Ad

Monday, 4 November 2019

अध्यात्म

अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की ती फार थोड्या जणांना कळते..बाकीचे ती कळल्या सारखी दाखवतात..मुळात अध्यात्म ही बोलण्याची गोष्ट नाही ती अनुभवण्याची गोष्ट आहे..ती एक आयुष्यभर चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. नामस्मरण करणे, पोथ्या वाचणे, प्रवचनाला जाणे,ध्यान करणे ही सर्व साधनं आहेत मुक्कामाला पोहोचण्याची,  हे सर्व करताना वृत्तीत फरक पडत जातो. मी अशा काही व्यक्ती पाहिल्यात की त्यांच्या सानिध्यात खूप समाधान वाटत. काही व्यक्ती अशा असतात की त्या यातले काहीही करत नाहीत पण खूप समाधानी आयुष्य जगतात.त्या ही अध्यात्मिक व्यक्तीच असतात. 
     काही व्यक्तींना आपण एवढं वाचन करतो , नामस्मरण करतो, तीर्थयात्रा करतो,देवाची साग्रसंगीत पूजा करतो याचाच अहंकार असतो.मग अशा व्यक्ती चेहरा लांबुळका करून इतरांना अध्यात्म सांगत असतात. पण त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात असमाधान, चिडचिड , भरलेली असते.
     लोक माऊली माऊली करतील किंवा ग्यानबा तुकाराम करतील पण ज्ञानेश्वर, तुकारामांनी व्यक्तिगत आयुष्यात काय भोगलय हे पहाणार नाहीत. साधी बस स्टॉपला थांबली नाही तरी आमचा तडफडाट होतो..अध्यात्मिक शांती ही फार लांबची गोष्ट राहिली..
     नम्रपणे आपल्या आयुष्याला समजून घेऊन ,त्याला जस आहे तस स्वीकारलं तर बाकी काही वेगळं करायची गरज नसते...मला वाटतं हेच अध्यात्म

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...