Ad

Saturday, 22 April 2023

तिनोळी -18

तिनोळी -18

विकलांग बहु  झाली काया
अन साथ न देती किंचित इंद्रिये
नवसाधू म्हणे मज विरक्ती आली

- प्रशान्त

तिनोळी- 16

तिनोळी- 16

शांत डोहाच्या काठी
शांत झाड ते उभे ऐकले
जाणिवांचे अंकुर आत गोठलेले

-प्रशांत

तिनोळी -17

तिनोळी -17

तुझे अस्तित्व मिटवण्यात
माझे अस्तित्व आहे 
तरी म्हणे निसर्ग सुंदर आहे

- प्रशान्त
तिनोळी- 16

शांत डोहाच्या काठी
शांत झाड ते उभे ऐकले
जाणिवांचे अंकुर आत गोठलेले

-प्रशांत

Friday, 21 April 2023

तिनोलो15

तिनोळी -14

क्षितिजावर सूर्याची टकटक
चांदण्या पडदानशीन..
आणि रंगेहाथ पकडलेला चंद्र..

- प्रशांत

Saturday, 15 April 2023

तिनोळी-#13

तिनोळी-#13
   
गच्च भरलेल्या एसटीला
गरीबी लोम्बकळत असते
अन चार चाकीत श्रीमंती ऐसपैस

-प्रशांत

तिनोळी-#12

तिनोळी-#12

चितेमधल्या धुरकट ज्वाळानी
नेले त्याला दिगंताच्या प्रवासाला
तसेही तो जळतच होता आयुष्यभर

-प्रशांत

तिनोळी-#11

तिनोळी-#11

भलतीच डार्क झालीय
तुझ्या ओठावरची लिपस्टिक
थाम्ब जरा फिकट करतो

- प्रशांत

तिनोळी-#10

तिनोळी-#10

दान-धर्माच बस्तीचूर्ण
मोकळी करते साचलेली
अनेक तुडुंब पोटे एका झटक्यात

-प्रशांत

तीनोळी - #9

तीनोळी - #9

ठिगळ लावलेले बालपण
कटोरा घेऊन सिग्नलपाशी
पुण्य विकतेय नाण्यांच्या हिशेबात

- प्रशांत

तिनोळी-#8

तिनोळी-#8

पाण्याने भरलेले माठ
टंच हिंदकळत आहेत
 नजराही आजूबाजूच्या

-प्रशांत

तीनोळी -#7

तीनोळी -#7

माझ्या नास्तिकतेवर
माझी नितांत श्रद्धा
देव नाहीच आहे...

-प्रशांत

तीनोळी-#6

तीनोळी-#6

दिवा विझला
उदबत्ती अजून जळते आहे
जसे जमेल तशी

- प्रशांत

तिनोळी -#5

तिनोळी -#5

ससा आणि कासव
बेडवरची शर्यत
ससा झोपला,कासव जागेच

-प्रशांत

तीनोळी-#4

तीनोळी-#4

आशावादी असलं पाहिजे
तो म्हणाला ठामपणे
विझलेल्या डोळ्यांनी

-प्रशांत

तिनोळी-#3

तिनोळी-#3

ओव्हरलोड नवसांचा
देव करतोय नवस
वर्कलोड कमी व्हावा म्हणून

-प्रशांत

तिनोळी-#2

तिनोळी-#2

विसरून जा रे..
डोळ्यात पाणी
आणि कचऱ्याचे निमित्त

-प्रशांत

तिनोळी- #1

तिनोळी- #1

बॅटरी लो मोबाईल बंद 
डिजिटल मरण क्षणभर
भावनांचा ईसीजी अँबनॉर्मल

-प्रशांत

Thursday, 13 April 2023

दमलेल्या देवाची गोष्ट

दमलेल्या देवाची गोष्ट...

गाभाऱ्यात चिडला आहेस
देवा मला कळले आहे
गुदमरलाय तुझा श्वास रे
देवा मला कळले आहे

भोवताली तुझ्या देवा
कसला रे हा गोतावळा
सगळ्यांनाच हवा आहे 
आवळा देउन  कोहळा

देऊळ म्हणावे का देवा
एकदा मला सांग
पुण्यासाठी झोळी घेऊन
अबब केवढी रांग..

