Ad

Thursday, 25 November 2021

"शुद्ध " हलकटपणा

"शुद्ध" हलकटपणा...

शनिवारी रात्री कसलसं मराठी व्याकरणावरील पुस्तक वाचत पडलो  होतो...वाचता वाचता पुस्तक छातीवर पडलं आणि माझा डोळा लागला..अगदी गाढ झोप लागली..
     सकाळी बायकोचा आवाज ऐकू आला,
    " हे शशीसुता, उत्तिष्ठ, उतिष्ठ.. उदयाचली मित्र आला, नाथा उठा झडकरी..अवघे वानरगण पथ क्रमांक 1 वर क्रीडा करू लागले..रमेशसुत महेश चे विदेशी कुक्कुट उच्चरवाने कोकलू लागले..तरी तुम्हास जागृती नाही,का बरे..? तरी तुम्हास मी विनवत होते, उत्तररात्री पर्यंत..ती शृंगारिक आणि अतिशृंगारीक चल चित्रे तुमचा भ्रमणध्वनीवर पाहू नका..पण इकडची स्वारी माझं मेलीचे ऐकेल तर खरं ना... बायको किंचित लाडाने,किंचित कोपाने मज वदली.. 
      मी त्वरित उठलो..दंतधावन( ब्रश करीत) अंगणी आलो.. तोच एक म्लेंच्छ कन्या कोकेरी,मांदेली नामक मत्स्यप्रकार घेऊन दारात आली. बायकोने कोकेरी नामक मत्स्याचा कल्लेनामक अवयव उघडून पाहिला आणि मत्स्य योग्य असल्याची निश्चिती केली.. 
      मी दंतधावन करून मुखप्रक्षालनपात्राजवळ  (बेसिन) जवळ जाऊन मुखप्रक्षालन केले. 
     "नाथ ..कषाय (चहा)  घेणार ना? "बायकोने पृच्छा केली.
     " नको प्रिये आज दुग्धपान करावे असा मानस आहे"
     "इश्श...काहीही हा नाथ" बायको लज्जित होऊन मजला वदली.. ती तशी का अनुक्रमे लाजली आणि वदली हे मज अद्याप कळले नाही..
     मी कषायपात्र (चहाचा कप) मुखास लावला..अंश अंश कषाय प्यालो आणि स्नानवस्त्र (टॉवेल वगैरे) घेऊन स्नान गृहात गेलो.
    शतप्रतिशत वस्त्रे त्यजून मी जलप्रोक्षक उपकरणा खाली ( शॉवर खाली) उभा राहिलो..प्रथम शितोदक स्नान तदनंतर उष्णोदक स्नान केले..स्नान करताना संतूर नामक वाद्यसदृश्यनामे सुगंधी वडी अंग निर्जंतुक करणेसाठी उपायोजित केली.
     त्या नंतर तंतुमय स्नानवस्त्राने ( टर्किश टॉवेल) ने अंग घर्षीत करत असताना बायको बंद दारापाशी येऊन मज वदली,
उपभोजन तयार आहे, चला ना गडे लवकर"  तिचे ते शब्द ऐकून मी स्तिमित झालो, शरीरातील वर्णपात सळसळुन गेला..त्याचे असे झाले की चुकून मी (की जाणून बुजून?) ना आणि गडे यातील अंतर मिटवले होते आणि तिजला म्हणालो
     " प्रिये,ऐसें कैसे येणे करू, किमान वस्त्रे लेऊन तर येतो,मी काही कुंभमेळ्याचा नागा साधू नाही..
   तव बायको कृतककोपे ( लटक्या रागाने) मज म्हणाली, असले विपरीत अर्थ काढू नका ना (स्वल्प थांबून) गडे
मम मनी लज्जा उत्पन्न होत आहे..
     मग मी बाहेर आलो,शिरावर तैल मर्दन करून विरल केशसंभार तैलचिंब केला..सांप्रत काली केशसंभार विरल झाल्याने तैलबिंदू  वेगाने मुखमंडलावर येतात..त्यास त्याच वेगे टिपून मुखास लावायची सुगंधीउटी (पोन्ड्स पावडर) लावली. 
     बैठकीचे कक्षात दूरदर्शन संच आहे . त्यावर चेंडूफळी चे आंतरराष्ट्रीय सामने पाहता पाहता  कांदेपोहे नामक उपभोजनाचा अस्वाद घेतला , इतक्यात अंगणी कोलाहाल झाला.. पथ क्रमांक चे वानर गण आता पथ क्रमांक 2 वर आले होते. आमच्या दारातल्या कल्पवृक्षावर बैसून एक वानरी मजकडे पाहून दंतपंक्ती दाखवून फिदीफिदी हसत होती. माझा संताप अनावर झाला . तिथलाच एक पाषाण घेऊन मी तिजकडे तो अचूक फेकला अन तिने तो झेलून दुप्पट अचूकतेने मजकडे फेकला. दैवयोगे माझा पार्श्वभाग तिजकडे होता..आणि तोच मग  दुर्घटनाग्रस्त झाला...
     मी ओय ओय ऐसें ओरडलो..आणि....
...........

डोळे उघडले माझ्या पार्श्वभागावरून टणकन उडालेले लाटणे शिताफीने पकडत बायको परत हल्ला करण्याच्या तयारीत उभी होती..आता मला जाग आली होती..सकाळचे दहा वाजले होते ...आणि ते मराठी व्याकरणाचे पुस्तक तिकडे तसेच पालथे पडलेले होते....

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...