Ad

Saturday, 30 March 2019

माझ्या जगण्याचे संदर्भ....

माझ्या जगण्याचे संदर्भ....

माझ्या जगण्याचे संदर्भ,
मी तुझ्याशी जोडावे का?
माझे व्यक्त होणे,
माझे अव्यक्त रहाणे, नेहमीच
तुझ्या आवडी-निवडीशी
संलग्न ठेवायचे का?...

जस जमेल तसं
जस जमेल तिथं,
व्यक्त होतोय,
कधी शब्दातून
कधी डोळ्यातून...
काही नतद्रष्ट जोडतात
त्याचा संबंध चरित्र्याशी
चारित्र्य काय असते भाऊ?
वेदना अन संवेदना,
मनाच्या तळघरात,
दडपून टाकणे म्हणजे
असते का चारित्र्य?
की ,
विकारांची वीण आतल्या बाजूला ठेऊन विणलेला असतो एक छानसा
मुखवटा चारित्र्य ?

माझ्या धमन्यांतून खेळतात
हल्ली रक्ता ऐवजी शब्द...
माझ्या मौनाला बोलके करतात शब्द...
भलतेच बंड करतात शब्द
व्यक्त होण्यास भाग पाडतात शब्द...
शब्दांशी गद्दारी मी करावी का?
माझ्या जगण्याचे संदर्भ,
मी तुझ्याशी जोडावे का?

डिपी छान ठेवण्यासाठी
माणसं काय काय करतात
उसनं उधार , नाटकी हासू
चेहऱ्याला फासतात...
मला हे कधी जमलंच नाही

मी,
जसा आहे तसा दिसत गेलो
जमेल तसा हसत गेलो..
जिथं रडायचं तिथे रडत गेलो
जसा आहे तसाच...
व्यक्त होत गेलो...
यात माझे चुकले का?
माझ्या जगण्याचे संदर्भ,
मी तुझ्याशी जोडावे का?

प्रतिमेच्याच प्रेमात पडलेली
हजारो माणसं जेव्हा..
गोळा करत बसतात प्रमाणपत्रे
स्वतःच्याच चारित्र्याची,
तेव्हा त्यांचा नसतो विश्वास,
स्वतःच्याच चारित्र्यावर...
माझ्या  सभ्यपणाचे पुरावे
मी तुझ्याकडे मागावे का?
माझ्या जगण्याचे संदर्भ,
मी तुझ्याशी जोडावे का?

म्हणून सांगतो मित्रा,
मी असाच आहे
जसा मला हवा आहे
आणि
जसा मला हवा,
तसाच असणार आहे..

माझ्या जगण्याचे संदर्भ
माझ्याशीच असणार आहेत

-प्रशांत शेलटकर
  8600583846

ती

ती इतकी सुंदर  नव्हती
पण खूप लोभस होती...
अन सात्विक होती खूपच
थोडी राजसही होती...

केस खूप मोठे नव्हते
पण जे होते ते रेशमी होते
डोळे मात्र टपोरे आणि
खूप खूप जुलमी होते....

टपोऱ्या डोळ्यांनी ती
अशी पहात राहायची
जशी शब्दाविना प्रेमाची
बाराखडी म्हणायची...

कधी कधी रागवायची
कधी कधी रुसायची
पण कधी खचलो तर
मात्र धीर दयायची...

एकदा ती उदास झाली
दूर दूर जाणार म्हणाली
शेवटचच भेटू एकदा...
परत आता येणार नाही

ठरल्याप्रमाणे ती आली
मिठीत माझ्या फक्त रडली
डोळे पुसत तिचे माझे
काळजी घे रे म्हणाली...

ठाऊक नाही आज मला
ती कुठे अन कोणत्या प्रांती
ती इतकी सुंदर  नव्हती
पण खूप लोभस होती...
खरंच खूप लोभस होती

-प्रशांत शेलटकर

Friday, 22 March 2019

अपूर्ण

अपूर्ण...

