Ad

Thursday, 24 October 2024

गुगली#१

गुगली # १ 

" अग शोभा तू आलीस म्हणून कार्यक्रमाला शोभा आली बघ नाहीतर गेल्या वर्षी तू नव्हतीस आणि कार्यक्रमाची अगदी शोभा झाली होती..तुला निमंत्रण न देणे आयोजकांना अजिबात शोभलं नव्हतं बघ गेल्या वर्षी "...आयोजिका कसल्या ग नुसत्या शोभेच्या बाहुल्या आहेत बाहुल्या"..शोभना फणकाऱ्याने शोभाशी बोलत होती..

- प्रशांत 😊

Monday, 21 October 2024

अथांग..आणि अनंत

अथांग आणि अनंत..

...माणसाच्या मनाचा थांग लागत नाही हेच खरे..कधी तरी आयुष्याला यु टर्न मिळतो..आणि आपल्याच माणसाचे वेगळे रंग आणि रूप समोर येते...तेव्हा मूल्यांवरचा विश्वास उडतो..श्रद्धा डळमळीत होते.. शब्दांनी सजवलेले भावविश्व बघता बघता पाचोळ्यागत उडून जाते..उघडे नागडे वास्तव झगझगीतपणे समोर येते..सगळी गृहीते धडाधड कोसळून पडतात..देव निरर्थक आणि दैव हेच वास्तव पुन्हा पुन्हा  अधोरेखित होते..सगळ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे नशिबाच्या पुस्तकात सापडतात ..ते पुस्तक उघडलं की थोडा सुकून मिळतो..हसण्याचा अभिनय करावा लागतो..पण इलाज नाही  सगळे अभिनयच करतात  नाहीतरी..
       गरजा पूर्ण करण्याचे म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे नाते ..असेच ना..?...हे नात्यांचे व्यसनच माणसाला एकमेकांत गुंतून ठेवते..त्याला प्रेमाचे रंग फासले की ते जरा बरे दिसते. ...माणूस मेल्यानंतरची सगळी रडारड..गरजा पूर्ण करणारा सोर्स बंद झाला म्हणून असते का ? हा एक कायम अस्वस्थ करणारा प्रश्न..तो कधी छळतो कारण तो तथाकथित नैतिकतेच्या चिंधड्या उडवतो..तर कधी सुखावतो कारण तो सत्याच्या जवळ नेवून ठेवतो..बिटविन द लाईन चे अर्थ उलगडून सांगतो..शब्दांचा पोकळ फाफटपसारा  दूर होऊन आयुष्य जसे आहे तसे दिसू लागते..जसे हवे तसे दिसण्यापेक्षा जसे आहे तसे दिसणे केव्हाही चांगले नाही का?..

-प्रशांत

Tuesday, 15 October 2024

झपाटलेला वड..

वैधानिक सूचना-केवळ मनोरंजन हेतू,अंधश्रद्धा प्रसाराचा उद्देश नाही..

