अमानुष...
.... आषाढातल्या त्या कुंद पावसाळी संध्याकाळी मी हर्डीकरांच्या गिरणीत दळण कधी मिळतंय याची वाट पहात होतो.. पाऊस मी म्हणत होता.. त्या दिवशीची सांज जरा लवकरच पसरली होती... मघाशी पुलावरून येताना गौतमीचे रौद्र रूप भयचकीत करून गेलं होतं.. तांबळवाडी ते पार तेलीवाडी, काटे वाडी पर्यंत सगळीकडे लाल समुद्र.. तशातच मी दळण घेऊन आलो होतो..
.... अंधारून आल्या मुळे गिरणीतला 100 चा पिवळा बल्ब सुरेशकाकांनी जरा लवकरच लावला होता.. त्याचा फिकट पिवळा प्रकाश आजूबाजूचा अंधार जरा जास्तच गडद करत होता.. सगळीकडे पिठाचे साम्राज्य.. छतावर कोळयांच्या जाळ्या.. त्यावर पिठाची नक्षी.. पिवळ्या बल्बच्या प्रकाशात भेलकांडत.. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेला एखादा दुर्दैवी कीटक.. आणि त्याला लीलया गुंडाळून पोटाची सोय करणारा पांढुरका कोळी.. भिंती, छप्पर, गिरणीचे पट्टे, खालची लादी पिठाने माखलेली.. आणि दळणाची पिशवी चक्कीच्या होद्यात रिकामी करून खालच्या पिठाच्या डब्याकडे तंद्री लावून बसलेले सुरेश काका.. ते सुद्धा पिठाने माखलेले...
... गिरणीच्या पट्ट्याचा फटक फटक असा निरंतर आवाज आणि त्या आवाजाची तंद्री लागून एकटक शून्यात नजर लावत दळणाची वाट बघत बाजूला बसलेली म्हातारी गुरवीण..
पुढे घडणाऱ्या भयनाट्याचे हे जणू भयंकारी नेपथ्य.. आम्ही तिघे जणू नजरबंदी झाल्या सारखे फटक फटक करीत फिरणाऱ्या पट्ट्याकडे पाहत होतो.. मध्येच वाऱ्याचा थंड झोत आत यायचा.. पिवळा बल्ब अस्ताव्यस्त हलायचा.. तंद्री लावलेल्या सुरेश काकांची सावली भिंतीवरून हिंदकळायची... भीतीने सरसरून काटा यायचा...
.... ह्यास काय झालाय.. नुसतो ठोंब... म्हातारी गुरवीण काळोखात पावसाचा अदमास घेत करवादली.. परत पट्ट्याचा फटक फटक आवाज तंद्री लावत राहिला..
सुरेश काकांनी चक्की खालचा रिकामा डबा थोडा वाजवीत रिकामा करत माझ्या पिशवीत माझं दळण भरून देत फळीवर ठेवलं.. एक रुपया आणि वीस पैशाच नाणं सुरेश काकांच्या हातात दिलं त्यानी ते त्यान्च्या खिशात टाकलं.. दिवसभराचा गल्ला त्यान्च्या् खिशात तट्ट फुगला होता..
बाहेर आलो तर पाऊस थाम्बला होता.. पण आसमंत चिंब झालेला... दळण सायकलच्या मागे लावल आणि निघालो.. गिरणीचा मातीचा उतार मागे टाकून सायकल डावीकडे घेतली आणि परत उजवा टर्न घेऊन पुलाकडं निघालो.. रस्त्यावर कोणीच नव्हतं.. तिन्हीसांज दिवसाला थोपटून निजवत होती.. आजूबाजूला बेडकांची भयकारी डरावनी डराव डराव चालू होती... थोड्याच वेळात भयकारी नाटकाचा पडदा उघडणार होता.. गौतमीवरचा पूल हा त्याचा रंगमंच आणि भयसूचक जाणीवांचे नेपथ्य आणि मी एकटा...
