Ad

Thursday, 13 April 2023

दमलेल्या देवाची गोष्ट

दमलेल्या देवाची गोष्ट...

गाभाऱ्यात चिडला आहेस
देवा मला कळले आहे
गुदमरलाय तुझा श्वास रे
देवा मला कळले आहे

भोवताली तुझ्या देवा
कसला रे हा गोतावळा
सगळ्यांनाच हवा आहे 
आवळा देउन  कोहळा

देऊळ म्हणावे का देवा
एकदा मला सांग
पुण्यासाठी झोळी घेऊन
अबब केवढी रांग..

करतो किती पाप त्याची
खंत मनात लागते..
उताऱ्यासाठी मग देवापुढे
असे झुकावे लागते..

खरे खुरे भक्त देवा
जेव्हा तुझ्याकडे येतात
स्वतःसाठी नाही मागत
इतरांसाठी मागतात

ठाऊक असते त्याना 
कर्मगतीचे मिळते फळ
जोवर फिटत नाही प्राक्तन 
तोवर सोसावे लागते कळ

देव नसतो करत कृपा
नसतो करत कोप
पण भोग सरेपर्यंत नसतो
माणसाला काही थोप

सेटिंग व्हावी काही
त्याला असे वाटते
भार पापांचा थोडा
देवाने घ्यावे वाटते

विधिलिखित असते जे
देवाला का कळत नाही
वनवास, स्वपत्नीहरण
रामालाही टळत नाही

वंश नाश झाला तरी
कृष्ण मंद हसत होता
जैसे कर्म तैसे फळ
मनात मात्र म्हणत होता

केवळ केवळ सुख हवे
दुःख मात्र किंचित नको
फुलेच असावीत पायाखाली
काट्याचा मुळी सलच नको

पैसे देऊन घेऊ पाहती
कृपा तुझी रे देवा..
सदा सर्वदा हवाच आहे
फक्त सुखाचा मेवा..

म्हणून सांगतो देवा तुला
गाभाऱ्या बाहेर ये
स्वच्छ मोकळ्या हवेत
श्वास जरासा घे..

बरं वाटेल थोडं तुला
जरा होशील निवांत
भक्तांच्या मागण्याला
ना आदी ना अंत

खांद्यांवरती टाकून हात
देव म्हणाला हसून
न मागणारेही असतात
हे मी आहे ओळखून

ते ही ओळखतात रे
खरे खुरे मला..
त्याच्यासाठीच देवळात
रहावे लागत मला...

निरोप घेऊन देव माझा
पुन्हा देवळात गेला
पुन्हा एकदा देवाचा
जय जयकार झाला..

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...