झपाटलेला वड...
   © लेखक- प्रशांत शेलटकर

" ...त्या वडाच्या झाडावर म्हणे अतृप्त आत्मे असतात..अवेळी वडाखालून जे जातात..ते म्हणे झपाटतात..अवेळी म्हणजे केवळ रात्री नव्हे बरं का..भर दुपारी पण त्या वडाने लोकांना झपाटवले होते म्हणतात...
    मरो आपल्याला काय..माझा काय त्याच्यावर विश्वास नाहीये..म्हणे अतृप्त आत्मे..अस काही नाही ..माणूस मेला की सगळा खेळ खल्लास.. देहच नाही तर अवयव नाही आणि अवयवच नाही तर वासना तरी कुठून?...भंपक लेकाचे. 
     असो मला जायचं आहे आज तालुक्याला ..या गावात ग्रामसेवक म्हणून आठच दिवस झालेत मला..या आठवड्यात मला फक्त आणि आणि फक्त त्या वडा बद्दल ऐकायला आलंय.. म्हणे झपाटलेला वड..सावध रहा भाऊसाहेब..
      झुरळ झटकावा तसा मी तो विषय झटकून टाकलाय..आणि आता मी निघालोय.. बारा वाजून गेलेत..एक ची एसटी पकडायचीय मला..झप झप चालतोय मी..सूर्य डोक्यावर.. उन मी म्हणतंय..सगळीकडे वैशाख वणवा पेटला आहे..मास्तरांच्या दटावणीने पोरं चिडीचूप बसावित तशी सूर्याच्या काहिलीन सर्व झाड झुडपं चिडीचूप..झालीत..पाखरं पण घरट्यात,झाडाच्या पानातपानात चोची घालून दम खात बसलेली..पाया खालच्या लाल वाटेचा फोफाटा झालाय..घाम टिपत टिपत मी चालतोय..आता कुठे लांबून तो झपाटलेला वड दिसायला लागलाय..अजून लाम्ब आहे तसा ..पण दिसतोय..त्याचा विस्तारच आहे ना तसा.. मैलावरून पण दिसतो तो..सगळं वावर वैशाख वणव्यात होरपळत असताना हा आपला हिरवागार..जणू जगाशी देणं घेणं काही नाही..आता तो नजरेच्या टप्प्यात आहे..हाच तो म्हणे झपाटलेला वड..

इतक्यात एक वावटळ वडापाशी तयार झाली आणि क्षणात सगळा धुरळा..पाला पाचोळा शंकूचा आकार घेत गगनाला भिडला क्षणभर  पिसाटत वडा समोर नाचला आणि नाहीसा झाला..इतक्या लांबून सुद्धा मला तो दिसतोय.. भयाचा एक सूक्ष्म विषाणू माझा ताबा घेतोय का?
   " छे छे ही तर भौगोलिक घटना..यात घाबरायचं काय?..उष्ण हवा वर जाते थंड हवा खाली येते. अभिसरण होत..बस्स भोवरा तयार होतो..मीच माझी समजूत घालत चालतोय.. समजूत? ?मी हा शब्द का वापरतोय.. भयाच्या विषाणूचे म्युटेशन होतय की काय?..विवेकाच्या दरवाजावर भयाच्या थापा ऐकू येत आहेत..तरीही आतल्या विवेकाने जागा सोडली नाही अजून..अतींद्रिय शक्ती वगैरे काही नाही,भूत पिशाच काही नाही, अतृप्त आत्मा काही नाही...माणूस मेला खेळ खल्लास..भूत बित झूठ..केवढ्या मोठयानी बोलतोय ना..अफेन्स वरून मी डिफेन्स वर आलोय काय? 
     वड आता जवळ आलाय..किती अफाट विस्तार आहे ना याचा.. पारंब्या कुठल्या आणि आणि मूळवृक्ष कोणता तेच कळत नाहीये...याची लक्षावधी पाने किती ऑक्सिजन उत्सर्जित करत असतील ना..आता एकदम गार वाटतय..उन्हातून आल्यामुळे असेल कदाचित.. छान वाटतय..इथे बसावस वाटतय.. वाटतय कशाला बसलोच ना मी..माझ्या नकळत आणि लवंडलोयसुद्धा...वरती असंख्य पाने वरची निळाई रोखून धरत आहेत..तरीसुद्धा पानांची नजर चुकवून आकाशातील निळाई खाली ठिबकतेय..उन्हाचे कवडसे इकडे तिकडे नाचत आहेत..का कोण जाणे नदी काठी बगळा भक्ष्य टिपण्यासाठी एकदम स्तब्ध रहातो तसा हा वड एकदम स्तब्ध झालाय..पानांची सळसळ थाम्बत जातेय..नव्हे थांबलीच...इतर झाडे नॉर्मल आणि हा वड नॉर्मल वाटत नाहीये.. एक अघोर छाया वडाला ग्रासून टाकतेय का..भयाच्या विषाणूचे म्युटेशन मल्टिपल रेशोत वाढतंय.. श्वास वाढत चाललेत माझे..आणि हे काय एक श्वास घेतल्यावर दुसरा श्वास कोण घेतंय? माझ्या उच्छवासा बरोबर दुसराही उच्छवास ऐकू येतोय..बाजूला कोणीच नाही..तरीही माझ्याबरोबर ही श्वासांची आवर्तने कोणाची चालली आहेत..??