मी पूर्ण नाही अन
नाहीस तू ही पूर्ण
मित्रा हे जगच आहे
अपूर्ण फक्त अपूर्ण

ध्यास पूर्णत्वाचा
वावगा फुकाचा
हव्यास पूर्णत्वाचा
अपूर्ण फक्त अपूर्ण

उदंड जिथे संतती
संपत्ती लयास जाई
संतती वाचुन संपत्ती
अपूर्ण फक्त अपूर्ण

जिथे शारदा हसते
तिथे लक्ष्मी रुसते
दोघावाचून  आयुष्य
अपूर्ण फक्त अपूर्ण

जिथे चंद्र आहे
तिथे तिमिर आहे
प्रकाशावाचून सावली
अपूर्ण फक्त अपूर्ण

अर्धे आहे तुजपाशी
अर्धे आहे मजपाशी
एकमेकांविना आपण
अपूर्ण फक्त अपूर्ण

-प्रशांत श शेलटकर
  8600583846

Thursday, 14 March 2019

माणसांच्या जंगलात

एका खुळ्या क्षणी...
मी मनाशी ठरवलं
फिरावं माणसाच्या जंगलात
आणि पाहता आलं तर पाहावं
डोकावून माणसाच्या मनात

जीव तोडून एसटीत घुसावं
तर सगळ्याच सीट भरलेल्या
कुणाच्या बाजूला सुंदऱ्या तर
कुणाच्या बाजूला म्हाताऱ्या

थकून बसावं पार्कात तर
सगळीकडे हिरवळ दाटलेली
फेविकॉलच्या जोडासारखी
कपल घट्ट चिकटलेली...

तिचे डोके त्याच्या खांद्यावर
त्याचे हात तिच्या मांडीवर
चूळबुळ मात्र उगाच चालली
ज्येष्ठांच्या मग कट्ट्यावर

मस्त प्यावा चहा म्हणून
थांबलो एका टपरीवर...
राजकारणच उकळत होत
टपरीवाल्याच्या स्टोव्हवर

रस्त्यातूनच चाललो मग
वाचीत लोकांचे चेहरे...
लांबट ..उभट..चौकोनी
कुणाचे  रडवे अन हसरे...

निरखून मग पाहिलं जरा
चेहरे ते तर गायब होते..
मुखवट्याच्या आतमध्ये
किती छान लपले होते...

म्हटलं आता जावं देवळात
बरा आहेस का रे बाबा म्हणून
देवाचीच घ्यावी खबरबात

जांभई देत देव म्हणाला
बोअर झालोय यार....
मागण्या पुरवता पुरवता
पुरता झालोय बेजार...

मी म्हणालो देवा ...
असं कसं म्हणतोस
मुकुट आणि पितांबरात
किती छान दिसतोस

देव म्हणाला वेड्या
अरे दिसत तसं नसत
चार पेढे लाच देऊन
लोकांना काय काय हवं असत

कोणाला नोकरी हवी असते
तर कोणाला धंद्याची हमी...
कितीही भरून दिलं तरी
झोळी यांची कायम रिकामी

मी म्हणालो देवा असा
करू नको रे त्रागा....
तू आहेस म्हणून आहे रे
माणसातला माणूस जागा..

माणूसच आहे तो
कधीतरी चुकणारच
किती बढाई मारली तरी
तुझ्याकडे तो येणारच

देव म्हणाला पटलं मला
मी जातो गाभाऱ्यात...
तू ही परत जा ...
माणसाच्या जंगलात...

देवाचा निरोप घेऊन
मी परत निघालो....
माणसाच्या जंगलात
पुन्हा एकदा हरवलो...

-प्रशांत शेलटकर

Monday, 4 March 2019

सूर्य नकोच आहे...

हवेहवेसे जे वाटले कधी
ते आज वाटते नकोसे...
सूर्य तर नकोच आहे..
नकोच त्याचे कवडसे...

अख्खी जिंदगी बरबाद झाली
ती कधी समजलीच नाही...
काळोखाच्या दारावर साली
एकही पणती लागली नाही...

कविता वांझोट्या शब्दांची
कधी अशी बिलगून राही
प्रतिभेची  प्रसव वेदना
तिला कधी कळलीच नाही

माणसे बिलंदर नाटकी
कधी समजलीच नाही
माणसे छान छापलेली
कधी वाचताच आली नाही

वासनांचा जहरी विळखा
आता सहन होत नाही..
नैतिकतेचे अनावर ओझे
डोईवरून काही उतरत नाही..

प्रश्नांचे अनेक डंख..
आजवर सोसत गेलो
उत्तरांचे जालीम उतारे
जमतील तसे शोधत गेलो

आता उत्तरंच येतात अंगावर
आणि प्रश्नच वाटतात नकोसे
सूर्य तर नकोच आहे अन
नकोच त्याचे कवडसे....

-प्रशांत शेलटकर
8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...