शहाणपण...
सतत सांगायचं असतं
सतत बोलायच असतं
येन केन प्रकारेण,
सतत चर्चेत रहायच असतं
विषय समजो ना समजो
आपल मत असलंच पाहिजे
मता-मतांच्या गोधडीला
आपलं ठिगळ असलंच पाहिजे
सगळ्यातल सगळंच कळत
माहितीच माहिती चोहीकडे
गल्ली पासून दिल्लीपर्यंत
सगळ्यांनाच शिकवींन धडे
आपले आपले कळप
आपले आपले झेंडे
जयघोष करीत चालले
बिन डोक्याचे तांडे..
कळपात तर मज्जाच मज्जा
सगळंच सोपं होतं..
गर्दी नेईल तिकडे
आपोआप जाणे होते
गर्दीची पण असतेच हो
एक बेधुंद बेफाम नशा
नेता सांगेल तीच असते
गर्दीची पूर्व दिशा..
अहोरात्र असेच आपण
व्यक्त होत राहू
उसने पासने का होईना
दळण दळत राहू ....
जणू आपण नसलो तर
जगबुडीच होणार आहे
आपल्या वाचून जगाच
हर घडी अडणार आहे..
खुळेच हो तुम्ही आम्ही
कोण कोणाला विचारतो
लंगडे असले तरी जो तो
आपलेच घोडे दामटवतो
प्रत्येकवेळी बोललंच पाहिजे
मित्रा अस काही नसतं.
कधी कधी न बोलण्यातच
शहाणपण लपलेले असतं
© प्रशांत शेलटकर