही ..........तुझा जीव या झिरमीत अडकलेला...हे झिरमी नाव आपल्या कडकनाथ आजोबांनीच दिलेलं बरं.. मी एका जागी बसून झोपा काढते म्हणे ...हो मी असते एका जागी बसून , मला नाही आवडत इतर कोंबड्यां सारख इथ तिथं चोंबडेगिरी करायला..त्यापेक्षा एका जागी बसून तुझ्याकडे बघत रहाणे किती सुखद..मी अस तुझ्याकडे पहात राहिले की आजूबाजूचं कुक्कुटविश्व अदृश्य व्हायचे... मी तुझ्यात आणि तू माझ्यात हरवून जायचो..तुझ्या उबदार पंखाखाली मी अगदी धुंद व्हायची...ते भारलेले क्षण कधीच विसरू शकत नाही मी..किती वेगळा होतास रे तू..तू बंडखोर होतास..प्रत्येक कोंबड्याने पहाटेच आरवल पाहिजे असा सगळ्या कुक्कुटविश्वाचा नियम तू धुडकावून लावायचास... रात्री अपरात्री केव्हाही मनसोक्त आरोळी ठोकायचा तुझा स्वतंत्र बाणा.. मला आवडत होता तरी जगाला असले बंडखोर आवडत नसतात कुकु..परंपरेच्या सुरक्षित चौकटीत रमतात सगळे रे कुकु ...माणूस काय आणि आपण काय... सगळे एका माळेचे मणी...रात्री अपरात्री आरवतो म्हणून तुला अपशकुनी ठरवलं रे मालकांनी...आणि एक दिवस.....
     कुकु , आठवतो तो रे दिवस...व्हॅलेंटाईन डे होता तो..तू माझ्यासाठी तुझंच एक सप्तरंगी पीस माझ्या पंखात माळलं होतस ..अगदी पहाटे...पहाटे...
   ....  म्हणाला होतास...झिरमे माझं काही खरं नाही..बंडखोरी म्हणजे सुळावरची पोळी...आज असेन तर उद्या नसेन...कदाचित आजच्या सुर्योदयालाच... तुला आठवत कुकु?... मी तुला बोलू दिलं नव्हतं..अभावितपणे माझी चोच तुझ्या चोचीवर इश्श .....किती लाजले होते मी तेव्हा आणि तुही म्हणाला होतास झिरमे लाजलीस की तू छान दिसतेस... पिसापिसांत माझ्या रंग भरले होते तेव्हा....
          आयुष्यातल ते पहिले चुंबन होतं कुकु...तेही व्हॅलेंटाईन डे ला ..दोन प्रेमी जीवांना आणखी काय हवं कुकु..??
    पण कुकु , सुखं थोडी दुःख भारी दुनिया ही भली बुरी हेच खरं..तुझ्या बंडखोरीची शिक्षा तुला त्याच दिवशी मिळावी ना...जाताना पण किती शांतपणे गेलास तू.. न कसली धडपड ना कसली तडफड...कुक्कुटविश्वातला व्हॅलेंटाईनच तू ...ज्या सकाळी तू गेलास त्या सकाळी क्षितिजाने जणू तुझे रंग चोरले होते... माझा कुकु जणू आभाळात सामावून गेला होता ..
आणि नेमके त्याच दिवशी पहाट वाऱ्याने तुझे एक रंगीत पीस उडत उडत माझ्यापाशी  आले आणि जणू सांगून गेले " झिरमे मी पोहोचलो बरं का"...
     तुझे ते पीस पंखाखाली घेऊन दिवस काढते आहे कुकु...आता कधी तरी रात्री अपरात्री तुझ्या आरवण्याचे भास होतात...मी दचकून उठते...बस्स तुझी जागा रिकामी असते..

तुझीच...

झिरमी

©प्रशांत शशिकांत शेलटकर
   रत्नागिरी

😊😊😊😊

Thursday, 17 February 2022

वाचाल तर वाचाल?

