Ad

Saturday, 15 April 2023

तीनोळी-#4

तीनोळी-#4

आशावादी असलं पाहिजे
तो म्हणाला ठामपणे
विझलेल्या डोळ्यांनी

-प्रशांत

तिनोळी-#3

तिनोळी-#3

ओव्हरलोड नवसांचा
देव करतोय नवस
वर्कलोड कमी व्हावा म्हणून

-प्रशांत

तिनोळी-#2

तिनोळी-#2

विसरून जा रे..
डोळ्यात पाणी
आणि कचऱ्याचे निमित्त

-प्रशांत

तिनोळी- #1

तिनोळी- #1

बॅटरी लो मोबाईल बंद 
डिजिटल मरण क्षणभर
भावनांचा ईसीजी अँबनॉर्मल

-प्रशांत

Thursday, 13 April 2023

दमलेल्या देवाची गोष्ट

दमलेल्या देवाची गोष्ट...

गाभाऱ्यात चिडला आहेस
देवा मला कळले आहे
गुदमरलाय तुझा श्वास रे
देवा मला कळले आहे

भोवताली तुझ्या देवा
कसला रे हा गोतावळा
सगळ्यांनाच हवा आहे 
आवळा देउन  कोहळा

देऊळ म्हणावे का देवा
एकदा मला सांग
पुण्यासाठी झोळी घेऊन
अबब केवढी रांग..

करतो किती पाप त्याची
खंत मनात लागते..
उताऱ्यासाठी मग देवापुढे
असे झुकावे लागते..

खरे खुरे भक्त देवा
जेव्हा तुझ्याकडे येतात
स्वतःसाठी नाही मागत
इतरांसाठी मागतात

ठाऊक असते त्याना 
कर्मगतीचे मिळते फळ
जोवर फिटत नाही प्राक्तन 
तोवर सोसावे लागते कळ

देव नसतो करत कृपा
नसतो करत कोप
पण भोग सरेपर्यंत नसतो
माणसाला काही थोप

सेटिंग व्हावी काही
त्याला असे वाटते
भार पापांचा थोडा
देवाने घ्यावे वाटते

विधिलिखित असते जे
देवाला का कळत नाही
वनवास, स्वपत्नीहरण
रामालाही टळत नाही

वंश नाश झाला तरी
कृष्ण मंद हसत होता
जैसे कर्म तैसे फळ
मनात मात्र म्हणत होता

केवळ केवळ सुख हवे
दुःख मात्र किंचित नको
फुलेच असावीत पायाखाली
काट्याचा मुळी सलच नको

पैसे देऊन घेऊ पाहती
कृपा तुझी रे देवा..
सदा सर्वदा हवाच आहे
फक्त सुखाचा मेवा..

म्हणून सांगतो देवा तुला
गाभाऱ्या बाहेर ये
स्वच्छ मोकळ्या हवेत
श्वास जरासा घे..

बरं वाटेल थोडं तुला
जरा होशील निवांत
भक्तांच्या मागण्याला
ना आदी ना अंत

खांद्यांवरती टाकून हात
देव म्हणाला हसून
न मागणारेही असतात
हे मी आहे ओळखून

ते ही ओळखतात रे
खरे खुरे मला..
त्याच्यासाठीच देवळात
रहावे लागत मला...

निरोप घेऊन देव माझा
पुन्हा देवळात गेला
पुन्हा एकदा देवाचा
जय जयकार झाला..

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Saturday, 8 April 2023

वळीव चुंबन

आज आमच्या गावात पाऊस पडला...पहिला पाऊस म्हटल्यावर...कवी ने कविता नाही केली तर त्याला मोक्ष मिळत नाही..त्याला नानाविध कष्ट सहन करावे लागतात. त्याचा आत्मा लोकलला लटकलेला प्रवासी होतो.. त्याच्या बस चुकतात...पंगतीला बसला की त्याचे आवडते व्यंजन समोर आले की नेमके संपते मग त्याला कुर्म्या ऐवजी कोबीची भाजी खावी लागते...बस मध्ये बसला तर त्याच्या बाजूला नेहमीच "खोकाळू" पॅसेंजर येऊन बसतो...

