Ad

Friday, 29 June 2018

देव

मी म्हणालो देवाला...
तू असं का रे वागतोस
जे हवं आहे ते न देता
भलतंच काही देतोस..

देव म्हणाला मला
तू तरी काय करतोस
हवं ते दिल तर....
मलाच विसरून जातोस

परीक्षा, लग्न आणि नोकरी
यावेळीच मी आठवतो....
कधी व्हावं मूल म्हणून
तू माझ्या दारी रडतो....

कधी तरी येते दया
शेवटी मी देव आहे ना
देतो तुला हवे ते...
म्हणून तू मला भजतो ना ?

अरे अरे माणसा..
एवढही तुला कळेना..
चटक्या शिवाय भाकर
कधीच कुणाला मिळेना..

रोज रोज गोड मिठाई
सांग कधी खाशील का?
मिठा शिवाय अन्नाला
चव कधी लागेल का?

मानलसं जर देव मला
तर मी देव आहे..
नाही मानलस तर ...
मी फक्त दगड आहे..

सुख आणि दुःख फक्त
कल्पनेचा खेळ आहे..
स्वीकारलंस जर हे सत्य
तर आयुष्याला मेळ आहे..

मी म्हणालो देवाला...
आता मी मागणार नाही
तुझ्या दरबारात आता
कसली तक्रार करणार नाही

देव म्हणाला टाळी देऊन
आता कसं बोललास...
माझ्यावरचा भार मात्र
एकाने तरी कमी केलास..

मला बाय बाय करून
देव गेला देवळात...
देहाचेच देऊळ झालं
त्या सुगंधी क्षणात...

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Sunday, 24 June 2018

गणित

शून्यापासून शुन्यापर्यन्त
असा माझा प्रवास आहे...
वजाबाकीच खूप आणि
बेरीज खूप थोडी आहे...

जिथे बेरीज करू पाहिलं
तिथे मी उणा झालो...
हक्काच्या माणसांत मात्र
मी कधीच पाहुणा झालो...
आता आयुष्याला भागतो आहे
तरी बाकी शून्य आहे..
कारण....
वजाबाकीच खूप आणि
बेरीज खूप थोडी आहे...

एक अधिक एक ...
नसतात नेहमीच दोन..
आयुष्य असते कधी
लघुकोन कधी विशालकोन...
नियतीकडूनच आता
एक "हातचा" घेतो आहे कारण...
वजाबाकीच खूप आणि
बेरीज खूप थोडी आहे...

कधी वाटत मनापासून
करावी पुन्हा पाटी कोरी
आणि मांडाव आयुष्याच
गणित पुन्हा नव्याने....
ज्यात असेल फक्त
सुखाचा गुणाकार अन
दुःखाचा भागाकार...
आपुलकीची बेरीज...
वेदनांची वजाबाकी....
कारण...
नियतीकडून घेतलेला
एक उधार "हातचा"
तिचा तिला परत द्यायचा आहे
.....तिला परत द्यायचा आहे

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Saturday, 23 June 2018

नितळ

माणसाचं मन असावं
नितळ आणि पारदर्शी..
आरस्पानी डोहा सारखं...
डोह गहिरा असला तरी
दिसला पाहिजे तळ..
मनात असू नये कधीच
कुणाविषयी कसलाच सल...

कुणाच्या मनात ,
कुणाला किती स्थान..
कशाला हवा सांगा
नको तो अभिमान...
मन असावं पवित्र सुंदर
जस काही गंगाजल
मनात असू नये कधीच
कुणाविषयी कसलाच सल...

कितीही कमावलेत तरी ,
सांगा कुठे पुरते...
मेल्यानंतर सांगा तुम्ही
राखेशिवाय काय उरते?
तेव्हा कुठे जाते सांगा..
धन आणि सत्तेचे बल...
मनात असू नये कधीच
कुणाविषयी कसलाच सल...

डीपी असोत किती सुंदर
मन सुंदर पाहिजे...
चेहरा असो कसाही
दिल नेक पाहिजे...
फाटका असला खिसा तरी
दिल पाहिजे दर्यादिल..
मनात असू नये कधीच
कुणाविषयी कसलाच सल...

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Monday, 18 June 2018

माघार

तेव्हा माघार घ्यावी....

