सासूबाईंसाठी काहीटिप्स ...
1.नवीन सुने बद्दल घाई घाईने मत बनवू नका. खूप स्तुती आणि खूपच टीका अस करू नका. आधी तिचा अंदाज घ्या
2. सून घरात येताना खूप सारे पूर्वग्रह घेऊन येते सासू म्हणजे त्रास देणारीच असते असे पूर्वग्रह तिचे जवळचे नातेवाईक तिच्या मनात भरवत असतात, उलट्या बाजूने सासू म्हणूनही स्त्रिया वेगळाच विचार करतात आता ही आली म्हणजे माझ्या मूलावर ती हक्क गाजवणार , मला किचन मधून आणि मुलाच्या मनातून हद्दपार करणार वगैरे..तेव्हा दोन्ही बाजूनी पूर्वग्रह टाळा.
3.आपल्या सुनेविषयी इतरांना सांगत बसु नका. आणि इतरांचे काहिही ऐकू नका. तिचे गुण सांगताना चार चौघात सांगा पण काही चुकलं तर तिच्या पाठीवरून हात फिरवून एकांतात प्रेमाने सांगा.ओठांत एक आणि पोटात एक अस करू नका
4. शेजारी-पाजारी, आपली लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी यांना आपल्या कुटुंबात ढवळाढवळ करायला सांगू नका.. ठिणग्या तिकडेच पडतात. आपल्या सुनेला सर्वात जवळचे आपणच वाटलो पाहिजे आणि आपणही मुलीपेक्षा सुनेला जवळ केलं पाहिजे.कारण आपल्या म्हातारपणात मुलीपेक्षा सून जवळ असते
5 आपल्या घराण्याचे रीती रिवाज तिला हळुवार पणे समजून सांगा. त्यातला आनंद घ्यायला शिकवा पण अजिबात सक्ती करू नका सक्तीने काही होत नाही. रितिरिवाजापेक्षा तुमच्यातले नातेसंबंध महत्वाचे, तिच्या माहेरचे काही रीती रिवाज असतील तर ते तिला पाळू द्यावेत. आमच्यात अस चालत नाही म्हणून सांगू नका
6 तिच्या माहेरचा चुकूनपण अपमान करू नका,तसेच सासर आणि माहेर यांची तुलना करू नका.आपल्या सुनेची इतरांच्या सुनेशी तुलना करू नका प्रत्येक जण युनिक आहे
7 टोमणे कधीच मारू नका, सगळ्या नात्याची वाट लावणारे ते घातक अस्त्र आहे.
8.अति कौतुक पण करू नका. जी आहे जशी आहे तस तिला स्वीकारा. सर्वगुणसंपन्न सून किंवा सासू ही फक्त कल्पना आहे. दोष असतातच फक्त ते स्वीकारा
9. किचन वरचा हक्क हळूहळू सोडा. तिने केलेल्या पदार्थांचे कौतुक करा. काही कमीजास्त असेल तर ते सौम्य शब्दात सांगा..उदा. मीठ कमी असेल तर " अग मीठ थोडं कमी वाटतय का ग " अस हसून सांगा..मीठ कमी झालंय अस रुक्षपणे सांगू नका.तिने केलेल्या पदार्थांना नावे ठेऊ नका तुम्ही घरात सून आणली आहे मधुरा रेसिपीचे पुस्तक नाही.
10. नवीन सून आल्यानंतर तिला एक सांगा माझं काही चुकलं तर मला सांग तुझं काही चुकलं तर मी तुला सांगेन पण कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांच्या चूका बाहेर सांगायच्या नाहीत.
11. तुमचा मुलगा हा आता तिचा नवरा आहे हे लक्षात घ्या. त्याला काय आवडत काय नाही हे सुनेला सांगत बसू नका . त्याला तोंड आहे तो सांगेल. त्यालाही एक सांगा की बायकोला अजिबात नावे ठेवायची नाहीत. ती नवीन आहे आपण सांभाळून घ्यायला हवं. मुलाने कधी बायकोचे कौतुक केलं तर त्यात तुम्ही भरच घाला बघा नातं कस फुलून येत...
येणाऱ्या सुनेला माहेर विसरायला लावणं हे सासूबाईंचे खरे कौशल्य....
सूनबाईसाठी टिप्स लवकरच लिहितोय...☺️☺️☺️
प्रशांत शेलटकर
8600583846