Ad

Saturday, 30 March 2019

माझ्या जगण्याचे संदर्भ....

माझ्या जगण्याचे संदर्भ....

माझ्या जगण्याचे संदर्भ,
मी तुझ्याशी जोडावे का?
माझे व्यक्त होणे,
माझे अव्यक्त रहाणे, नेहमीच
तुझ्या आवडी-निवडीशी
संलग्न ठेवायचे का?...

जस जमेल तसं
जस जमेल तिथं,
व्यक्त होतोय,
कधी शब्दातून
कधी डोळ्यातून...
काही नतद्रष्ट जोडतात
त्याचा संबंध चरित्र्याशी
चारित्र्य काय असते भाऊ?
वेदना अन संवेदना,
मनाच्या तळघरात,
दडपून टाकणे म्हणजे
असते का चारित्र्य?
की ,
विकारांची वीण आतल्या बाजूला ठेऊन विणलेला असतो एक छानसा
मुखवटा चारित्र्य ?

माझ्या धमन्यांतून खेळतात
हल्ली रक्ता ऐवजी शब्द...
माझ्या मौनाला बोलके करतात शब्द...
भलतेच बंड करतात शब्द
व्यक्त होण्यास भाग पाडतात शब्द...
शब्दांशी गद्दारी मी करावी का?
माझ्या जगण्याचे संदर्भ,
मी तुझ्याशी जोडावे का?

डिपी छान ठेवण्यासाठी
माणसं काय काय करतात
उसनं उधार , नाटकी हासू
चेहऱ्याला फासतात...
मला हे कधी जमलंच नाही

मी,
जसा आहे तसा दिसत गेलो
जमेल तसा हसत गेलो..
जिथं रडायचं तिथे रडत गेलो
जसा आहे तसाच...
व्यक्त होत गेलो...
यात माझे चुकले का?
माझ्या जगण्याचे संदर्भ,
मी तुझ्याशी जोडावे का?

प्रतिमेच्याच प्रेमात पडलेली
हजारो माणसं जेव्हा..
गोळा करत बसतात प्रमाणपत्रे
स्वतःच्याच चारित्र्याची,
तेव्हा त्यांचा नसतो विश्वास,
स्वतःच्याच चारित्र्यावर...
माझ्या  सभ्यपणाचे पुरावे
मी तुझ्याकडे मागावे का?
माझ्या जगण्याचे संदर्भ,
मी तुझ्याशी जोडावे का?

म्हणून सांगतो मित्रा,
मी असाच आहे
जसा मला हवा आहे
आणि
जसा मला हवा,
तसाच असणार आहे..

माझ्या जगण्याचे संदर्भ
माझ्याशीच असणार आहेत

-प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...