क्रमशः

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Friday, 11 October 2024

प्रार्थना...

प्रार्थना...

प्रार्थना म्हणजे सदविचारांचे चिंतन अशी व्याख्या स्वामी विज्ञानानंद यांनी केलीय..

सगळ्या प्रार्थना ईश्वराला समर्पित असतात.ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान हे देखील ईश्वराकडे म्हणजे विश्वात्मक देवा कडे केलेली व्यापक मानवतेची केलेली प्रार्थनाच आहे..


परंतु केलेल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात का? देव त्या ऐकतो का?आपले स्वार्थ देवाला का सांगावेत? आणि देव तरी सगळ्यांच्या परस्परविरोधी इच्छा पूर्ण करेल? सगळं काही कर्मगतीने होत असेल तर देव त्यात हस्तक्षेप करील का? मग आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला का वेठीस धरायचे?
   असे अनेक प्रश्न बुद्धिवादी मनाला पडू शकतात..देव म्हणजे  तुम्ही जे मागाल ते मिळायला मशीन नसते..देव म्हणजे आपल्या मनात आणि बाहेर निसर्गात असलेली  अबोध स्वरूपात असलेली अमूर्त शक्ती..ऊर्जा ...ती फक्त उर्जाच असते, माणसाने तिला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे स्वरूप दिले ते ती स्वतःला अनुकूल किंवा प्रतिकूल आहे या वरून..
   माणूस हा विचार करणारा प्राणी आहे...विचार म्हणजे एक प्रकारची उर्जाच..विचार करताना मेंदूच्या काही पेशी ऍक्टिव्ह होतात..जसा विचार केला जातो तसा परिणाम आपल्या शरीरावर होतो तसाच आपल्या मानसिकतेवर आणि बाहेरच्या वातावरणावर होतो तसेच सहवासातील माणसांवर होतो. 
    ज्यावेळी माणूस ध्यान करत असतो ,त्यावेळी अल्फा वेव्हजचे उत्सर्जन मेंदू करत असतो या पॉझिटिव्ह वेव्हज असतात.
   सगळी माणसं शरीराने वेगवेगळी असली तरी ती एकमेकांशी कनेक्ट असतात..केवळ माणसं नव्हे तर प्राणी, पक्षी, वनस्पती, निर्जीव वस्तू एकमेकांशी कनेक्ट असतात..याचे कारण चेतन.. आपण सर्व त्या वैश्विक चेतनेचे पार्थिव आविष्कार आहोत..
    ज्यावेळी माझ्या मनात सकारात्मक विचार येतात त्यावेळी माझ्या मेंदूतून उत्सर्जित होणाऱ्या लहरींची फ्रिक्वेन्सी आणि नकारात्मक विचार करताना उत्सर्जित होणारी फ्रिक्वेन्सी वेगळी असते. ती एकाच वेळी आपल्या शरीरावर परिणाम करते आणि त्याच वेळी भवतालातल्या सेम फ्रिक्वेन्सीला मॅच करते..म्हणून समविचारी माणसे एकत्र येतात
     ज्यावेळी मी म्हणतो की सर्वांचे कल्याण होवो,सर्वांचे भले होवो..सर्व सुखी होवोत..सर्वांना आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होवो त्यावेळी मेंदूतून ज्या अल्फा लहरी उत्सर्जित होतात त्याचा परिणाम शरीरातील अब्जावधी पेशींवर होतो तसेच तेच विचार आसमंतात प्रक्षेपित होतात..सेम फ्रिक्वेन्सी मॅच होते..त्यातून आपण समविचारी लोकांच्या सहवासात येत जातो..आपल्याला आपसुकच चांगली माणसे भेटत जातात..
