Ad

Friday, 30 June 2023

रोल..

रोल...

बस्स आयुष्यात आपला
रोल कळला पाहिजे...
नेमकं काय मिळवायचं
याचा "गोल" कळला पाहिजे...

नसतात सगळेच आपले
नसतोच आपण कोणाचे
बहुतेक आप्त आणि मित्र
असतात फक्त कामाचे
नात्यांचे मित्रा  अचूक
"मोल" कळले पाहिजे
बस्स आयुष्यात आपला
रोल कळला पाहिजे...
नेमकं काय मिळवायचं
याचा "गोल" कळला पाहिजे...

गर्दी बेफाम सभोवतीची 
आपली असेलच अस नाही
प्रसंगाला पाठीवर हात
फिरेलच अस नाही
आपले आणि परके
यातला "झोल" कळला पाहिजे
बस्स आयुष्यात आपला
रोल कळला पाहिजे...
नेमकं काय मिळवायचं
याचा "गोल" कळला पाहिजे...

उसनवार आयुष्य
आणि रेंगाळलेली जिंदगी
उडून गेले रंग आणि
उरली कुठे ताजगी
कधीतरी ....केव्हातरी
"आतला" बोल कळला पाहिजे
बस्स आयुष्यात आपला
रोल कळला पाहिजे...
नेमकं काय मिळवायचं
याचा "गोल" कळला पाहिजे...

-@ प्रशांत शेलटकर
      8600583846

Tuesday, 27 June 2023

शून्य

शून्य....

हवे हवेसे काही
नकोच आहे मला
नको नकोसे झाले
तरी खंत ना मला

वाहवा तर नकोच
उगाच फुगते छाती
उगा गाठावी उंची
तिथे पतनाची भीती

काहीच नाही मिळवले
हीच मिळकत माझी
सांगायचे काहीच नाही
हीच हकीकत माझी

मन मोकळे हलके हलके
अन खांदेही माझे मोकळे
कित्येक दिवसांनी कळते
श्वास माझे हलके मोकळे

किंचितही नाही आठी
झाला निषेधही निषिद्ध
एक अनाहत नाद गुंजतो
बाकी सर्व निरव स्तब्ध

शून्यातून शून्य उणे
बाकी उरते शून्य
जेव्हा काही उरतच नाही
तेव्हाच आयुष्य धन्य

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Thursday, 22 June 2023

स्क्रीनघाश्या...

स्क्रीनघाश्या...


फेसबुकवर किती मित्र
काय त्यांची हमी..
अडचणीच्या वेळी येतात
जवळचेच  कामी...

कशाला हवं रोजच
गुडमॉर्निंग आणि गुडनाईट
बघ ना समक्ष सकाळ 
ती असते का वाईट

दिवस रात्र स्क्रीन घासून
काय तुला मिळते..
लाईक आणि कमेंटीने
पोट कुणाचे भरते?

गल्लीत विचारेंना कुत्रं
अन देतो बायडनला सल्ला
सिलेंडर संपला  आणा 
बायको करते कल्ला

राजकारण हे गजकरण
म्हणाले होते अत्रे..
विचारून बघ स्वतःला
आपण आहोत का कुत्रे

तिरडी उचलायला
येतातच अखेर शेजारी
सगळं मिळत विकत पण,
 प्रेम नाही मिळत बाजारी

म्हणून सांगतो मित्रा तुला
ठेव तो बाजूला मोबाईल
कट्ट्यावर बसून बघ
वेळ कसा मस्त जाईल

स्क्रीनघाश्या नको होउस
उघड डोळे बघ रे नीट
फिल्टर लावलेले डीपी
खोटे गाल  अन खोटीच तिट

ती जेवते रे रोज भरपेट
तिची काळजी करू नको
जेवलीस का म्हणून तिची
उगाच चौकशी करू नकोस

माया आहे सगळी वेड्या
कोण कोणाचे नसते..
फुगा कितीही फुगला तरी
एक टाचणी पुरे असते

सोशल सोशल म्हणताना
लोक अँटी सोशल झाले
फेसबुकवरचे हजार मित्र
प्रसंगाला फक्त चारच आले

किती होशील एकलकोंडा
माझं माझं करशील..
वेळ आली की बॉडी तुझी
चार खांद्यावरून जाईल

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday, 19 June 2023

अलविदा...

अलविदा...

वार केलास खोलवर
ते एक बरे झाले
धुगधुगते श्वास माझे
क्षणांत एका थांबले..

