Ad

Sunday, 30 June 2019

सखे थोडं थांब

मत बनवण्या अगोदर
सखे थोडं थांब...
समजून घे थोडं मला
जाऊ नकोस लांब..

मी तुला सखी म्हणतो
त्यालाही काही कारण आहे
आपल्यामधल्या नात्याला
विश्वास हेच तारण आहे...
म्हणून म्हणतो
सखे थोडं थांब...
समजून घे थोडं मला
जाऊ नकोस लांब..

सखे, सगळेच पुरुष
नसतात हलकट आणि पांचट
नसतात चावट आणि लोचट
नसतील तुला ते म्हणत
ताई ,दीदी, आणि बहेनजी
पण ते जपत असतील
तुझ्यातलं माणूसपण
म्हणून म्हणतो
सखे थोडं थांब...
समजून घे थोडं मला
जाऊ नकोस लांब..

तुझ्या प्रत्येक डीपीला
तुझ्या प्रत्येक स्टेटसला
नाइस म्हटलं म्हणजे ...
असं नक्की नाही की,
कुणी तुझ्याभोवती फिल्डिंग लावतय...
ते असू शकत निर्व्याज कौतुक..
ती असू शकते तुझी स्तुती निर्हेतुक..
म्हणून सांगतो,
सखे थोडं थांब...
समजून घे थोडं मला
जाऊ नकोस लांब..

सखे,
वरून कठीण असला तरी
नारळाच्या आत पाणी असतं
असली आयाळ जरी सिंहाची 
तरी काळीज सशाचं असतं
पुरुषाच हे असंच असतं
म्हणून सांगतो,
सखे थोडं थांब...
समजून घे थोडं मला
जाऊ नकोस लांब..
-प्रशांत शेलटकर
8600583836

-प्रशांत शेलटकर
8600583836

Wednesday, 26 June 2019

स्फूर्ती

स्फूर्ती...

चांदण्याचे आभाळ नको
पणती एक पुरेशी आहे...
नकोच सारे मोह पण
असणे तुझे पुरेसे आहे

नकोच आता व्यक्त होणे
तुझे स्मित पुरेसे आहे
नकोच शब्दांचे पांगुळगाडे
बोलके मौन पुरेसे आहे

नकोच भेटणे प्रत्यक्ष,
येणे स्वप्नात पुरेसे आहे
स्वप्न तुझ्यासवे जगण्याचे
जन्मी पुढील हवेसे आहे

नकोच तो साजशृंगार तुझा
एक ती बट पुरेशी आहे...
अन कविता जन्मण्यास माझी
स्फूर्ती तुझी पुरेशी आहे....

-प्रशांत शेलटकर
8600583846

Monday, 24 June 2019

बे कं बे

बे कं बे..

लहानपणी आम्ही बेंबीच्या देठापासून बे एके बे पासून तीस दाहे तीनशे पर्यंत पाढे म्हणायचो नाही बोंबलायचो..समोर अंकलिपी असायची त्यावर अंकात आणि अक्षरांत पाढे असायचे किंवा वर्गात असलो तर समोर तक्ता असायचा *गुर्जी* किंवा *बाई*  छडीचे एक टोक आकड्यावर आणि नजर मुलांवर ठेवून पाढे म्हणून घ्यायच्या..
     बे पासून  सुसाट सुरू  झालेली गाडी..दहा पर्यंतची फास्ट लोकल एकवीस नंतर धीमी लोकल व्हायची.  एकोणतीसच्या पाढयाला तर गचके देत चालायची...परत तीस ला सुसाट सुटायची ती तीनशेला तर थेट यार्डात जाऊनच थांबायची..मज्जा यायची..
    मधली काही स्टेशन्स तर खूप रंजक असायची ...बारो दरसे तर रंगबरसे सारखे वाटायचे..तिहोत्रिदोन हे मराठी वाटायचेच नाही..काहीतरी अगम्य वाटायचे..सर्वात मस्त बे चा पाढा..म्हणजे दोनचा पाढा. या पाढ्याला जी लय असायची ती कुठल्या गाण्याला पण नसेल..
बे एके बे नाही तर बे कं बे
इथून जी सुरवात व्हायची ती आरोह अवरोह करीत साता पर्यंत आलो की बे आठी असे सरळ न म्हणता पाण्यात डुबकी घ्यावी तशी बे आss ठी ची डुबकी घ्यायची आणि पुढे जायचं...गंमत होती ती..
   तेवीस, सत्तावीस आणि एकोणतीस चे पाढे हे  पाढयातले अनुक्रमे खविस, मुंजा आणि वेताळ होते..लय छळायचे...त्यातले सत्ते , अठ्ठे, नव्वे बापजन्मांत आले नाहीत.. का कोण जाणे पण  पाच, वीस ,पंचवीस हे पाढे मित्र वाटायचे..
    एकट्याने पाढे म्हणणे कंटाळवाणे असायचे..पण वर्गात एका लयीत पाढे म्हणताना समाधीच लागायची..एक छुपा फायदा म्हणजे एकोणतीस च्या       पाढयाला फक्त तोंड आणि शरीर हलवलं तरी पुरेसे असायचे..आपण फक्त जगन्नाथाच्या रथाला हात लावायचा...बस्स