म्हणून माझी ही कविता सहन करा..
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

वळीवाचे चुंबन ..

अत्तराचे भाव कोसळले
सुगंध मातीचा आला..
नव्हे तापल्या वसुंधरेने
सुगंधी सुस्कारा टाकला

किंचित ओला दिलासा
तरी आनंदी पान पान
मातीतला कण कण देतो
धुंद सुगंधी तान तान

हा क्षणिक आहे गारवा
हा वर्षाव जरी जरासा
तरी किंचित या सुखाचा
सृष्टी करते किती जलसा

मारुनी थोडी शायनिंग
पाऊस हसून गेला..
जसे कुणा तरुणीला
फ्लाइंग किस देऊन गेला

वळीवाचे ओले चुंबन
धरती शहारून गेली
अवचित मृदगंधी वीणा
सूर सुगंधी सोडून गेली

आता येउ दे उन्हाळा
फिकीर त्याची कशाला
आठवण जपत वळीवाची
धरणी ही सोसेल झळा..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

💧💦💧💦💧💦💧💦

Sunday, 2 April 2023

समूहव्यथा...

समूहव्यथा...

उदंड झाले ग्रुप
माहिती येते खूप
पण संवादाचा धूप
काही दरवळेना.......|| ०१ ||

नुसतेच करतात रिड
नुसतेच करतात फिड
होते मग चिडचिड
अँडमिनची....|| ०२ ||

माहितीचे सर्व हमाल
करती अशी कमाल
वाचताना होती हाल
इतरांचे.......|| ०३ ||

कुणाचे काही सृजन
पोस्टतो तो उत्साहानं
पण प्रतिसाद पाहून
हिरमुसतो ....|| ०४ ||

ग्रुप नव्हे हो गोडाऊन
पोस्ट ठेवल्या मांडून
फक्त पाहून  वा वाचून
दुर्लक्षावे .... ...|| ०५ ||

होऊदेत कितीही वाद
परी असावा मात्र संवाद
सादाला देणे प्रतिसाद
लक्षण जिवंतपणाचे  ....|| ०६ ||

मेम्बर असती शंभर
ऍक्टिव अवघे दोन चार
इतर मात्र बर्फ थंडगार
ढिम्म पडलेले.......|| ०७ ||

एक ना धड भारंभर
ग्रुपांचाच महापूर
पोस्ट येती सरसर
निमिषार्धात .......|| ०८ ||

कुणास द्यावे प्राधान्य
कुणास ठरवावे अन्य
प्रश्न हे परिस्थितीजन्य
पडतातच ......|| ०९ ||

म्हणून असावे लिमिटेड
मोजक्यांशी कनेक्टेड
बिनकामी गर्दीचे वेडं
असू नये......|| १० ||

मित्र जरी सतराशे साठ
संकटी मोजक्यांची साथ
इतरांचे खांद्यावर हात
स्वार्थापुरते.......|| ११ ||

मोकळा असावा संवाद
सादाला द्यावा प्रतिसाद
मन मोकळी असावी दाद
इमोजीसहित....|| १२ ||

श्लोक हे दशोत्तरी दोन
लिहिले जरी रात जागून
तरी लक्षात घेईल कोण
वाटत नाही.......|| १३ ||

-प्रशांत शेलटकर
  8600583846

आम्ही अज्ञेयवादी

आम्ही अज्ञेयवादी... आस्तिक नास्तिक वादात आम्ही अज्ञेयवादी लोकांनी काय करायचे???? आमची क्षमताच नाहीये देव आहे की नाही हे ठरवण्याची...आम्ही दो...