Ad

Thursday, 14 March 2019

माणसांच्या जंगलात

एका खुळ्या क्षणी...
मी मनाशी ठरवलं
फिरावं माणसाच्या जंगलात
आणि पाहता आलं तर पाहावं
डोकावून माणसाच्या मनात

जीव तोडून एसटीत घुसावं
तर सगळ्याच सीट भरलेल्या
कुणाच्या बाजूला सुंदऱ्या तर
कुणाच्या बाजूला म्हाताऱ्या

थकून बसावं पार्कात तर
सगळीकडे हिरवळ दाटलेली
फेविकॉलच्या जोडासारखी
कपल घट्ट चिकटलेली...

तिचे डोके त्याच्या खांद्यावर
त्याचे हात तिच्या मांडीवर
चूळबुळ मात्र उगाच चालली
ज्येष्ठांच्या मग कट्ट्यावर

मस्त प्यावा चहा म्हणून
थांबलो एका टपरीवर...
राजकारणच उकळत होत
टपरीवाल्याच्या स्टोव्हवर

रस्त्यातूनच चाललो मग
वाचीत लोकांचे चेहरे...
लांबट ..उभट..चौकोनी
कुणाचे  रडवे अन हसरे...

निरखून मग पाहिलं जरा
चेहरे ते तर गायब होते..
मुखवट्याच्या आतमध्ये
किती छान लपले होते...

म्हटलं आता जावं देवळात
बरा आहेस का रे बाबा म्हणून
देवाचीच घ्यावी खबरबात

जांभई देत देव म्हणाला
बोअर झालोय यार....
मागण्या पुरवता पुरवता
पुरता झालोय बेजार...

मी म्हणालो देवा ...
असं कसं म्हणतोस
मुकुट आणि पितांबरात
किती छान दिसतोस

देव म्हणाला वेड्या
अरे दिसत तसं नसत
चार पेढे लाच देऊन
लोकांना काय काय हवं असत

कोणाला नोकरी हवी असते
तर कोणाला धंद्याची हमी...
कितीही भरून दिलं तरी
झोळी यांची कायम रिकामी

मी म्हणालो देवा असा
करू नको रे त्रागा....
तू आहेस म्हणून आहे रे
माणसातला माणूस जागा..

माणूसच आहे तो
कधीतरी चुकणारच
किती बढाई मारली तरी
तुझ्याकडे तो येणारच

देव म्हणाला पटलं मला
मी जातो गाभाऱ्यात...
तू ही परत जा ...
माणसाच्या जंगलात...

देवाचा निरोप घेऊन
मी परत निघालो....
माणसाच्या जंगलात
पुन्हा एकदा हरवलो...

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...