चुकीलां माफी आहे...
का चुकलो? कुठे चुकलो?
कसा चुकलो? केव्हा चुकलो?
व्यर्थ असतात सगळे प्रश्न
चुकीला माफी नसते का?
हाच असतो मोठा गहन प्रश्न...
आयुष्य अचूक असायला
ते काही गणित नाही..
आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत
माफीचा ऑप्शनच नाही?
ज्याला उत्तर नसतंच कधी
असा केवळ एकच प्रश्न
चुकीला माफी नसते का?
हाच असतो मोठा गहन प्रश्न...
देव नसतो माणूस म्हणून
तो माणसाचा जन्म घेतो
वासनांच्या फेऱ्यात मग
त्याचा जीव घुसमटत जातो
सगळं काही गमावल्यावर
आता उरतो एकच प्रश्न
चुकीला माफी नसते का?
हाच असतो मोठा गहन प्रश्न...
किती वेळा बरोबर होतास
त्याला काहीच अर्थ नाही
एकदा चुकलास ना तू
मग चुकीला माफीच नाही
करू नकोस जगाला
तेच तेच व्यर्थ प्रश्न
चुकीला माफी नसते का?
हाच मोठा गहन प्रश्न...
वध स्तंभावर टांगले त्याला
अन खिळे ठोकले पायात
तरी क्षमा कर देवा यांना
येशु म्हणाला मनात,
जन्मत का नाही पुनः येशू
विचारू नको तू व्यर्थ प्रश्न
चुकीला माफी नसते का?
हाच एक मोठा गहन प्रश्न
आता एक काम कर
स्वतःच स्वतःला माफ कर
जेव्हा कधी चुकतील दुसरे
येशूची फक्त आठवण कर..
मग छळणार नाही कधी तुला
तेच तेच आदिम प्रश्न
माफ कर तू दुसऱ्यांना
बाकी ज्याचा त्याचा प्रश्न
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment