Ad

Friday 27 July 2018

गुरू

साधारणपणे वीस-बावीस वर्षांपूर्वी रत्नागिरीत पुण्याचे श्री देवनाळकर नावाचे योग गुरू आले होते. विषयांतर म्हणून सहज गप्पा मारताना त्यांनी  गुरु  किंवा साधूला ओळ्खण्याचे तीन निकष सांगितले होते ते निकष काळाच्या कसोटीवर तपासून पाहिले तर आजही लागू होतात. कोणत्याही साधू किंवा गुरूला तुम्ही खालील तीन निकषावर तपासू शकता...
१. तो साधू लोकांशी कसं वागतो म्हणजे पैसेवाल्यांशी आणि गरीब यांच्याशी त्याचे कसे वागतो? श्रीमंत माणसाकडे विशेष लक्ष आणि गरीब माणसाकडे  दुर्लक्ष करतो काय? त्याचं राहणीमान कसं आहे... साधं की ऐश आरामी?

२. तो स्त्रियांशी कसं वागतो? आशीर्वाद देताना स्त्रियांना जाणीवपूर्वक स्पर्श करतो काय? स्त्रियांकडून सेवा करून घेतो काय? प्रवचन करताना त्याचं कुठे लक्ष असतं?

३. त्याला प्रसिद्ध होण्याचा सोस किती आहे?

या तीन निकषांवर तुम्ही कोणत्याही साधू अगर गुरूला  तपासून पहा आणि मगच विश्वास ठेवा...

मला यात आणखी एक निकष नम्रपणे समाविष्ट करावासा वाटतो.
त्या साधू कडे खरंच ज्ञान आहे की फक्त शाब्दिक ज्ञान? कारण आजकाल वेगवेगळी पुस्तके वाचून ,अध्यात्म,सगुण-निर्गुण उपासना, अद्वैतसिद्धांत, भगवद्गीतेतील विविध कर्मयोग, ज्ञानयोग,ध्यानयोग, वगैरे योग यावर फक्त बोलणं सोपं झालंय. उत्कृष्ट वक्तृत्व आणि शाब्दिकपांडित्य याच्या बळावर आसाराम सारखे बोगस बाबा तयार होतात..
      म्हणून गुरू निवडताना त्याला तपासून बघितलंच पाहिजे. डोळे आणि डोके बंद करून विश्वास ठेवण्याचे दिवस कधीच गेले आहेत. केवळ शेजारी-पाजारी,मित्र-मैत्रिणी सांगतात म्हणून कोणाच्या पायावर डोके ठेवायला जाऊ नये...
जाता जाता दोन उदाहरणे सांगतो..
      साईबाबांच्या काळातील गोष्ट आहे.दासगणू महाराज ज्यांनी गजानन महाराज आणि साईबाबा यांचेवर अनेक भजने लिहिलीत.ते उत्कृष्ट कीर्तनकार होते.एकदा रामनवमीला ते कीर्तनाला रेशमी धोतर, उपरणे,पगडी अशा वेशात सजून-धजून  उभे राहिले.तेव्हा साईबाबांनी त्याला ते सर्व उतरवून ठेवायला सांगितले. दासगणू महाराजांनी तसे केले आणि मग कीर्तनाला उभे राहिले..साधुत्वाला दिखाव्याची गरज नसते...
      दुसरे उदाहरण, स्वामी विवेकानंद बुद्धिवादी होते त्यांना बालपणापासून प्रश्न पडत असे की देव आहे का? असेल तर कोणी पहिला आहे का? कलकत्त्यात कोणी साधू पुरुष भेटला आणि देवाचं काही सांगायला लागला की हे विचारायचे तुम्ही पहिला का? अर्थातच समोरून उत्तर गोलमाल असायचे...
       कॉलेजला असताना, एकदा एका विद्वान ख्रिश्चन प्राध्यापकांचं तास चालू होता विषय देवाचा निघाला.तेव्हा विवेकानंदांनी थेट त्यांनाच प्रश्न विचारला की तुम्ही देव पाहिलात का? प्राध्यापक म्हणाले मी पाहिलेला नाही पण तू जर आपल्या गावातील कालीमातेच्या मंदिरातील पुजाऱ्याला हा प्रश्न विचारला तर तो पुजारी देईल उत्तर...
    विवेकानंदांनी त्या पुजाऱ्याला हाच प्रश्न विचारला ,की तुम्ही देव पाहिलात का?
त्या पुजाऱ्याने  विवेकानंदांना सांगितलं " होय मी देव पाहिला आहे , मी तुला आता जस पाहतो आहे तसं मी देवाला पाहिलंय..."
पुढचं सगळं जगजाहीर आहे
    गुरू असावा रामकृष्ण  परमहंसासारखा आणि शिष्य असावा विवेकानंदासारखा..
....
    कालच गुरुपौर्णिमा झाली त्या निमित्ताने लिहावंसं वाटलं बस्स...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

इथे पुन्हा जन्म नको..

इथे पुन्हा जन्म नको..  सत्कार सोहळा चालू असतो..स्टेजवर दांभिक माणसं बसलेली असतात..आपल्याला माहीत असतं की हे सगळे चोर आहेत..तरी देखील आपण हात...