Ad

Sunday, 28 April 2019

काय म्हणू तुला?

काय म्हणू तुला?

चेहरा म्हणू की...
पुनवेचा चंद्र साजरा
ओठ म्हणू की...
प्राजक्ताचा देठ गोजिरा

केस म्हणू की,
रात्रीचा काळोख गहिरा
डोळे म्हणू की,
लाजेचा जागता पहारा

गाल म्हणू की,
फुलला गुलाब लाजरा
पाय म्हणू की,
थिरके मोर नाचरा...

काय म्हणू तुला,
सांग कानात जरा
तू राधा की?
मनभावन मीरा....

-प्रशांत शेलटकर
8600583846

Monday, 22 April 2019

ओळख

ओळख

जसा मी दिसतो,
तसा मी असतो का?
जसा मी असतो,
तसा मी दिसतो का?

जेव्हा मी हसतो,
तेव्हा खरच मी हसतो का?
जेव्हा मी रडतो,
तेव्हा ते आतून असत का?

तुला छान म्हणताना,
ते मनापासून असतं का?
आत कुठे तरी खोलवर
जळत कुठे असतं का?

पैसा काही सर्वस्व नाही,
उगाचच मी म्हणतो का?
आपल्यापाशी नाही त्याची
खंत कुठे लागते का?

काम क्रोध लोभ मत्सर
कधी कोणाला चुकले का?
वरवर डोळे मिटून कधी
ध्यान-समाधी लागते का?

फसवशील तू दुनियेला
स्वतःला फसवशील का?
तुझ्यातच लपलेल्या तुला
कधी ओळख देशील का?

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

Thursday, 18 April 2019

तेव्हा कविता जन्मते

मनातले चांदणे जेव्हा
अलगद कागदावर उतरते
तेव्हा  कविता जन्मते..

नक्षत्रांची नजाकत जेव्हा
शब्दांना येते तेव्हा
कविता जन्मते...

कल्पनेचे पंख लेवून जेव्हा
प्रतिभेचे फुलपाखरू होते
तेव्हा कविता जन्मते...

तिच्या चिंब भिजल्या गालावर
जेव्हा चुकार बट येते...
तेव्हा कविता जन्मते...

न घसरलेली ओढणी जेव्हा
ती उगाचच सावरते..
तेव्हा कविता जन्मते...

काळजातली काळजी जेव्हा
तिच्या डोळ्यात उतरते
तेव्हा कविता जन्मते...

तिच्या नजरेचा डंख जेव्हा
थेट काळजाला डसतो
तेव्हा कविता जन्मते...

आणि

आठवणींचा पेरा काळजात
करून जेव्हा ती दूर दूर जाते
तेव्हा कविता जन्मते...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

Wednesday, 17 April 2019

वारुणी

अरे निर्व्यसनी झालो
काय पराक्रम केला
विना वारूणी हा व्यर्थ
जन्म वाया गेला....

कैफ मदीरेचा का
तू न कधी चाखला...
कधी बेहोष मदहोश
तू न  टल्ली झाला
अरे वेड्या असा कसा
तू  वाया गेला...
विना वारूणी हा व्यर्थ
जन्म वाया गेला....

नको पिपाणी वाजवू रे
तुझ्या न पिण्याची..
पिण्याने न होते
क्षती रे पुण्याची...
हिशेब पाप पुण्याचा
जरी चोख झाला..
विना वारूणी हा व्यर्थ
जन्म वाया गेला....

झिंग मद्याची ती
बरी रे बरी म्हणावी
झिंगताच  माणूस
लोकांस रिझवी
न पिताच खोटेपणाचा
तुझ्या कळस रे झाला
विना वारूणी हा व्यर्थ
जन्म वाया गेला....

मद्य प्रशिता जन रे
फक्त सत्य बोलती
झिंगले किती जरी
असत्यास न शिवती
न प्यालास कधी तिथेच
घोळ मोठा झाला..
विना वारूणी हा व्यर्थ
जन्म वाया गेला....

कित्येक गहन प्रश्न जे
बुद्धिमतांस न सुटले
तेच मद्यपीनी क्षणांत
फक्त "बसुनी' सोडविले..
या " बसण्याचा" अर्थ
तुला ना कधी उमगला
विना वारूणी हा व्यर्थ
जन्म वाया गेला....

-प्रशांत शेलटकर

कठिण शब्दांचे अर्थ

वारूणी - दारू
क्षती-नुकसान
टल्ली- मद्य प्राशन केल्यावर येणारी समाधी अवस्था

😀😀😀😀😀

Just fun

मी

मी किती सज्जन आहे
माझा डी पी तुम्ही बघा
मला काय म्हणायचे आहे
ते स्टेटस मधून  वाचा...

भेटलात जर सकाळी
तर मी हसणार पण नाही
Gm केलयं ना सकाळी
तुम्हाला कळत कस नाही..

तुमची रोजची खुशाली
मला मेसेज मधून कळते
बोलण्याची गरज सांगा
मग कुठे उरते...?

असाल आजारी जर तुम्ही
फक्त Take care म्हणेन....
आधारासाठी हवं तर एक
रडका ईमोजी टाकेन....

सकाळी लावीन तुम्हाला
Good morning चा टिळा
रात्री तुमच्यासाठी झुलवींन
Good night चा झुला...

कुणी देवाघरी गेलं तर
त्याला Rest in peace ठेऊ
वाढदिवसाला कुणाच्या
HBD चे status ठेऊ...

फसवे रंग अन फसवे ढंग...
फसव्या जगात सगळे दंग
कधी वाटते सगळे फेकून द्यावे
अन मुखवट्याच्या पल्याड जावे

प्रशांत शेलटकर

Thursday, 4 April 2019

रात्र

रात्र...

रात्र  सावळी
कातर कातर...
झोपली अंधाराची
घेऊन चादर चादर

कुठे प्रणयाची
रात्र धुंदर धुंदर
कुठे खोकल्याची
उबळ निरंतर..
मस्त झोपते रात्र कोडगी
अंधाराची घेऊन चादर चादर

कुठे जन्मती ,
जीव कोवळे..
कुठे चालले मरण सोहळे
खंत  ना आनंद  पळभर..
मस्त झोपते रात्र कोडगी
अंधाराची घेऊन चादर चादर

कुठे यंत्राची ,
अखंड घरघर
कुठे रातकिड्यांची
अखंड किरकिर,
तिला कशाचीच नाही फिकीर
मस्त झोपते रात्र कोडगी
अंधाराची घेऊन चादर चादर

काळोखाची पालखी निघाली
काळोखाचाच करीत गजर
काळोखाच्या काळ्या अंबरी
काळोखाचेच टांगून झुंबर..
विझवून सारे कण उजेडाचे
मस्त झोपते रात्र कोडगी
अंधाराची घेऊन चादर चादर

-प्रशांत शेलटकर
8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...