Ad

Saturday, 23 March 2024

एकतर्फी..

एकतर्फी....

प्रेम हे एकतर्फीच असतं.. 
कोणी तरी एक जण ड्रायव्हर 
दुसरा फक्त प्रवासी असतो....

प्रेम हे एकतर्फीच असतं.. 
एक अगदी बेफिकीर
दुसरा अगदी पझेसिव्ह असतो

प्रेम हे एकतर्फीच असतं
एक जण करतो नखरे
दुसरा मात्र रडत बसतो..

प्रेम हे एकतर्फीच असतं
एकाची उगाच घालमेल
दुसरा मात्र  बिनधास्त असतो..

प्रेम हे एकतर्फीच असतं
एकाचीच भरते डायरी
दुसऱ्याच पान कोर असतं

प्रेम हे एकतर्फीच असतं
अलीकडे  असतो वसंत
पलीकडे थंड शिशिर असतो


@ प्रशांत

Wednesday, 20 March 2024

कलेवर

कलेवर..

वाट चूकली आणि थकली
प्रवास अर्धा झाला
तरी कळेना कुठे चाललो
गाव कोणता आला ?

आता कुठली स्वप्ने आणि
कुठल्या आता प्रेरणा
चालता चालता मोडून पडला
ओझ्यासकट थकला कणा..

तू लढ म्हणणारे गुरुजी
केव्हाच मागे गेले..
पाठीवरचे हात प्रेमळ
आता नाही उरले..

निरर्थकाकडून निरर्थकाकडे
प्रवास निरर्थक चालला
रण तुडवत आणि रक्ताळत
एक मुसफिर चालला

जगण्याचे फक्त श्वास लांबले
 उरली जिंदगी बिनकामाची
आता ना कुठले ध्यास उरले
वात विझत आली दिव्याची

गर्दीतल्या एकटेपणाची
भीतीच दाटून येते अनावर
भेटतील का फक्त चौघेजण
उचलून नेण्या माझे कलेवर

@ प्रशांत

Saturday, 9 March 2024

समांतर

समांतर...


मी....
सुखातला नास्तिक
आणि दुःखातला आस्तिक 
तरीही तिच्या निरुपद्रवी श्रद्धेपुढे,
मी नतमस्तक ...

माझी बायको..
सार्वकालिक आस्तिक
माझ्या लॉजीकमध्ये
बसत नाही तिचे आस्तिकत्व
माझ्या सडेतोड प्रश्नांना
नसतात तिच्याकडे उत्तरे..
पण उत्तरादाखल 
ती फक्त देवा समोर हात जोडते
समाईचा मंद प्रकाश..
तिच्या चेहऱ्यावर पसरलेला असतो
तिचे मंद स्मित..जोडलेले हात
माझे लॉजिक पार विरघळते..

लॉजीकली जिंकलो तरी
तिच्या सारखा निरागस
हसलो नाही मी कित्येक दिवस
तीर्थाने ओला झालेला हात
ती अलगद फिरवते केसातून
आणि गोड हसून म्हणते
" हा घ्या प्रसाद..."

तेव्हा मी माझ्यातला नास्तिक
शाबूत ठेवून 
सलाम करतो तिच्या
निरागस अस्तिकतेला..
मला आहे ना अधिकार
माझे नास्तिकत्व जपायचा
मग तिला का असू नये
हक्क तिचे आस्तिकत्व जपण्याचा

प्रश्न तर संपत नाहीत..
आणि उत्तरे अमर नाहीत
प्रश्नांना वळसे घालून
पुढे जाणे पटत नाही..
प्रश्नांचे दंश सहन करीत
एक अस्वस्थ आयुष्य..
पुढे सरकत रहाते..
आणि त्याला समांतर
तिची अफाट श्रद्धा
चालत रहाते चालत रहाते..
क्षितिज पुढे पुढे जात रहाते..
पुढे पुढे जात रहाते..


@ प्रशांत

Saturday, 2 March 2024

जीवखडा

जीवखडा..

एके रात्री मेलाच तो
सकाळीच कन्फर्म झाले
आणि संध्याकाळी स्मशानात
प्रेत त्याचे जळले..

कवटी फुटली तसे
लोक घरी गेले
जीवखडा बनून त्याचे
भूत दारात बसले

येणारे येत होते
जाणारे जात होते
जीवखड्यावरचे भूत
दारात शांत बसले होतें

नसलेल्या कानांनी
ऐकत होता तो आक्रोश
रडता रडता पडत होती
बायको त्याची बेहोष

हौशे, गवशे, नवशे
सगळेच येत होते
थोडेच जण रडत होते
बाकीचे नाटक करत होते

जगताना पटली नाही
ती मेल्यावर पटली
ढोंगीपणाची खात्री
जळल्यावर कळली

बारावे झाले तसे
त्याने केले प्रस्थान
आता थेट वर्षश्राद्धाला
त्याने केला नक्की प्लँन

वर्षांनंतर आला तो
परत आपल्या घरी
हसत खेळत बागडत
होती मंडळी सारी

गेट टू गेदर करायलाच
जमले सारे गणगोत
भिंतीवर त्याचा फोटो
तेवत होती मंद ज्योत

सगळ्या गोतावळ्यात
ती मात्र एकटी होती
नजर चुकवून सर्वांची
पदराने डोळे पुसत होती

जाण्याने त्याच्या 
एकच माणूस दुःखी होता
बाकी सगळा काफ़िला
आनंदाने डुलत होता

कोण नसत कोणाचे
फक्त जोडीदार आपला असतो 
आपल्या अकाली जाण्याने
त्यालाच फरक पडणार असतो

- प्रशांत

जीवखडा

जीवखडा..

एके रात्री मेलाच तो
सकाळीच कन्फर्म झाले
आणि संध्याकाळी स्मशानात
प्रेत त्याचे जळले..

कवटी फुटली तसे
लोक घरी गेले
जीवखडा बनून त्याचे
भूत दारात बसले

येणारे येत होते
जाणारे जात होते
जीवखड्यावरचे भूत
दारात शांत बसले होतें

नसलेल्या कानांनी
ऐकत होता तो आक्रोश
रडता रडता पडत होती
बायको त्याची बेहोष

हौशे, गवशे, नवशे
सगळेच येत होते
थोडेच जण रडत होते
बाकीचे नाटक करत होते

जगताना पटली नाही
ती मेल्यावर पटली
ढोंगीपणाची खात्री
जळल्यावर कळली

बारावे झाले तसे
त्याने केले प्रस्थान
आता थेट वर्षश्राद्धाला
त्याने केला नक्की प्लँन

वर्षांनंतर आला तो
परत आपल्या घरी
हसत खेळत बागडत
होती मंडळी सारी

गेट टू गेदर करायलाच
जमले सारे गणगोत
भिंतीवर त्याचा फोटो
तेवत होती मंद ज्योत

सगळ्या गोतावळ्यात
ती मात्र एकटी होती
नजर चुकवून सर्वांची
पदराने डोळे पुसत होती

जाण्याने त्याच्या 
एकच माणूस दुःखी होता
बाकी सगळा काफ़िला
आनंदाने डुलत होता

कोण नसत कोणाचे
फक्त जोडीदार आपला असतो 
आपल्या अकाली जाण्याने
त्यालाच फरक पडणार असतो

- प्रशांत

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...