जेव्हा आपलंच माणूस
अनोळखी होतं ...
तेव्हा...
शांतपणे माघार घ्यावी.......

जेव्हा संपतात सारी नाती
काही सकारणं... अन
काही विनाकारण....
तेव्हा पुरावे मागू नयेत
नाती संपण्याचे..
तेव्हा....
शांतपणे माघार घ्यावी...

कधी काळी असतो आपण
कुणाचे तरी ...हक्काचे
कधीतरी असते जागा
कुणाच्यातरी डोळ्यात...
पण कधीतरी नजरच होते
अनोळखी आणि परकी..
तेव्हा...
शांतपणे माघार घ्यावी...

कधीतरी आपण उगाचच
जपतो कुणालातरी...
मनात खोलवर...
जणू आपल्या अस्तित्वालाच
हवाली करतो कुणाच्यातरी
मर्जीवर आणि मनावर..
पण कधीतरी जाणवत...
कुणालाच नाही आपल्या
अस्तित्वाची दखल...
तुम्हीच बेदखल होता..
त्याच्या भावविश्वातून...
तेव्हा...
शांतपणे माघार घ्यावी...

उत्तराच्या अपेक्षेने...
का करून घ्यावेत स्वतःला
प्रश्नांचे डंख....
मिळणार नाहीत कधीच
प्रश्नांची उत्तरे....
तेव्हा...
शांतपणे माघार घ्यावी...

जेव्हा सगळंच संपते...
तेव्हाच नियती दान करते
एक अनमोल नजराणा...
त्याचं नाव ...अनुभव
म्हणून सगळं संपत तेव्हा....
तेव्हा...
शांतपणे माघार घ्यावी...

-प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday, 16 June 2018

आठवण तुझी

तुला भेटण्यापेक्षा
तुला आठवण्यात मजा आहे..
मंजिल मिळो वा न मिळो
चालण्यातच मजा आहे....

तुझ्या अनोळखी नजरेपेक्षा...
तू नजरेआडच बरी आहेस
तुझ्या डोळ्यातला "मी."...
आठवण्यातच मजा आहे...

जरी संपले सारे...
तुला काळजात जपलं आहे
तुझ्यासाठी आसवांना
मोत्यासारखं सांभाळलं आहे

जे केलंस माझ्यावर...
त्याला मी प्रेमच मानलं आहे
काळजावर फक्त आणि फक्त
तुझंच नाव कोरलं आहे....

आता या उदास क्षणी
फक्त तू आठवत आहेस
आठवणींचा पाऊस मात्र
माझ्या डोळ्यात दाटत आहे...

-प्रशांत शेलटकर
8600583846

Friday, 15 June 2018

मी तुझाच आहे

तुझा मी नसेन कदाचित
मी मात्र तुझाच आहे
तू माझीच असावी
असं नाही नक्कीच...
मी मात्र तुझा ....
नक्कीच आहे

प्रेम आणि लग्न
वेगळ्या गोष्टी असतील
कदाचित...
प्रेम असेल तिथे लग्न
असेलच असे नाही...
लग्न असेल तिथे प्रेम
असेलच असं नाही..

जिथे हक्क आणि सत्ता
तिथे प्रेम असेलच असे नाही
जिथे फक्त सर्मपण...
तिथे वासनेचे नावच नाही

माझ्यासारखी व्याकुळ
तू व्हावीस असं नाही...
तुझी प्रत्येक संध्याकाळ
माझ्यासाठी असावी...
अस नक्कीच नाही...

नवऱ्याच्या उबदार मिठीत
तुला माझी आठवण...
यावी असं काही नाही...
मात्र तुझ्या आठवणींनी..
रात्र माझी जागावी...
याला नक्कीच इलाज नाही...

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Monday, 11 June 2018

आभास

मी तुझ्याशी हसलो तर
तुही हसणे अपेक्षित आहे
मी केलं "हाय" तर
तुझं "हँलो " अपेक्षित आहे

मी केलं गुडमॉर्निंग तर तू,
माझीही मॉर्निंग गुड करणारच
नाही केलंस तस तर मी तुला
मॅनर्सलेस म्हणणारच ...

