सुधारक
कशाला जगाच्या उठाठेवी
स्वतःपुरते आयुष्य असावे
मी तो केविलवाणा जंतू
का स्वतःस गांधी समजावे
कळते ना मला काही
कशातलेच काही बाही
परी उगा व्यक्त होण्याचा
सोस काही जात नाही
फेसबुकी पोस्टला माझ्या
कोण श्वान बरे विचारतो
पोस्टून मी फक्त वेडा
लाईक मोजत बसतो
घडी कपड्याची माझ्या
अजिबात मोडत नाही
पण गळे काढण्याची
मी संधी सोडत नाही
कोंबडी चार आण्याची
अन मसाला बारा आणे
केले कुठे बरे जरासे
मीडियात कौतुक दणाणे
सेवा शांतपणे करती
त्याना कोणी न विचारी
मीडियावर वाजते मात्र
भलत्याचीच ओ तुतारी
इतिहासाची उकरून मढी
काय ते साध्य करावे ?
वर्तमानाने का बरे?
भूतकाळाचे ओझे व्हावे?
शब्दांचे केवळ फटाके
फोडणे व्यर्थ आहे
कृती एक निस्वार्थ
करण्यातच अर्थ आहे.
जगास सुधारावे असे
जीव एवढा नाही..
स्वतःस बिघडू न द्यावे
एवढेच करून पाही
-© प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment