Ad

Saturday, 12 April 2025

ये ना..

ये ना...

देहाच्या हिंदोळ्यावर
वासना झुलतात मनसोक्त
वर वर सगळी संयम समाधी
आत निनादते कामसूक्त

या पेशींना कसे आवरू
जन्म जन्माच्या या भुकेल्या
स्वप्नातच कोमेजून गेल्या
वासनांच्या कोमल कळ्या

अजून सुरू नाही मैफल
अजून सा कुठे लागला
तन जागेवर मन समेवर
चंद्र एकला मातला मातला

मिठीत रिक्त होण्या तुझ्या
पेशी पेशी आतुर झाल्या
घे ना सामावून खोल मला
लाख सतारी आत वाजल्या

अनावृत्त नाजूक देहास तुझ्या
का शाल लाजेची पांघरते
नजरबंदी करून माझीच
तू का उगा नजर चोरते

नको नको म्हणतेस खरी
हवेहवेसे तुला वाटते खरे
उन्हात बसलो जरी सदैव
चांदण्यात रमणे बरे

ये एकदा जवळ अशी तू
तोड लाजेचे सर्व पहारे..
गात्रात भरून घे ऊब जराशी
विझण्या अगोदर देह निखारे

-@शांत ☺️

Friday, 4 April 2025

श्वास माझे ऐक ना...

श्वास माझे ऐक ना...

नकोत शब्द उगाच
श्वास माझे ऐक ना
बोलू कशाला उगाच
डोळे हे बोलतील ना

आस स्पर्शाची कशाला
नजरबंदी ही पुरेशी
तू फक्त जवळ रहा
चांदणे उन्हाचे होईल ना..

ही बट अवखळ तुझी
कितीदा येई गालावर
किती सावरून घेशील
तोल किंचितसा ढळू दे ना

बोलू नकोस काहीच
ही शांतता मखमली
शब्दाविना गझल माझी
फक्त नजरेने ऐक ना

हे मौन किती बोलते
का उगा शब्द उधळायचे
नको ना अशी रोखून पाहू
लटकेच मला रोख ना

-@ प्रशांत..❤️

Thursday, 3 April 2025

पॉझिटिव्ह एकांत..

पॉझिटिव्ह एकांत..

मला हवाय
पॉझिटिव्ह एकांत..
एकांतात पाहायचाय मला,
माझ्यातलाच आकांत..

माझा माझ्याकडे
खोल खोल प्रवास..
मोहाचे अलवार पापुद्रे
अलगद दूर करत..
मी माझ्यातच केलेला
अखंड सर्वदिशा प्रवास..

माझेच नकली मुखवटे
पार करत करत..
त्या पेशीपर्यंत जायचंय
जी असेल निखळ निरागस
लखलखीत सोन्यासारखी..

शब्दांकडून निःशब्दाकडे
पार्थिवाकडून अपार्थिवाकडे
जडाकडून चैतन्याकडे..
अखंड प्रवास करायचाय..

देहांच्या मोहक चौकटीपलीकडे
खूप काही आहे..
देहाचे देहाला दिलेले उत्तर
कापुसकोंड्याचा शाप आहे
पार्थिवाचे मोहक कलेवर
शेवटी ते कलेवरच आहे..

पडलेले प्रश्न
त्याची साचेबद्ध उत्तरे
पुन्हा तेच प्रश्न
तीच तीच उत्तरे..
जिथे प्रश्न नसतील
उत्तरांना प्रश्न नसतील
काय उत्तर असेल ?
हा प्रश्न नसेल 
असा एकांत हवाय मला
पॉझिटिव्ह एकांत..
एकांतात पाहायचाय मला,
माझ्यातलाच आकांत..

© प्रशांत..

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...