कधी तुझी आठवण
आलीच तर...
श्वास गहिवरतो....
जीव उदास होतो...
अन डोळ्यांचा
समुद्र होतो...
कधी तुझी आठवण
आलीच तर....
मी गच्चीवर जातो
तुझ्या घराच्या कौलातून
आकाशात उंच जाणारा
धूर दिसत नाही आजकाल
तरीपण मला दिसत राहतेस तू
केसांच्या बटा सावरत,
भरलरले डोळे चोळत
फुंकर घालणारी तू
त्या विझू पाहणाऱ्या जाळावर
कधी तुझी आठवण
आलीच तर..
तिथेच जातो परत,
त्याच खुणेच्या झाडाखाली
साऱ्या खुणा तशाच आहेत
तेच झाड तोच बहर
तोच सांजेचा कातर प्रहर..
हताश होऊन बसतो तिथेच
जिथे तू बसायचीस बिलगून
मी परत अनुभवतो
तो मातीचा स्पर्श ,
जिथे तुझ्या पायाच्या अंगठयाने कोरला होतास
तिथल्या ओल्या मातीवर
तुझा सलज्ज होकार...
मी परत अनुभवतो,
तो मातीचा अलवार स्पर्श...
कधी तुझी आठवण
आलीच तर..
आठवतो तो क्षण
जेव्हा तू धरला होतास
माझा हात अवचितपणे...
सारा देह चांदण्याने
तेव्हा चिंब न्हालेला..
तुझ्या डोळ्यात मीच काय
माझा आत्माही दिसलेला..
कधी तुझी आठवण
आलीच तर..
डोळे घेतो गच्च मिटून
तरी तू दिसत रहातेस..
कुठेतरी आत भिनत जातेस
तू अशी आत भिनत गेलीस
की मी मिटून घेतो स्वतःला
तू माझ्यातच रहाविस म्हणून
कधी तुझी आठवण
आलीच तर..
मी असाच मिटून घेतो स्वतःला
कारण कुणाला कळू नये तुझं
माझ्यातल अस्तित्व...
एवढं तरी जपायला हवंच ना..
कधी तुझी आठवण
आलीच तर..
मी असंच करतो
मी असंच करतो.....
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment