Ad

Wednesday, 20 October 2021

निरर्थक

निरर्थक...


असच एकदा
निरर्थक भेट मला
एकदा भेटलिस की,
मी काहीतरी विचारीन
तू काहीतरी उत्तर देशील..
उगाचच कसा आहेस वगैरे वगैरे

नवरा,मूल बाळं,
नोकरी धंदा..
आणि बरच काही
असले पुचाट प्रश्न,
विचारावे तर लागतातच
संभाषण चालू ठेवायला..

तुही तेच विचारशील
तेच निरर्थक प्रश्न
बायको बरी आहे ना?
मुलं कितवीला?
अरे तो अमकाढमका
अमकी ढमकी
काय करतो? करते?
विचारावे तर लागतातच ना
असले पुचाट प्रश्न
संभाषण चालू ठेवायला

बरं नाही दिसत ना
अबोल राहायला..
ओठ अबोल राहीले तर
उगाचंच डोळे बोलतील
आणि ते खरेच बोलतील
आणि ते भलतेच अवघड
म्हणून उगाचच खोट्या
दांभिक आपुलकीने..
तोंड बोलत राहिले पाहिजे
आणि तेच तेच वांझोटे प्रश्न
विचारावे तर लागतातच
संभाषण चालू ठेवायला..

मग कोरडेपणाने
म्हणशील येते रे..
जायला हवं..
उशीर होतोय..
खर तर आता खूपच
उशीर झालाय..
 फार उशीर व्हायला नको
नवरा वाट पाहत असेल...
काळजी घे...येऊ ना?
परत एकदा तेच 
पुचाट प्रश्न..
संभाषण चालू ठेवायला...

मग तू परत फिरशील
तेव्हाही अशीच फिरली होतीस
हल्ली काय माणसं 
शब्दही फिरवतात
तू तशीच जात रहाशील..
जाता जाता ठिपका होशील
पुन्हा एकदा वांझोटी भेट
तेच तेच पुचाट प्रश्न..
कसा आहेस?
बरा आहेस ना?
नोकरी धंदा?
मुलं बाळ?
पुन्हा तेच तेच प्रश्न
संभाषण चालू ठेवायला...


-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...