करतो किती पाप त्याची
खंत मनात लागते..
उताऱ्यासाठी मग देवापुढे
असे झुकावे लागते..

खरे खुरे भक्त देवा
जेव्हा तुझ्याकडे येतात
स्वतःसाठी नाही मागत
इतरांसाठी मागतात

ठाऊक असते त्याना 
कर्मगतीचे मिळते फळ
जोवर फिटत नाही प्राक्तन 
तोवर सोसावे लागते कळ

देव नसतो करत कृपा
नसतो करत कोप
पण भोग सरेपर्यंत नसतो
माणसाला काही थोप

सेटिंग व्हावी काही
त्याला असे वाटते
भार पापांचा थोडा
देवाने घ्यावे वाटते

विधिलिखित असते जे
देवाला का कळत नाही
वनवास, स्वपत्नीहरण
रामालाही टळत नाही

वंश नाश झाला तरी
कृष्ण मंद हसत होता
जैसे कर्म तैसे फळ
मनात मात्र म्हणत होता

केवळ केवळ सुख हवे
दुःख मात्र किंचित नको
फुलेच असावीत पायाखाली
काट्याचा मुळी सलच नको

पैसे देऊन घेऊ पाहती
कृपा तुझी रे देवा..
सदा सर्वदा हवाच आहे
फक्त सुखाचा मेवा..

म्हणून सांगतो देवा तुला
गाभाऱ्या बाहेर ये
स्वच्छ मोकळ्या हवेत
श्वास जरासा घे..

बरं वाटेल थोडं तुला
जरा होशील निवांत
भक्तांच्या मागण्याला
ना आदी ना अंत

खांद्यांवरती टाकून हात
देव म्हणाला हसून
न मागणारेही असतात
हे मी आहे ओळखून

ते ही ओळखतात रे
खरे खुरे मला..
त्याच्यासाठीच देवळात
रहावे लागत मला...

निरोप घेऊन देव माझा
पुन्हा देवळात गेला
पुन्हा एकदा देवाचा
जय जयकार झाला..

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Saturday, 8 April 2023

वळीव चुंबन

आज आमच्या गावात पाऊस पडला...पहिला पाऊस म्हटल्यावर...कवी ने कविता नाही केली तर त्याला मोक्ष मिळत नाही..त्याला नानाविध कष्ट सहन करावे लागतात. त्याचा आत्मा लोकलला लटकलेला प्रवासी होतो.. त्याच्या बस चुकतात...पंगतीला बसला की त्याचे आवडते व्यंजन समोर आले की नेमके संपते मग त्याला कुर्म्या ऐवजी कोबीची भाजी खावी लागते...बस मध्ये बसला तर त्याच्या बाजूला नेहमीच "खोकाळू" पॅसेंजर येऊन बसतो...

म्हणून माझी ही कविता सहन करा..
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

वळीवाचे चुंबन ..

अत्तराचे भाव कोसळले
सुगंध मातीचा आला..
नव्हे तापल्या वसुंधरेने
सुगंधी सुस्कारा टाकला

किंचित ओला दिलासा
तरी आनंदी पान पान
मातीतला कण कण देतो
धुंद सुगंधी तान तान

हा क्षणिक आहे गारवा
हा वर्षाव जरी जरासा
तरी किंचित या सुखाचा
सृष्टी करते किती जलसा

मारुनी थोडी शायनिंग
पाऊस हसून गेला..
जसे कुणा तरुणीला
फ्लाइंग किस देऊन गेला

वळीवाचे ओले चुंबन
धरती शहारून गेली
अवचित मृदगंधी वीणा
सूर सुगंधी सोडून गेली

आता येउ दे उन्हाळा
फिकीर त्याची कशाला
आठवण जपत वळीवाची
धरणी ही सोसेल झळा..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

💧💦💧💦💧💦💧💦

Sunday, 2 April 2023

समूहव्यथा...

समूहव्यथा...

