बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय भाऊ? कोणाच्या बुद्धीला प्रमाण मानायचे? स्वतःच्या की इतरांच्या? इतरांच्या असेल तर त्यांच्या बुद्धीवर श्रद्धा ठेवायची का? आणि स्वतःच्या असेल तर माझा बुद्धिप्रामाण्यवाद इतरांपेक्षा वेगळा असणार हे नक्कीच,मग निष्कर्ष कसे काढायचे? अगदी बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवणाऱ्या लेखकांनी लिहिलेले ग्रंथ प्रमाण मानणे म्हणजे ग्रंथप्रामाण्य म्हणावे का? अगदी फक्त विज्ञानाने मान्य केलेलेच आपण मान्य करावे अस म्हटलं तरी दर दिवसाला,महिन्याला ,वर्षाला, दशकाला आणि शतकाला विज्ञान बदलत असते..मग कालचा, गेल्या महिन्यातल्या, गेल्या वर्षातला ,गेल्या दशकातला आणि गेल्या शतकातला बुद्धिप्रामाण्यवादी खोटा होता असे म्हणावे का? म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद ही बदलणारी गोष्ट आहे . ती निरंतर अनुभवाची गोष्ट आहे. तो विदवत्तेचा, अहंकाराचा विषय नाही. जो खरा बुद्धिवादी असतो तो आपल्या बुद्धीच्या मर्यादा ओळखतो आणि नम्र असतो..महत्वाचे म्हणजे तो स्वतंत्र बुद्धीचा असतो. तो पुस्तकी नसतो. अमुक तमुक पुस्तकात असे म्हटले आहे . प्रस्तुत लेखक बुद्धिवादी आहे म्हणून त्याने लिहिलेलं बुद्धिवादीच लेखन असणार या "अंधश्रद्धा" खऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी माणसाकडे नसतात. कोणत्याही विचारधारेचे "पाईक" असणे हेच तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी नसल्याचे प्रतीक आहे. आज असे परपोशी,परप्रकाशीत खूप आहेत.
बुद्धीप्रामाण्यवाद हा व्यक्तिसापेक्ष असतो,किंबहुना तो असायलाच हवा.स्वतःच्या मेंदूचा सुयोग्य वापर हे बेसिक असते बुद्धिप्रामाण्य असण्याचे. माझ्या प्रमाणेच इतरांनी विचार केला पाहिजे असे मानणे म्हणजे बुद्धिवाद नव्हेच..आपले मत दुसऱ्याला पटलेच पाहिजे अस कुठे असते? समाजातील अनिष्ट ( इथे काहीवेळा आपल्याला ते अनिष्ट वाटत असले तरी ते इष्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही) कर्मकांडाना विरोध करता करता आपणच " कर्मकांडी" होत नाही ना याची दक्षता घेतली पाहिजे.
एक बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून मला अस वाटलं. माझ्या मतांशी सहमत झालेच पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही. शक्य असेल तेव्हा मी माझेच प्रबोधन करत असतो. इतरांचे प्रबोधन करण्याइतपत माझी योग्यता नाही..
- प्रशांत शशिकांत शेलटकर
रत्नागिरी
8600583846
No comments:
Post a Comment