    सगळ्या प्रार्थना ईश्वराला संबोधित  केल्या जातात तो ईश्वर सर्व विश्व व्यापून आपल्यात व्यापून राहिलेला असतो.. म्हणजे आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा.. आपल्यातल्या ईश्वराची प्रार्थना करत असतो...आपल्यात ईश्वर आहे ही भावना सुखद नाही का? आणि ती भावना असेल तर आपल्यावर त्या अंतःस्थ ईश्वराचे लक्ष आहे या भावनेने आपण वाइट कर्म करायला धजवणार नाही हा एक वेगळा फायदा..दुसरे असे की जसा आपल्यात ईश्वर आहे तसा तो इतर माणसात आहे ही भावना माणसाला माणसाशी जोडते आणि अधिक व्यापक करते..त्याही पुढे जाऊन ईश्वर सगळ्या चराचरात आहे ही भावना म्हणजेच मोक्ष आहे..जशी जशी अध्यात्मिक प्रगती होत जाते तसा मी पणा कमी होत जातो कारण मी पणा स्वामीत्वाच्या भावनेतून येतो..एकदा देहाचे स्वामीत्व ईश्वराकडे सोपवले की अहंकार संपतो..
     आता एक प्रश्न उरतोच भले आपल्या इच्छा चांगल्या असतील तर त्या ईश्वर पूर्ण कशा करेल? किंवा त्याला वेठीला का धरायचे? कर्माचे फळ ज्याला त्याला मिळतेच मग त्याला देव काय करणार ? अमुक दे ,तमुक दे अस म्हणून खरच तस होणार का?
    याचे उत्तर थोडं वेगळे आहे जसे कर्म तसे फळ ,पण जशी बुद्धी तसे कर्म आणि जशी कर्म तशी बुद्धी..असे हे ट्विस्ट आहे..
    आधी बुद्धी निर्माण होते आणि त्यानुसार कर्म केले जाते ही एक बाजू ,आणि जशी कर्म केली जातात तशी बुद्धी होत जाते..ही दुसरी बाजू  म्हणून सज्जनांच्या संगतीत बुद्धी आणि कर्म दोन्ही चांगली होतात..
    ज्यावेळी मी मनापासून मी म्हणतो की हे ईश्वरा ( अंतःस्थ ईश्वर) सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,सर्वांचे भले कर ,कल्याण कर, सर्वांना सुखात ,आनंदात ,ऐश्वर्यात ठेव ..आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे..ही प्रार्थना नीट वाचल्यास असे लक्षात येईल की यात एकही शब्द नकारात्मक नाहीये.. प्रत्येक शब्द पॉझिटिव्ह आहे.. शब्द एकटे येत नाहीत ते भावना घेऊन येतात..आणि ते शरीरावर परिणाम करतात..चिंच म्हटलं की तोंडाला पाणी सुटते..भूत म्हटलं की अंगावर शहारा येतो..तसे सुख ,आनंद ऐश्वर्य हे शब्द पॉझिटिव्ह भावना घेऊन येतात..त्यातील प्रत्येक शब्दाला अनेक छटा आहेत. सुखाचे अनेक प्रकार,आनंद अनेक प्रकारचे, ऐश्वर्य बुद्धीचे,धनाचे,शरीराचे पण असतेच..
    ज्यावेळी मी हे शब्द मी उच्चारतो तेव्हा माझ्या शरीरात ल्या असंख्य पेशी पॉझिटिव्ह एनर्जीने भारल्या जातात..आणि जेव्हा मी प्रार्थनेचे सुरुवात हे ईश्वरा अशी करतो तेव्हा मी माझ्या अंतस्थ ईश्वराला साद घालतो.. त्याच्या साक्षीने माझी सगळी कर्मे करतो तेव्हा माझी कर्मे सुधारतात त्याचवेळी बुद्धी सुद्धा सदबुद्धित रुपांतरीत होते..सुख डोक्यात जात नाही आणि दुःख टोचत नाही.कारण आतला साक्षी जागा असतो..
     अनेकांनी एकाच वेळी केलेली प्रार्थना समगती स्पंदन अर्थात रेझोनान्स तयार करते आणि त्याचा इफेक्ट शतगुणीत होतो..
     जाता जाता....