उदंड झाले ग्रुप
माहिती येते खूप
पण संवादाचा धूप
काही दरवळेना.......|| ०१ ||

नुसतेच करतात रिड
नुसतेच करतात फिड
होते मग चिडचिड
अँडमिनची....|| ०२ ||

माहितीचे सर्व हमाल
करती अशी कमाल
वाचताना होती हाल
इतरांचे.......|| ०३ ||

कुणाचे काही सृजन
पोस्टतो तो उत्साहानं
पण प्रतिसाद पाहून
हिरमुसतो ....|| ०४ ||

ग्रुप नव्हे हो गोडाऊन
पोस्ट ठेवल्या मांडून
फक्त पाहून  वा वाचून
दुर्लक्षावे .... ...|| ०५ ||

होऊदेत कितीही वाद
परी असावा मात्र संवाद
सादाला देणे प्रतिसाद
लक्षण जिवंतपणाचे  ....|| ०६ ||

मेम्बर असती शंभर
ऍक्टिव अवघे दोन चार
इतर मात्र बर्फ थंडगार
ढिम्म पडलेले.......|| ०७ ||

एक ना धड भारंभर
ग्रुपांचाच महापूर
पोस्ट येती सरसर
निमिषार्धात .......|| ०८ ||

कुणास द्यावे प्राधान्य
कुणास ठरवावे अन्य
प्रश्न हे परिस्थितीजन्य
पडतातच ......|| ०९ ||

म्हणून असावे लिमिटेड
मोजक्यांशी कनेक्टेड
बिनकामी गर्दीचे वेडं
असू नये......|| १० ||

मित्र जरी सतराशे साठ
संकटी मोजक्यांची साथ
इतरांचे खांद्यावर हात
स्वार्थापुरते.......|| ११ ||

मोकळा असावा संवाद
सादाला द्यावा प्रतिसाद
मन मोकळी असावी दाद
इमोजीसहित....|| १२ ||

श्लोक हे दशोत्तरी दोन
लिहिले जरी रात जागून
तरी लक्षात घेईल कोण
वाटत नाही.......|| १३ ||

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Saturday, 1 April 2023

इदं न मम- १

इदं न मम- १

अध्यात्म म्हणजे स्व ची ओळख , प्रशांत शशिकांत शेलटकर हा फक्त वैश्विक चेतनेने सहेतुकपणे धारण केलेला तात्पुरता आकार आहे. आपले कुटुंबातील सदस्य देखील विश्वव्यापी चैतन्याने सहेतुकपणे धारण केलेले तात्पुरते आकार आहेत..आपल्या आजूबाजूला असलेले  दगड,माती,झाडे ,पाणी ,प्राणी हे  त्या वैश्विक चेतनेने धारण केलेले आकार आहेत .माझा परिवार  नातेवाईक हे सगळे आकार आहेत ..विशिष्ठ हेतूने ते एकत्र आले आहेत ,हेतू संपला की ते सगळेच आकार त्या निराकरात विलीन होणार..म्हणून आनंद आणि दुःख या केवळ दैहिक भावना आहेत.त्या सत्य आहेत पण क्षणिक आहेत. त्यांचे अस्तित्व नाकारायचे पण नाही आणि त्या क्षणिक आहेत ते विसरायचं पण नाही.. आपण एक स्मार्ट टी. व्ही आहोत..आपल्या जीवन रुपी स्क्रीनवर खूप काही घडत असते..स्क्रीन वरच्या प्रत्येक हालचाली या सत्य वाटतात.पण हे सगळं का घडत आहे? त्या स्मार्ट टी. व्ही चे एक कनेक्शन प्लगशी जोडलेले आहे.त्या प्लग मधून सतत एक विद्युत प्रवाह टी. व्ही पाशी येत असतो. त्या प्रवाहाला टीव्ही वर काय घडत आहे..गाणी चालू आहेत की सिरीयल चालू आहेत.त्या सिरीयल विनोदी आहेत की गंभीर आहेत याच्याशी काही देणेघेणे नाही.ज्या दिवशी सॉकेट मधून पिन काढली जाईल त्या दिवशी त्या स्मार्ट टीव्ही चा स्मार्टनेस संपून जाईल. देहाचे तसेच आहे ज्या दिवशी त्यातले चैतन्य निघून जाईल त्या दिवशी सर्व शांत होईल..मग त्या चेतनेला तुम्ही देव म्हणा, ईश्वर म्हणा गॉड किंवा अल्लाह म्हणा..अगदीच नास्तिक असलात तर कॉस्मिक एनर्जी म्हणा...तुम्ही आम्ही सगळे विश्व त्या एका चेतनेने भरलेले आहे..भारतीय संस्कृती हेच सांगते की चराचरात ईश्वर आहे 😊

- प्रशांत शेलटकर
8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...