@परशा.कॉम

वाचाल तर वाचाल???

थोर लोकांनी  स्वतः लिहिलेली पुस्तक वाचावीत. इतरांनी त्यांचे विषयी लिहिलेली पुस्तक वाचताना डोळ्यात तेल घालून आणि मेंदू ताळ्यावर ठेवून वाचावीत.. शेवटी इतरांचे लेखन म्हणजे त्यांचे त्या थोर माणसा विषयीचे आकलन असते . बहुतेक वेळी प्रभावी लेखनशैली ,आपल्या मनात असलेले पूर्वग्रह यामुळे त्या लेखकाच्या विचाराने प्रभावात जाण्याची शक्यता असते.
     धार्मिक ग्रंथ सोडले तर इतर ग्रंथ ही श्रद्धेने वाचायची गोष्टच नव्हे.तटस्थपणे वाचणे, ऐकणे,बोलणे ही कला आहे ती साध्य होण्यासाठी साधना करावी लागते.
      अनुवाद वाचताना तर फार दक्षता घ्यावी लागते ..दर्जेदार अनुवादक दुर्मिळ असतात. जे अनुवादा विषयी तेच प्राचीन भाषेविषयी उदा. संस्कृत.
      हजारो वर्ष अस्तित्वात असलेल्या या भाषेतील एखाद्या शब्दाचा प्राचीन अर्थ आणि वर्तमानातील अर्थ यामध्ये खूप तफावत असते ,उदाहरण म्हणजे धेनु या शब्दाचा प्राचीन अर्थ यज्ञवेदी असा आहे आत्ताचा अर्थ गाय असा आहे...
अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी.......
या श्लोकात पंचकन्या की पंचकंना या बद्दल वाद चालू आहे काहींचे म्हणणे असे आहे की या सर्व विवाहित आहेत मग त्याना कन्या का म्हणायचे? त्या पाचजणी आहेत म्हणून मूळ शब्द पंचक असा आहे..असाही एक मतप्रवाह आहे . अहल्या हा शब्द अहिल्या असा वापरला जातो तो अहल्या असा आहे . हल म्हणजे नांगर ...न नांगरलेल्या भूमीला अहल्या म्हणतात.. प्राचीन भाषेविषयी असे कॉन्फ्लिक्ट होतातच . 
     एखादा लेखक आवडतो म्हणजे त्याचे लेखन आपल्याला आवडते . त्याचे लेखन आवडते म्हणजे तो आपल्या बौद्धिक गरजा पूर्ण करतो म्हणून त्याचे लेखन आपल्याला आवडते. 
     आता बौद्धिक गरज म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती परत्वे बदलते.एखादे पुस्तक वाचून आपले पूर्वग्रह कुरवाळले जातात की आपले लॉजिक धारदार होते या गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात..
    वाचन करावे , पण वैश्विक सत्य गवसल्याचा आव आणू नये बस्स इतकंच ...

     -प्रशांत शशिकांत शेलटकर
     8600583846

Saturday, 12 February 2022

मिठी

Hug day special..💓


मिठी


एक मिठी हवीच मज
थोडी घट्ट थोडी सैल
अलीकडे मी उभा कधीचा
कसा येऊ ग  पैल ?

एक मिठी हवीच मज
थोडी लाजरी थोडी धीट
आलिंगनाची गोडीच सखे
किती गोड नी किती अवीट

एक मिठी हवीच मज
श्वासांचाच व्हावा विनिमय
मिठीत येता एकमेकांच्या
परस्परांचा व्हावा विलय

एक मिठी हवीच मज
मिठीचीच त्या गझल व्हावी
किती हरकती लोभसवाण्या
तरी पुन्हा  ती समेवर यावी

एक मिठी हवीच मज..
सुटतानाही ओढ लागावी
सुटता सुटता तुझ्या ओठांवर
ओठांची माझ्या नक्षी असावी


प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...