प्रशांत शेलटकर यांची पोस्ट..
उफ ये उर्फी..
कार मधून ती उतरते.. तिथेच घोटाळत असलेले पत्रकार (?) मॅडम मॅडम करत पुढे येतात..फटाफट फ्लॅश पडतात.. मॅडम थोडा आगे.. और आगे... हा ये ठीक है मॅडम...थँक्स मॅडम...
ती स्माईल देते आणि निघून जाते...
बस्स एक विषय सोशल मीडियाच्या ऐरणीवर येतो..त्याविषयी माझे अल्प आकलन..
नैतिक आणि कायदेशीर या दोन भिन्न कन्सेप्ट आहेत.त्यात सरमिसळ नाही करू शकत. उर्फी जे काही करत आहे ते बेकायदेशीर आहे का? हा प्रश्न अनुत्तरितच रहाणार. कायद्यानुसार स्त्रीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करणे गुन्हा आहे , इथे ते वर्तन पुरुष करतो असे गृहीत धरले जाते परंतु एखाद्या स्त्रीचे वर्तन स्त्री च्या मनात लज्जा उत्पन्न करते का? या मुद्द्यावर चित्रा वाघ न्यायालयात जाऊ शकतील का हा मुद्दा पण रंजक ठरेल.
संविधानाने दिलेले आचार स्वातंत्र्य या मुद्द्यावर उर्फी आपल्या वर्तनाचे समर्थन करू शकते. कोणी कोणते कपडे घालावेत हे अन्य कोणी दुसरे ठरवू शकत नाहीत . मुळात कोणते कपडे परिधान करावेत निदान यात अल्प का होईना कपडे परिधान करणे हे गृहीत आहे. मग न्यूड क्लब चे काय करणार?
दुसरा मुद्दा नैतिकतेचा, सर्व साधारणपणे एका विशिष्ट समूहात ज्या कृतीला सार्वत्रिक मान्यता असते ती कृती नैतिक मानली जाते.त्यामुळे नैतिकता नेहमीच समूह सापेक्ष असते. या समूहाच्या व्याख्येत जात,जमात, पंथ ,धर्म ,देश अशी अनेक वर्तुळे समाविष्ट असतात. काही आदिवासी समाजातील स्त्रिया फक्त कटीवस्त्र परिधान करतात . नागर संस्कृतीत पूर्ण वेष परिधान केला जातो, मुस्लिम समाजात बुरखा अपरिहार्य असतो.त्यामुळे वेशभूषेतील नैतिकता नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडते.
आणखी एक मुद्दा लैंगिकतेचा..प्रत्येकाच्या लैंगिक भावनेचा उत्कलन बिंदू वेगवेगळा असतो. त्यामुळे कपडे किती आहेत ?कसे आहेत?किंवा नाहीच आहेत या बाबी प्रत्येकासाठी वेगळा इफेक्ट करतात. त्यामुळे सरसकट एकच न्याय सर्वाना लावता येत नाही. त्यातही लैंगिक भावना तीन प्रकारे नियंत्रित होतात. दमन, संयमन आणि शमन ..आणि हे पुन्हा व्यक्तीसापेक्ष असते.आणि नैसर्गिक असते. त्यामुळे स्त्रीचे आचार स्वातंत्र्य आणि पुरुषाचे लैंगिक भावनेवरील नियंत्रण या दोन बाबीमध्ये कधी समन्वय तर कधी संघर्ष असतो.
फॅशन च्या अंगाने पाहिलं तरी एक फॅशन काही वर्षानंतर परत येते.नवीन ट्रेंड जुना होतो काही वर्षांनी परत तोच येतो .सांस्कृतिक अंगाने पाहिले तरी मुक्तता-बंधन-मुक्तता हे चक्र चालू रहाते. नैतिकतेचे जुने निकष जातात नवीन येतात..तेही जातात परत जुने निकष नवीन रूप घेऊन येतात..चक्र चालू रहाते...
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846