मिणमिणता एक दिवा
उगाचच जळत होता
तू स्वतःच त्यास विझवले
हे एक बरे झाले
धुगधुगते श्वास माझे
क्षणांत एका थांबले..

दिसतो चुकार अश्रू
भर दिवसा उजेडी
अंधार पेरलास सभोवती
ते एक बरेच झाले
धुगधुगते श्वास माझे
क्षणांत एका थांबले..

लागते एक निमित्त
घडण्या वा बिघडण्याला
तू फक्त ते एक शोधले
ते एक बरेच झाले
धुगधुगते श्वास माझे
क्षणांत एका थांबले..

चुकल्या काही गोष्टी
हे कधीचे मान्य मला
पण क्षण सच्चाईचे
विसरलेस ते बरे झाले
धुगधुगते श्वास माझे
क्षणांत एका थांबले..

एक पणती शेवटची
तीही विझत चालली
आता भय न वादळाचे
किंचितही न तिला उरले
धुगधुगते श्वास माझे
क्षणांत एका थांबले..

वार केलास खोलवर
ते एक बरे झाले
धुगधुगते श्वास माझे
क्षणांत एका थांबले..

@ प्रशांत

Thursday, 15 June 2023

निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे...सोपं नाही भाऊ.

निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे...
सोपं नाही भाऊ..☺️

निराकाराची उपासना  हा प्रचंड गोंधळात टाकणारा शब्द आहे. निराकाराची उपासना नेमकी कशी करायची? बरं निराकाराला नाव तरी कसे देतात? सगळं जगच नेम अँड फॉर्म म्हणजे नाम रुपात असताना. निराकार ही संकल्पनाच चुकीची ठरत नाही का? आकाराची नकारात्मक व्याख्या म्हणजे निराकार..ज्याला आकार नाही तो निराकार हे बरोबर पण तो निराकार आकाराशिवाय कसा समजून घ्यायचा..की निराकार नावाचे काही अस्तित्वातच नसते??
    गंमत म्हणजे जे निराकाराची उपासना करतात त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर वेगवेगळे आकार असण्याची शक्यता असण्याची शक्यता जास्तच नाही का? जे आकाराची उपासना करतात त्यांचा हा गोंधळ होण्याची शक्यता खूप कमी ..उदा. गणपती म्हटलं की एका माणसासमोर आणि लाखो माणसां समोर गणपती हे एकच रूप उभे राहिल..पण शंभर माणसांसमोर  परमेश्वर निराकार आहे असे सांगितले तर ? प्रत्येकाच्या नजरेसमोर काही ना काही उभे राहीलच ना..मग निराकाराची संकल्पना तिकडेच फसत नाही का? म्हणूनच जे पंथ, धर्म देव निराकार आहे म्हणतात त्याना विविध प्रतीकांचा आधार घ्यावाच लागतो . हीच मोठी विडंबना आहे..नाही का?
    साकार उपासना तुलनेत सोपी आहे. अमूर्त संकल्पना चित्र किंवा शब्दात मांडली तर ती लगेच समजते. E=mc2 हे प्रमेय आइन्स्टाइनला अगोदर समजले पण त्याला ते सूत्रात मांडावे लागले तेव्हाच जगाला समजले..तसेच सर्व प्रेषितांना ,महात्म्यांना  जे ज्ञान प्राप्त झाले ते सामान्य माणसांना सांगताना एक पायरी खाली उतरावे लागले. त्या प्रेषितांच्या पश्चात त्यांचे  अनुयायी अनेक पायऱ्या उतरून खाली आले ही गोष्ट वेगळी..खरं तर हमाम मे सब नंगे.. पण प्रत्येक जण स्वतःकडे न पहाता इतरांकडे पाहत असल्याने त्याला सगळे नंगे असल्याचं दिसत..अस सगळ्यांचंच होत असल्याने आपण आपल्याकडे न पहाताही नंगे आहोत हे सिद्ध होत नाही का? तसेच आहे हे, आपण स्वतःला निराकारी समजत असलो तरी आपण स्वतः आकार आहोत, आपल्या उपासनेची प्रार्थना स्थळे आकारात आहेत,आपले धर्मग्रंथ आकारात आहेत. जितके खोल जाल तेवढे आणखी खोल जाल...आणखी आणखी खोल जाल..

-प्रशांत शेलटकर
 8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...