... पुलाच्या चढणीला सायकल लागली तशी धाप लागायला लागली तशी नेहमीच लागायची पण या वेळी वेगळीच... पुलावर आलो आणि सायकलची चेन पडली.. खाली उतरलो.. अंधारात दिसत नव्हते.. म्हणून सायकल कडेला घेतली.. पुलाच्या कठड्याला टेकून बसलो.. आणि अंधारात चेन लावण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहिलो.. मी बसलो होतो त्याच्या बरोबर खाली कोंड होती.. खाली नजर टाकली.. पाणी रोरावत पुढे जातं होतं.. चिडलेला जातिवंत नाग जसे फुत्कार टाकतो ना तसा पाण्याचा लोंढा फुत्कार टाकत होता.. त्याचा आवाज वर पुला पर्यन्त येत होता.. हळूहळू भीतीची अदृश्य कट्यार काळीज चिरत गेली....हा फक्त पाण्याचा आवाज नव्हता.. दुसरच काही... वेगळं.. अमानवी.. कदाचित मानवीच.. त्या निर्मनुष्य अंधाऱ्या जागी तो सूक्ष्म मानवी आवाज जीवाचा थरकाप करत होता.. आता आवाज स्पष्ट येत होता.. आवाज कसला ते भेसूर रडणे होते लहान मुलाचे.. अगदी प्राणान्तिक रडणे... इतकं प्राणान्तिक की डोळ्यातून पाण्याऐवजी रक्त यावं इतकं प्राणान्तिक..
मी तसाच थिजून तिथेच बसून... एक अमानवी शक्ती माझ्या नजरेला त्या बेताल प्रवाहाकडे खेचली जातेय.. रोरावत जाणाऱ्या त्या पाण्यात मला दोन हात दिसत आहेत.. छोटे.. लहान मुलाचे हात.. कसला तरी आघात झेलताना असाह्य झालेले कोवळे हात.. आता फक्त हात नाहीत एक वेदनेने कळवळलेला लहान निष्पाप चेहरा.. कपाळावर मळवाट भरलेला भेसूर चेहरा.. सावळा चेहरा, कुरळे केस.. गोबरे गाल.. जणू चेहरा सांगतोय कित्येक वर्षापूर्वीची नरबळीची कहाणी.. जिवंतपणी पुरलेल्या निरागस मुलाची कहाणी..
त्या मुलाला वाचवलं पाहिजे.. बस्स.. त्याचे हात हातात घेऊन त्याला वर आणल पाहिजे.. बस्स काय वाट्टेल ते झालं तरी मी त्या मुलाला वाचवणार..
अमानवी शक्तीचा वेढा माझ्या भोंवती पडत चालला.. जिवंतपणी गाडला गेलेल्या त्या मुलाचा आत्मा मला तिकडे बोलवू लागला... गेलं पाहिजे मला गेलं पाहिजे..तो बोलावतोय.. साद घालतोय.. प्रतिसाद दिला पाहिजे...गेलंच पाहिजे मला.... पण अचानक...
... पुलापलीकडे अनंतनिवासात स्वामींची आरती चालू झाली... आरती रामचंद्रा.. स्वामी स्वरूपानंदा.. सोहंम हंसारूढ तुम्ही..
आरतीच्या सुमंगल, पवित्र लहरी गौतमीच्या पात्रावर फेर धरू लागल्या.. स्वामींची करुणामय मूर्ती मिटल्या डोळ्यासमोर प्रकट झाली.. ओम राम कृष्ण हरी..सगळा अघोर विरून गेला... ते हात, तो सावळा चेहरा... ते कुरळे केस अदृश्य झाले.. पाऊस थांबला... काळ्या ढगातून चंद्राने खाली वाकून पाहिलं आणि मी सायकलची चेन लावायच्या हेतूने खाली वाकलो...
... चेन पडलीच नव्हती....
समाप्त (काल्पनिक))
प्रशांत