आज आमच्या गावात पाऊस पडला...पहिला पाऊस म्हटल्यावर...कवी ने कविता नाही केली तर त्याला मोक्ष मिळत नाही..त्याला नानाविध कष्ट सहन करावे लागतात. त्याचा आत्मा लोकलला लटकलेला प्रवासी होतो.. त्याच्या बस चुकतात...पंगतीला बसला की त्याचे आवडते व्यंजन समोर आले की नेमके संपते मग त्याला कुर्म्या ऐवजी कोबीची भाजी खावी लागते...बस मध्ये बसला तर त्याच्या बाजूला नेहमीच "खोकाळू" पॅसेंजर येऊन बसतो...
म्हणून माझी ही कविता सहन करा..
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
वळीवाचे चुंबन ..
अत्तराचे भाव कोसळले
सुगंध मातीचा आला..
नव्हे तापल्या वसुंधरेने
सुगंधी सुस्कारा टाकला
किंचित ओला दिलासा
तरी आनंदी पान पान
मातीतला कण कण देतो
धुंद सुगंधी तान तान
हा क्षणिक आहे गारवा
हा वर्षाव जरी जरासा
तरी किंचित या सुखाचा
सृष्टी करते किती जलसा
मारुनी थोडी शायनिंग
पाऊस हसून गेला..
जसे कुणा तरुणीला
फ्लाइंग किस देऊन गेला
वळीवाचे ओले चुंबन
धरती शहारून गेली
अवचित मृदगंधी वीणा
सूर सुगंधी सोडून गेली
आता येउ दे उन्हाळा
फिकीर त्याची कशाला
आठवण जपत वळीवाची
धरणी ही सोसेल झळा..
-प्रशांत शेलटकर
8600583846
💧💦💧💦💧💦💧💦
No comments:
Post a Comment