पारध्याच्या तीराने डाव्या पायाच्या अंगठ्याचा छेद घेतलाय... वेदनांनी परिसीमा गाठली आहे... कृष्ण नावाचं चेतन देहाच्या सीमा ओलांडून अनंताकडे झेप घेतय... अशा प्रस्थान समयी फक्त तूच आठवतेस राधे...
राधे अजाणतेपणी तूझ प्राक्तन अनयशी ,तुझ्या नव-याशी बांधल खरं... पण नियतीला ते मान्य नव्हते... राधा फक्त या कृष्णासाठीच जन्मली होती... राधे लोकांना फक्त आपली रासक्रीडा दिसली... पण राधेच्या तनामनात रूजलेला कान्हा कधी दिसला नाही... अनयला तर नाहीच नाही...
राधे लोकांना कृष्णाच्या सोळासहस्त्र नारी दिसल्या... पण गोकूळ सोडल्यानंतर माझी बासरी मूकी का झाली ते कुणालाच समजल नाही...
राधे गोकुळ सोडताना तू निरोप द्यायला पण नाही आलीस... योग्य केलस... कारण कान्हाला थांबवण्याची ताकद फक्त तूझ्यात होती... पण तू आली नाहीस... कारण माझं जीवन ध्येय फक्त तूलाच माहीत होत...
राधे मी गोकूळ सोडलं आणी तू हे जग सोडून गेलीस... माझं नाव घेतं... राधे त्यानंतर मी कधीच बासुरी ओठांना लावली नाही... तीचे सूरच हरपले होते...
राधे आता काही क्षण उरलेत... तूझा गौरमुखचंद्र अगदी स्पष्ट दिसतोय... तेच ते यमुनेच्या डोहासारखे... गहिरे डोळे... ते घनगर्द मेघासम गालावर दाटून येणारे केस सारं काही स्पष्ट दिसतयं...
आणि हे काय?... राधे तूझ्या डोळ्यात पाणी... नको राधे... नको... आपल्या मिलनाची घटी समीप आलीय... काही क्षणांची पाऊले चाललो की... फक्त तू अन मी... मग वेदनेचा वेद होईल... हे सारे विश्वच गोकुळ होईल... परत एकदा बासुरी ओठांना बिलगेल... त्यातून फक्त एकच सूर उमलेल...
राधे!!! राधे!!!
.
.
.
राधे... थांब ग आता काही क्षणांचाच अवधी आहे ग...!!!
- प्रशांत शेलटकर