Ad

Tuesday, 30 August 2022

बाप्पा..

बाप्पा..

बाप्पा तुझ्या येण्याची
आतुरता बघ केवढी
दारोदारी उभी राहिली
तुझ्या स्वागताची गुढी

घरदार आणि परिसर
झाला बघ किती लख्ख..
भाग्य पाहुनी तुझे बाप्पा
इतर देव झाले थक्क

मांगल्याचे दीप लागले
इथल्या प्रत्येक घरात
अमंगलाची झडे काजळी
लख्ख उजेड अंतरात

कलह क्लेश दुःख सारे
असो तुझ्या पायाशी
द्वेष मत्सर  अहंता
न उरावी ती कोणाशी

सूक्ष्म तुझे डोळे सांगती
उघडा डोळे बघा नीट
विस्तीर्ण तुझे कान सांगती
ऐकून घ्यावे सर्वच नीट

तुझ्या सारखा तूच देवा
तूच केवळ आमचा बाप्पा
तुझ्यासाठी जपला आहे
मनातला एक अलवार कप्पा

प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday, 20 August 2022

पंखात चोच घालून बसलेली माणसे...

पंखात चोच घालून बसलेली माणसे...

आपले कोणावाचून अडत नाही आणि आपल्यावाचून कोणाचे अडले नाही पाहिजे किंवा अडले पाहिजे  ही भावना नात्यात संघर्ष निर्माण करते. आपण पूर्णपणे स्वावलंबी आहोत हे खुळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे .आत्मनिर्भर हा शब्द कितीही गोंडस वाटला तरी वास्तवात माणूस परस्परनिर्भर असतो. 
      तरीही समाजापासून फटकून रहाणारी माणसे पाहिली की हे कोणी तरी अयोनीज अवतारी पुरुष असावेत अस वाटायला लागतं.. एकत्र येण्याकरता सण-समारंभ आणि गरज या दोनच गोष्टी का लागतात? आपण बरे आपले काम बरे या विधानाचे खूप उदात्तीकरण झालंय.. आपल्याच कोषात बंद राहण्यासाठी मनाला समर्थन देणारे वाक्य आहे हे..
  माणसं एकत्र का येत नाही हा एक अस्वस्थ करणारा प्रश्न  ..स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजणे आणि हे स्वतःचे वेगळेपण इतरांनी मान्य करीत राहील पाहिजे ही अपेक्षा समाजात मिसळण्या पासून परावृत्त करते का? दुसरी शक्यता अशीही असते . आपण समजा समाजात मिसळलो तर आपली वैगुण्ये इतरांना कळतील , आपले अज्ञान लोकांना कळेल त्या पेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची असेही असू शकते..
      माणसं स्वतःमध्ये गुरफटत जात आहेत.अफाट माहिती गोळा होत आहे. माणसं आपल्या बुद्धीला धार काढत बसलेली आहेत आणि कधी इतरांना कधी स्वतःला घायाळ करीत आहेत ...सगळं विचित्र आहे...

© प्रशांत शेलटकर
     8600583846

-

दो मिनिट... म्यागी

दो मिनिट... म्यागी

इतिहास , विज्ञान,राजकारण, धर्मकारण, तंत्रज्ञान, क्रीडाक्षेत्र या विषयावर पूर्वी फक्त तज्ञ लोक बोलायचे ..आता सोशल मीडिया , प्रिंट मीडिया या मुळे प्रत्येकाचा थाट असा असतो की तो या सगळ्यातला तज्ञ आहे..एखाद्या विषयाला वाहून घेणे त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करून घेणे हे वेळखाऊ आणि झटपट विचारवंत होण्याच्या मार्गातले अडथळा असल्याने वरच्या विषयांच्या रेडिमेड रेसिपी उपलब्ध आहेत . बस्स आपल्याला हव्या त्या उचलायच्या आणि पक्वत बसायचे     
      वास्तविक वर उल्लेख केलेल्या विषयांचा आवाका इतका मोठा आहे की सखोल अभ्यास करायला आणि व्यक्त होण्यासाठी आयुष्यातील काही वर्षांची आहुती द्यावी लागते.
     पण सध्या टोळ्यांचा जमाना आहे. आवडेल ती टोळी जॉईन करायची. त्या टोळीचे असे एक तत्वज्ञान असते त्याला पूरक असे वाचन होण्यासाठी टोळीतले पित्ते एकांगी पुस्तके लिहितात तीच पुस्तके वाचली जातात आणि मग जय हो करीत दुसऱ्या टोळीवर तुटून पडायचं..
    रंगपेटीतले दोनच रंग उचलायचे काळा आणि पांढरा.. आणि आपल्याला हवी तशी रंगरंगोटी करत बसायची की झाला (चित्रकार) विचारवंत..रंग दोनच उचलल्या मुळे एकाला पांढरा फासला की दुसऱ्यला काळा फासावाच लागतो..☺️
     आनंदीआनंद गडे...☺️☺️
     
© प्रशांत शेलटकर
      8600583846

Thursday, 11 August 2022

राहून गेले

राहून गेले....

सरळ आयुष्य बापडे निघून गेले
थोडे चुकायचे मग राहून गेले

सावरतच जगलो भ्यालो जगाला
 बेफाम जगण्याचे मात्र राहून गेले

सोडली ना चाकोरी कधीही
वाट चुकण्याचे मग राहून गेले

भलतेच प्रश्न डोळ्यात तिच्या 
पण उत्तरायचे मग राहून गेले

सुचती  कित्येक उत्तरे आता
पण तिला सांगायचे मात्र राहून गेले

जगलो फक्त फक्त जगलो
पण अर्थ शोधण्याचे राहून गेले

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Thursday, 4 August 2022

सुधारक

सुधारक

कशाला जगाच्या उठाठेवी
स्वतःपुरते आयुष्य असावे
मी तो केविलवाणा जंतू
का स्वतःस गांधी समजावे

कळते ना मला काही
कशातलेच काही बाही
परी उगा  व्यक्त होण्याचा 
सोस काही जात नाही

फेसबुकी पोस्टला माझ्या
कोण श्वान बरे विचारतो
पोस्टून मी फक्त वेडा
लाईक मोजत बसतो

घडी कपड्याची माझ्या
अजिबात मोडत नाही
पण गळे काढण्याची
मी संधी सोडत नाही

कोंबडी चार आण्याची
अन मसाला बारा आणे
केले कुठे बरे जरासे
मीडियात कौतुक दणाणे

सेवा शांतपणे करती
त्याना कोणी न विचारी
मीडियावर वाजते मात्र
भलत्याचीच ओ तुतारी

इतिहासाची उकरून मढी
काय  ते साध्य करावे ?
वर्तमानाने का बरे?
भूतकाळाचे ओझे व्हावे?

शब्दांचे केवळ फटाके
फोडणे व्यर्थ आहे
कृती एक निस्वार्थ
करण्यातच अर्थ आहे.

जगास सुधारावे असे
जीव एवढा नाही..
स्वतःस बिघडू न द्यावे
एवढेच करून पाही


-© प्रशांत शेलटकर
       8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...