तुझी पोस्ट पटो न पटो
लाइक मी करणारच...
आणि माझ्या पोस्टला
तुझी लाइक असणारच

तू स्त्री असलीस तर...
तुझा डीपी नाइस असणारच
छान, सूंदर, अप्रतिम
कॉमेंट्स चा पाऊस पडणारच

तू पुरुष असलास तर मात्र
तुझं कठीण आहे...
कॉमेंट्स सोड लाईकपण
तुझ्यासाठी महाग आहे...

सकाळ दुपार संध्याकाळ
स्टेटसचे बाण सोडणार आहे
लागायचे त्याला लागतीलच
बाकी सगळा कचरा आहे..

वाढदिवस विश करणे
किती किती सोपं आहे
कॉपी -पेस्टच थालीपीठ
कढईत अलगद सोडायच आहे

इथे करतो कुणी कुणाला
व्हर्चुअली मिस....
इथे देती कुणी कुणाला               
व्हर्चुअली किस....

आभासी दुनियेतील
ही आभासीच नाती....
कठीण समय येता
कामास कुणाच्या येती

-प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday, 9 June 2018

एकटा

पायवाट मळलेली मी कधीच सोडली आहे
आता जी चालतो तीच माझी पायवाट आहे

पाय काट्यांत आहे जिथे चालतो मी तिथे 
तरी नक्षी  त्या काट्यांचीच रेखीत आहे...

मी कधीच सोडला आहे उत्तरांचा किनारा
समुद्र प्रश्नांचा अथांग , मी पार करतो आहे...

कशास असाव्या होकाराच्या संकेतखुणा
सारे नकार मी स्वीकारतच चाललो आहे...

नको सोबतीला ,उबदार गर्दी माणसांची
असा एकटा मस्त मी ,छान चालतोच आहे...

-प्रशांत शेलटकर
8600583846

Sunday, 3 June 2018

शुक्रराणी

झगमगत्या नभसदनी तो चंद्र एकला होता
ओढूनीं मेघाची दुलई तो आत लपला होता

होत्या लक्ष तारका त्या विशाल तारांगणी
होती प्रत्येक तारका जरी सौन्दर्याची खनी
परी हरवला कुठे तरी तो निशाधिपती होता
ओढूनीं मेघाची दुलई तो आत लपला होता
झगमगत्या नभसदनी तो चंद्र एकला होता

लाजती सजती  नक्षत्रयुवती त्या नभांगणी
चंद्रास वरण्याची त्या किती स्वप्नेच पहाती
स्वप्नात परी शशीच्या तो एकच ध्यास होता
ओढूनीं मेघाची दुलई तो आत लपला होता
झगमगत्या नभसदनी तो चंद्र एकला होता

वाट पाहता पाहता तिची मग पहाट झाली
लेवून  शूभ्रचांदणे  चांदणी शुक्राची लाजली
प्रियतमेस पाहुनी मग तो चंद्र हसला होता
फेकून मेघांची दुलई मग तेजात नाहला होता
झगमगत्या नभसदनी तो चंद्र एकला होता

क्षणाची संगती लाभते ग शुक्रराणी जरी तुझी
तुझ्यावरच जडते ग हरघडी प्रीत माझी
मग मावळताना चंद्र तो उदास हसला होता
अश्रू दवाचा मग धरेवर ओघळला होता

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Saturday, 2 June 2018

जिप्सी

"जिप्सी"

असलो जरी काळा-सावळा
तरी मी सुंदर आहे........
वेष माझा जरी बावळा
तरी मी कलंदरआहे....

मनसोक्त भटकणारा
मी एक मनमौजी आहे....
आयुष्याशी झगडणारा
मी एक फौजी आहे..

आयुष्याला प्रश्न करणारा
मी एक यक्षही आहे...
उत्तर मिळो अथवा न मिळो
आनंद हेच लक्ष्य आहे....

आयुष्य एक यात्रा आहे
कधी चढ ..कधी उतार आहे
आनंदाने चाललात तर...
तुमच्यातही एक जिप्सी आहे..

आयुष्य कधी हिरवळ आहे
कधी वैराण वाळवंट आहे
थकलो तर थडगे आहे
अन चाललो तर कारंवा आहे

मी जिथे आहे जसा आहे
तिथेच मी बरा आहे...
तिखट - तूसडा असलो तरी
आतून मी खरा आहे....
आणि...
खरंच माझ्यात एक
जिप्सी लपला आहे
खरंच माझ्यात एक
जिप्सी लपला  आहे....

-प्रशांत शेलटकर
8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...