    पण आज कळतं त्यातलं विज्ञान...सर्वानी एकाचवेळी पाढे म्हणण्यामुळे.. जे समगतीस्पंदन (रेझोनान्स) तयार व्हायचा त्याचा फायदा सर्वानाच मिळायचा.एकाच वेळी दृकश्राव्य पद्धतीने म्हणजे एकाच वेळी संख्या पाहून तिचा उच्चार केल्याने ती  डोळ्याद्वारे थेट मेंदूवर कोरली जायची. त्यामुळे आज ७२ म्हटले तर बहात्तर ही अक्षरे लगेच झळकून जातात..कुठेही अजिबात गोंधळ द्विधा होत नाही..माझ्या अगोदरच्या पिढी त गणकयंत्र न वापरता केवळ नजरेवर बेरीज करणारी माणसे होती..
      मेंदूची क्षमता अफाट आहे.तो प्रथम वापरात येताना थोडा त्रास होणारच.त्याला घाबरून जर तो वापरात आणलाच नाही तर सगळंच अवघड वाटतं..
     माझ्या माहितीप्रमाणे शाळेत सामूहिक पाढे म्हणणे बंद झालं असावं किंवा ते रुक्ष पद्धतीने म्हणजे बारोदरसे ऐवजी एकशे बारा, त्रिहोत्रिदोन ऐवजी दोनशे तीन असे म्हटले जात असावे. सायंटिफिक दृष्टीने ते एकशे एक टक्के बरोबर आहे.पण पाढे म्हणण्यातले सौन्दर्य.. त्याची लय.. त्यातला आनंद कुठेतरी हरवला आहे असं वाटतं.. म्हणून तर मुलांना गणित कठीण वाटत नसेल ना...
    थर्टीन... थर्टी...फॉरटीन.. फॉरटी यातला सूक्ष्म फरक जर मुलांना जर कळत असेल तर मराठीतले आकडे का समजू शकत नाहीत..कदाचित  इंग्रजीतुन शिकणे म्हणजे प्रतिष्ठेचे..आणि मराठी म्हणजे कुठली तरी मागास अडाणी भाषा हा पालकांचा समज पाल्यात झिरपत आला असेल . म्हणून गणिती संकल्पना समजत नाहीत असे तर नसेल ना?
     मी काही शिक्षणतज्ञ नाही.पण जुने ते सर्वच टाकाऊ नसते..आणि नवीन ते नेहमीच निर्दोष असते असेही नाही. असं माझं मत आहे.
     काळा नुसार नक्कीच बदललं पाहिजे..पण एखाद लहान मूल थंडीत उघडं बसलंय ..ते थंडीने कुडकूडतय तर त्याच्या अंगावर कपडे घालाल की बाजूच्या मुलाला नागड करून त्या थंडीने कुडकूडणाऱ्या मुलाच्या बाजूला बसवाल?

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Friday, 21 June 2019

परफेक्शन

परफेक्शन....

