Ad

Monday 1 November 2021

अवयवांची गोष्ट

अवयवांची गोष्ट...

कान- 
कान फक्त माणसालाच असतात का? कान तर कपाला पण असतात आणि भिंतीलाही..काही कान "हलके" पण असतात..😄

नाक-
नाक काय फक्त श्वास घ्यायला असत का?? नाही हो , ते नको तिथे खुपसायला पण उपयोगी पडतं.. 😄  नाकात फक्त नथ  घालता येते.... कोण  सांगत?.! त्याच्यावर 'राग" पण ठेवता येतो..आणि हो काही नाकं कांदे पण सोलतात...😄

डोळे- 
काही डोळे फक्त  डोळे असतात पण काही डोळे "जुलमी" पण असतात बरं का...काहींना दुसऱ्याच्या डोळ्यातले "मुसळ" पण दिसत ..पण स्वतःच्या डोळ्यातील कुसळपण  दिसत नाही.... कसं दिसणार? डोळे स्वतःलाच कस पहातील..? 🤔
आरशात तर प्रतिबिंब दिसत..
डोळ्यात काय फक्त पाणीच असत? वेडेच आहात तुम्ही ...काहींच्या डोळ्यात " आग" पण असते..😄 तुम्हाला काय वाटत गंगा -जमुना हिमालयात उगम पावतात?..छे हो..एका कवीने त्याचे उगम स्थान शोधून काढलंय.."गंगा जमुना डोळ्यात उभ्या का,जा मुली जा दिल्या घरी  तू सुखी रहा.. आता गंगा जमुना डोळ्यात उभ्या का राहिल्या ? त्या बसल्या का नाहीत ? असले बिनडोक प्रश्न तुम्ही विचारू नका..😄😄

डोके- 
सगळ्यानाच "डोके" असावे अशी सक्ती नाहीये बरं का.."बिनडोक" माणूस पण असू शकतो..एवढेच काय "कमी डोक्याचा" पण माणूस असू शकतो..☺️डोक्याचा उपयोग खुर्ची आणि दरवाजा  म्हणून पण होतो..उगाच नाही माणसे "डोक्यावर" बसत  आणि "डोक्यात" जात..😄. काही डोकी " गरम" असतात,काही डोकी" थंड" असतात..आणि काही डोकी चक्क " चालतातही"😄

पाय- 
पाय तर खुर्चीलाही असतात आणि बीजगणितातही  "पाय " असतो आणि तो नेहमी मार्कांच्या पोटावर  पाय आणतो...☺️ ....कमवायला लागला की माणूस "स्वतःच्या पायावर" उभे राहतो म्हणतात..म्हणजे तोपर्यंत तो उसने पाय घेऊन फिरतो काय? काही पाय भलतेच हलकट असतात..ते लोकांच्या पोटावर "पाय" आणतात.."तरणोपाय " नाही म्हणजे ज्या तरुणाला पाय नाहीत तो तरुण असे म्हणावे का?😄  काही माणसे एक पाय तळ्यात आणि एक पाय मळ्यात ठेवतात..भारीच ना..पाय आणि जीभ यांना एकच मास्तर असावेत..दोघेही "घसरतात.."😄

हात- 
हात तर खुर्चीला पण असतात..जिला पाय असतात तिला हात असणारच..काही "हात"  दाखवले की अवलक्षण होत अस म्हणतात..काहींचे हातावर पोट असते काहींचे पोटावर हात असतात...काहींचे हात"जगन्नाथही" असतात..

तोंड-
 तोंड तर लढाईला पण फुटतं.. आणि लढाई तर "हाता-तोंडाची " पण होते..तोंडाचा आणि नाकाचा गहिरा संबंध.." म्हणून तोंडाशी नाकी नऊ येतात .हे नऊ म्हणजे काय भाऊ??? माणस तोंडावरच का पडतात? तोंडावळा हा मोरावळ्याचाच उपप्रकार आहे का?  तोंडास तोंड देणे हा काहीतरी अश्लील प्रकार असावा.😜. तोंड हे माशीचे अधिकृत निवास स्थान नसावे..नाहीतर "तोंडावरची माशी" हलली नसती.. 😃
"तोंड वर करून" का बोलतात ?
तोंड तर गाडी,विमान,बाईक,जहाज, अगदी पिशवीला पण असते..☺️
पट्टा काय फक्त गिरणीत चालतो? तोंडाचा पण चालतोच की...

पाठ- 
"पाठ" तर कविता पण होते..आणि वारा येईल तशी फिरवतात ती पण पाठच..शत्रूला "पाठ" दाखवली की तो "पाठलाग" करणारच ना...शाबासकी पण पाठीवर आणि गुद्दे पण पाठीवर... जगाला पण पाठ असते बरं का..पहा मराठी सिनेमा "जगाच्या पाठीवर"...☺️

मान- 
"मान " तर बाटलीला पण असते.. अभिला सगळीकडे मान आहे याचा त्याच्या आईला कोण अभिमान! कारण "मान" खाली जाईल अस त्याने कधी केलंच नाही... मान मोडून काम कसे काय करत असतील ना? काही माणसे म्हणे मानेवर खडा ठेऊन काम करतात. पण मानेवरचा .खडा पडत कसा नाही?? ....🤔

दात-
 दात तर फणीला पण असतात..एकाच जबड्यात खायचे आणि दाखवायचे दात कसे नांदतात? एखाद्यावर "दात "ठेवताना माणस नेमक काय करत असतील..घशात गेलेले दात   गिळायचे की ओकायचे? बोळक्यात दात लुकलूकतात म्हणजे काय होत हे एकदा संदीप खरे ना विचारावं का?🤔

जीभ- 
जीभ तर पाण्याच्या पंपाच्या फुटव्हॉल्व्हला पण असते..पडजीभेला ,मोठ्या जिभेच्या पाठीवर बऱ्याच वर्षांनी झालेले भावंड म्हणावं का?..😄
जीभ "चुरचुरू" बोलते म्हणजे नेमके काय करते? 🤔 जिभेवर "साखर" असेल तर चहात साखर का टाकायची...बिनसाखरेच्या चहात फक्त जीभ बुडवायची...झालं ना मग...☺️

      आणि शेवटचे...
       गालावर "गुलाब" फुलायला कोणते खत वापरावे?
        अंगावर " काटा" आल्यावर बनियन फाटेल का?
        " रागाने केस उपटणे" किती भयंकर दिसत असेल ना?
         " पोटात खड्डा" पडला तर तो कशाने भरून काढायचा.?" "पोटात गोळा" आला तर ऑपरेशन करावे लागते का?
          कान उपटल्यावर तिथे दुसरे कान येतात काय?
          तोंड भरून कौतुक करताना ते चुकून गिळले गेले तर ..?
          कोणाच भल झालं तर "पोटात "का दुखत? 
           जर नाक दाबल्यावर तोंड उघडत असेल तर.. तोंड दाबल्यावर नाक उघडायला पाहिजे, पण मग "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" सहन का करावा लागतो??

----इथे वेताळ राजाला म्हणाला को ये  चक्रमा,वसाड्या तुला या सगल्या प्रश्नांची उत्तरा म्हायती असतील आणि तरीपन तू गप -हायलास तर झो तुजा शाप वेल्डिंग करून टाकीन" 

चक्रम राजा झो सुदूर बुदूर झालाय....

😄😄😄😄😄😄😄😄

          
- © प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

कोकनी..

कोकनी...😊 मी नाय भक्त आनी मी नाय चमचा खावन पिवन सुखी  भात आनी लोनचा हैसून येता पाकीट थैसून येता पाकीट टोपी खय कोनास ठाव उरला फक्त जाकीट हैस...