Ad

Tuesday, 24 March 2020

रात्र फार दूर नाही

रात्र फार दूर नाही....

मी शोधले स्वतःला...
पण मी मला मिळालो नाही
गुंतलो मी व्यापात इतक्या
माझ्यातच मी गुंतलो नाही

समजून घेतले जगाला
मज कुणी समजून घेतले नाही
समजून उमजूनही कोणी
मला जवळ घेतले नाही...

कसली अस्मिता अन
कसला तो स्वाभिमान
मी पेटलो सरणावर
रडण्यास कोणी उरले नाही

वासनेचे डंख सारे
काळजात असे रुतले
पण पंख पसरून कुणी
मज कुशीत घेतले नाही

भिजल्या घरट्याच्या दाराशी
कित्येक कावळे भिजून मेले
परी एकाही चिमणीने
साले दार उघडले नाही....

सजवुनी मस्त दुःखाला
मी विकण्यास असे ठेवले
पण गिऱ्हाईक एक पैशाचे
अजिबात फिरकले नाही...

खेळ केला डोंबाऱ्याचा
जमुरे फक्त नाच नाचला
अन रुमाल फिरला गर्दीत
पण चिल्लर जमली नाही

आता फाटक्या जिंदगीला
मी कडेवर घेतले आहे....
सूर्य ढळला क्षितिजावर
रात्र फार दूर नाही....

-प्रशांत श शेलटकर
 8609583846

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...