सगळं कसं हवं परफेक्ट
नकोच कसला डिफेक्ट..
थोडी देखील चूक नको
सगळंच हवं एकदम करेक्ट

नवरा हवा हँडसम
बायको हवी ऑसम..
मुलगा हवा डॅशिंग
अन मुलगी हवी ब्लॉसम

जावई असावा एकुलता
मुलगी राहावी राणीसारखी
सून मात्र हटकून असावी
कुटुंबात राहण्यासारखी

सगळं सुख पाहिजे मला
दुःखाचा लवलेश नको
फुलंच हवीत मला नेहमी
काट्यांचा क्लेश नको...

देवालाही वेठीस धरेन मी
माझ्या अखंड सुखासाठी
नवसाची लाच देत राहीन
माझ्या अखंड सुखासाठी

जरा काटा पायात रुतला
तर जसा काही जीवच गेला
कोटीतुन लाखात आला
म्हणे जगण्यात  राम नुरला

आज असेन उद्या नसेन
इथे कोणाला असते हमी?
जिवंत आहे या क्षणी
हे सुख आहे का कमी?

जसे आहे ,जितके आहे
तितकं आनंदाने जगावे
सुखाला सुखाने गुणावे अन
दुःखाला दुःखाने भागावे

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Thursday, 20 June 2019

नकोसे

आता व्यक्त होणे
नकोसे नकोसे...
मौनात जाणे
हवेसे हवेसे...

नको चंद्र अन
नको ते चांदणे
नकोच ते उन्हाचे
कवडसे कवडसे

नको मैत्री अन
नको दुनियादारी
नको कुणाचे ते
खोटे दिलासे दिलासे

नको बोलणे अन
नको ते गुंतणे....
नको कुणाचे ते
खोटे उसासे उसासे

-प्रशांत शेलटकर
8600583846

Wednesday, 19 June 2019

पाऊस थेंब

पाऊस थेंब...

आभाळ वेडं बरसतंय,
कृष्ण मेघ दाटले नभी
ये अशी अंगणात ग,
तू  का अशी उंबऱ्यात उभी?

ये अशी अंगणात ग...
भिजू दे तुझी कोमल काया
तुझ्या विना पाऊस म्हणजे,
व्यर्थ केवळ पाणी वाया..

चिंब होऊ देत गाल तुझे...
पाऊसनक्षी..केसांवरती
पाऊस गाणे ताल धरते,
झिम्माड तुझ्या ओठांवरती

पाऊस तुझा पाऊस माझा
पाऊस आपल्या दोघांचा..
तुझ्या मिठीत धुंद झाला,
ऋतू हिरवा  पावसाचा..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Thursday, 13 June 2019

अजूनही...

अजूनही...

लग्न होऊन वर्षे झाली
तरी अजूनही लाजतेस तू
जवळ कधी आलो तर
अजूनही पदर सावरतेस तू

कानात तुझ्या बोललो तर
अजूनही नजर चोरतेस तू
आणि नजर खाली करून
हलकेच इश्श म्हणतेस तू

अजून झटकतेस ओले केस
अजूनही तीच शिकेकाई...
वय वेडेच अंमळ थांबलेले...
अजूनही तीच तरुणाई...

अजून तोच पदराचा चाळा
गुपित काही सांगताना..
अजून तेच रोखून बघणे
खोटा नकार देताना..

झंकारते अजून देहवीणा
सूर आपुले जुळताना..
अजून भैरवी सजते आपली
झुंजूमंजू  होताना....

खेळाडू जरी पुराणे..
डाव नव्याने मांडलेले..
काळाच्या बरणीत सखे
लोणचे आपले मुरलेले..

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

Thursday, 6 June 2019

हौस

हौस...

आता तनाशी भिडण्याचा
सोस उरला नाही...
पण मनाशी भिडण्याची
हौस जात नाही...

वाचुन काढावी टिप्पणे
व्यासंग इतका नाही...
पण पाने काही चाळण्याची
हौस जात नाही..

गाण्याची सुरेल पट्टी
अद्याप गवसली नाही...
पण उगाच गुणगुण्याची
हौस जात नाही...

शोधला किती मी देव
अद्याप गवसला नाही
पण माझे मलाच शोधण्याची
हौस फिटली नाही...

झेलले कित्येक पावसाळे
पण ओला झालो नाही
पण अजून चिंब भिजण्याची
हौस जात नाही...

सोसले किती ऊन मी
पण कधी तापलो नाही
पण उन्हात बसण्याची
हौस जात नाही....

आयुष्य किती वळणांचे
अद्याप ठाऊक नाही..
पण बेफाम धावण्याची
हौस जात नाही....

आवडलो कधी मी कुणाला
बिलकुल वाटत नाही..
पण प्रेमात अजून पडण्याची
हौस जात नाही....

-प्रशांत शेलटकर...
8600583846

Tuesday, 4 June 2019

गरजेपुरता गजा

गरजेपुरता...

गरजे पुरते हाय हँलो
गरजेपुरते गुडमॉर्निंग
गरजेपुरते हाउ आर यू
गरजेपुरते स्मायलिंग...

गरजेपुरता मस्का मारणे
गरजेपुरता तू देव माझा
गरज संपली गेलास उडत
कोण रे तू लागे माझा...

गरजेपुरते लावीन लोणी
गरजेपुरते डोळ्यात पाणी
गरजेपुरते लाडिक बोलणे
गरजेपुरती मधाळ वाणी..

गरजेपुरती उरली माणसे
तोवर पक्षी जोवर कणसे
जोवर खेळतो खिशात पैसा
तोवर मैफल तोवर जलसे...

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Monday, 3 June 2019

जाईचना

जाईचना...

जीव जडे जिच्यावर,
तिला काही कळेचना
फुल फुलले काळजात
गंध तिला जाईचना..

साद किती घालावी,
प्रतिसाद काही मिळेना
एक कळी रुसलेली,
खुलता कळी खुलेना..

रुतला काटा इथे तरी,
दर्द तिथे होईचना...
जखम झाली इथे तरी,
फुंकर ती घालेना...

भेटायचे आहेच तिला,
तिला सवड  मिळेना...
आवडते जरी ती मला,
तिची आवड समजेचना

जाता येता दिसते ती,
तिला मी दिसेच ना..
दिसलो जर चुकून जरासा,
ती मात्र हसेच ना...

गेलीस उडत म्हणालो तरी,
मनातून ती जाईचना...
इष्काचा  गुलजार पक्षी,
घरटे सोडून जाईचना...

-प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday, 1 June 2019

लोकं पैसे कमवतात

लोकं पैसे कमवतात

लोकं पैसे कमवतात
मी चेहरा कमावलाय
छान हसरा चेहरा..
निरागस निष्पाप चेहरा..
गोड सात्विक चेहरा...

आता मी लीलया बदलतो
माझ्या चेहऱ्यावरच्या रेषा..
भलत्याच लवचिक आहेत त्या
आज्ञाधारक मुलासारख्या,
त्या होतात आडव्या उभ्या
मला जिथे हवं तश्या..
त्याना मुळी स्वातंत्र्यच नाही
हवे तसे व्यक्त होण्याचे..
म्हणून मी हसू शकतो
आतून रडलो तरी,
म्हणून मी रडू शकतो
आतून हसलो तरी,
कारण मी चेहरा कमावलाय
लोकं पैसे कमवतात

हल्ली आरशात पण
मी खोटाच  दिसतो...
माझ्याशीच मी
खोटाच हसतो..
निर्लज्जपणे रुबाब झाडत
म्हणतो त्याला ,
दाखव ना माझा असली मी
साल्या तुझ्यात दमच नाय..
कारण मी चेहरा कमावलाय
लोकं फक्त पैसे कमवतात...

पण केव्हातरी,एकांत क्षणी
बंड करतात रेषांन रेषा..
जिथं जायचं तिथेच जातात
जेव्हा हसायचं तेव्हा हसतात
अन रडायचं तर रडतात...
मग अलगद कळून जाते..
क्षणभर का होईना
पण मुक्त केल पहिजे
कपाळावरच्या आठीला
अन तिला आणलं पाहिजे
गालावर एक स्मितरेषा बनून
आणि तेव्हा कळत ..

लोकं पैसे कमवतात
अन गमावतातही...

-प्रशांत शेलटकर
8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...