शंकर म्हणतो तथास्तु म्हणजे काय याचा अर्थ परवा परवा पर्यन्त लागत नव्हता..शंकरच का विष्णू किंवा गणपती किंवा अन्य देव का नाही?
     विचार करता करता सहज उत्तर मिळून गेलं...शंकर म्हणजे अंतर्मन..सबीकॉन्शस माईंड..शंकर जसा देव आणि दानव असा भेद करत नव्हता जो त्याची भक्ती करतो त्याला तथास्तु म्हणत होता तसेच आपल्या अंतर्मनाला चांगले वाईट कळत नाही ते तथास्तु म्हणत जाते..देवांचा देव महादेव जसा शक्तिमान तसे कॉन्शस माईंड च्या अनेक पट सबकॉन्शस माईंड शक्तिमान..
म्हणून शंकर म्हणतो तथास्तु..

सर्वांचे कल्याण होवो..

तथास्तु... शुभम भवतु..

-प्रशांत शेलटकर..

Friday, 4 October 2024

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते...

ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..
    बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक समजाला छेद देणारे हे वाक्य आहे..शालेय जीवनापासून ते आज पर्यंत " तुला मार्क्स किती मिळाले?" या प्रश्नाच्या उत्तराभोवती आपल्या बुद्धिमत्तेच्या कल्पना फिरत राहिल्या आहेत.
    बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार आहेत पण त्यापैकी भाषिक, गणिती आणि तर्कशास्त्रीय बुद्धिमत्तेभोवती सगळी एज्युकेशन सिस्टम फिरत राहिल्याने इतर बुद्धीमत्ता या बुद्धिमत्ताच नाहीत.अशा कल्पना समाजात अजूनही आहेत.आता मात्र ज्ञानरचनावाद सारखे नाविन्यपूर्ण बदल आपल्या शैक्षणिक धोरणात होत आहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे.
    बुद्धिमत्तेची प्रत्येक शेड वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळी असते. डिमांड आणि सप्लाय च्या लॉ नुसार त्यात बदल होत असतात..सायन्स शाखेला पूर्वी आणि आजही महत्व आहे पण पूर्वी कॉमर्स शाखा तितकीशी लोकप्रिय नव्हती. "मध्यममार्की" विद्यार्थी कॉमर्स शाखेत प्रवेश घेत. पण आता इ-कॉमर्स मुळे कॉमर्स स्ट्रीम चे महत्व वाढले आहे. स्पेसिफिक स्किलला सुद्धा खूप डिमांड आहे.सोशल सायन्स   मध्ये पदवी घेऊन तरुणांना एन. जी.ओ मध्ये लाखाचे पॅकेज मिळत आहे.
     शारीरिक गुणवत्तेला पण खूप महत्व आले आहे. सगळेच बौद्धिक कौशल्याच्या मागे लागल्या मुळे जिथे शारीरिक कौशल्य लागते अश्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याने तिथे डिमांड वाढली आहे. आज मजुरीचे दर वाढले आहेत. ते हया माझ्या माहितीतले एक उदाहरण.. आमच्या ऑफिस मध्ये साफ सफाई करणारी बाई सकाळी 7 पासून दुपारी तीन पर्यंत वेगवेगळया सरकारी कार्यालयांत आणि घरात साफसफाई करणारी बाई महिन्याकाठी 30000 कमावते. त्यात सरकारी कार्यालयाना ज्या सुट्ट्या लागू असतात त्या तिलाही लागू..
     केवळ जेवण करून देणाऱ्या महिलाही हजारोच्या पटीत कमवतात.पंक्चरवाले एका पंक्चरचे 100 रुपये घेतात.मुंबईत एक तरुण आहे तो श्रीमंतांच्या घरचे कुत्रे रोज तासभर फिरवून आणायचे महिन्याला दहाहजार घेतो.त्याचे महिन्याचे उत्पन्न एक लाखाच्या घरात आहे. केवळ बुद्धिमत्ता आणि कौशल्य असून चालत नाही. दुर्मिळता खूप मॅटर करते..
     कौशल्य हा एक महत्वाचा फॅक्टर राहिला आहे. कौशल्य म्हणजे बुद्धिमतेने लिहिलेला एक छोटासा प्रोग्राम असतो. वेळोवेळी त्यात अपडेशन केलं की माणूस स्पर्धेत टिकून राहतो.कौशल्य बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे असते. एसी मध्ये एका जागेवर तासनतास स्क्रीन वर डोळे ठेवून मेंदूला कामाला लावणारे आयटीयन्स आणि चाळीस/पंचे चाळीस डिग्रीत रस्त्यावर आणि शेतात काम करणारे मजूर यांच्या स्किल मध्ये फरक फक्त बौद्धिक आणि शारीरिक स्किलचा..बाकी गुणवत्ता एकच.
    समाजासाठी सगळे एकमेकांना पूरक असतात. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असे काही नसते. माणसाने " स्व" सुखावण्या साठी अशा आभासी उतरंडी रचल्या आहेत ..बस्स एवढंच..

-प्रशांत शेलटकर
 8600583846

बोका,बायको आणि मी..

बोका,बायको आणि मी..

बाजूने माझ्या
एक झुळूक गेली
थेंब अत्तराचे
शिंपडून गेली..

मन खुळ्यागत
मग मोगरा झाले
छेडून मनसतार
कोण निघून गेले?

मान वळवून मागे
मग भागच पडले
अन काळजात लख्ख
लाख दिवे लागले

किती बदलली ही
मन अचंबित झाले
या गरब्यात बायकोचे
किती रूप पालटले

हीच का मम पत्नी
मन शंकीत मग झाले
क्षणात माझे सुमार
रूप तरळून गेले..

कुठे ही इंद्राची परी
अन कुठे मी तट्टू
तरी हिचे मन का
माझ्यावर झाले लट्टू

कुठे ही सुरेल बासरी
कुठे मी गावठी पावा
विसंगतीच ही इतकी
का दिलीस रे देवा?

विचार करता करता
मी बेडवरून पडलो
पडलो तरी कोण जाणे
मी गालातच हसलो

कुस बदलून परी वदली
काय रे आवाज हा कसला
जा झडकरी किचनमध्ये
तो बोका फार माजला

तू झोप शांत आता
बोका नव्हे मीच तो
देऊन एक जांभई
मी पुन्हा गाढ झोपतो

-- प्रशांत शेलटकर
   8600583846

Tuesday, 1 October 2024

नियती..

नियती....

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या तरी अगम्य कर्माचे हिशेब नियती आपल्याकडून फेडून घेते.. पण त्याचे हिशेब आपल्याला देत नाही..अपूर्णतेची ठसठसती जखम प्रत्येकाच्या काळजाला देते नियती..प्रत्येकाची वेदना वेगळी..त्याची तीव्रता वेगळी..तथागत गौतम बुद्ध सांगून गेले की जग दुःखमय आहे कारण ते अपेक्षांच्या पायावर उभे आहे.. अपेक्षा सोडली तर दुःख होत नाही..गीतेत कृष्ण तेच सांगतो कर्म करीत रहा.. अपेक्षा करू नका..पण हे खूप कठीण असतं.. साधा कुणाचा पाय चुकून जरी लागला तरी आपल्याला समोरून सॉरी येणे अपेक्षित असते..मग संसार करताना किती प्रकारच्या अपेक्षा निर्माण होत असतील..?
      पण थिअरी काहीही असो..आपली दुःख आपणच समजू शकतो..इतरांच्या फुंकरी वेदना कमी करतात..पण जखमा बऱ्या करू शकत नाही..म्हणून मी कोणाला सल्ले देत नाही..आपण सगळेच शर शय्येवर पडलेले भीष्म आहोत..आणि तितकेच अगतिकही आहोत..शेवटी आनंदी असणे म्हणजे काय तर दुःख लपवण्याचे कौशल्य साध्य करणे..ते एकदा साध्य झाले आयुष्य सार्थकी लागते..

-© प्रशांत...

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...