Ad

Sunday 22 July 2018

महादेवाचा डोह

महादेवाचा डोह

मुंबई-वडगाव...21 ऑगस्ट 1992..बस सुटण्याची वेळ सकाळी 7.00 सीट नं 11 ...सर्व तिकीट चेक केलं. पॉकेट मध्ये ठेवलं आणि वडगावला जायची तयारी करू लागलो.
      वडगाव माझं गाव.कोकणात वसलेलं अर्थातच निसर्गरम्य..गाव हजार पाचशे वस्तीच.. आमचं घराणं खोतांचं.. नाना खोत माझे वडील..दहावी नंतर गाव सोडलं.नानाच म्हणाले तसं...
ते म्हणाले, "प्रभात तू गावात राहू नकोस,इथे गावात काय आहे...सगळं काही कुळ कायद्यात गमावलं आपण..आता फक्त नावाला खोत" नानांचे डोळे पाणावले होते तेव्हा.. तेव्हापासून गाव सोडलं आज पाच वर्षाने जातोय गावाला..गौरी गणपतीसाठी...सकाळीच नानांच पत्र आलं होतं. मी लागलीच तयारीला लागलो होतो. गावाची ओढ होतीच पण तिची ओढ जास्तच...
    
तिचं नाव राधा....सुतारवाडीतल्या बाबू सुताराची धाकटी लेक...माझी बाल मैत्रीण...आणि बरंच काही...अगदी बालवाडीपासून  आम्ही एकत्र...शाळेत 15 ऑगस्टला गोळ्या वाटायचे तेव्हा राधा आपल्या वाटेची गोळी अर्धी तोडून मला द्यायची...ती असं का करायची ? ते मला कधी कळलं नाही. पण आमच्यात एक अदृश्य नात होत ते कधीच कोणाला कळलं नाही...
*******

आज 21 ऑगस्ट ...मी वडगावला जाणाऱ्या बसमध्ये आहे..मस्त खिडकीची जागा मिळालीय...सकाळचे 8 वाजलेत...बस आता मार्गस्थ झालीय..माझी नजर बाहेरची हिरवळ टिपतेय.. नुकताच पाऊस पडून गेलाय..एक हवाहवासा वाटणारा गारठा हवेत पसरलाय..गावाकडचा पाऊस आठवतोय...शाळा आठवतेय....आठवी ब सर्वात पुढची बेंच...पाऊस पडतोय
..मराठीचा तास चालू आहे..कुलकर्णी सर केशवसुतांची श्रावणमासी हर्ष मानसी शिकवतायत...पुस्तकातील कविता प्रत्यक्ष अनुभवतोय...अस सुख गावातच मिळू शकतं.. माझ्या बाजूला मुलींच्या बाजूला राधा बसलीय..तीच लक्ष शिकवण्याकडे अजिबात नाहीये..घनव्याकुळ डोळयांनी ती माझ्याकडे पाहतेय... ही नजर खूप अस्वस्थ करतेय मला...तिचे डोळे कमालीचे बोलके..खरं तर ती बोलली नाही तरी तिचे डोळे बोलतात च...आता पण तिचे डोळे बोलतायत तिला मला भेटायचं आहे...आणि खरंच ती संध्याकाळी भेटली ..म्हणाली,
"प्रभात तुझी मराठीची वही हवीय,देशील का?"
का ग? ...मी
"नाही रे मला हवी आहे , दे ना
मी तिला नाही म्हणू शकलो नाही...
    दुसऱ्या दिवशी तिने मराठीची वही परत केली , म्हणाली उघडून बघ नंतर एकटा असशील तेव्हा...
    संध्याकाळी घरी आलो ..रात्री जेवण झाल्यावर थरथरत्या हाताने वही उघडली...आत छान मोरपीस आणि एक घडी केलेला कागद...मी अलगद कागद उघडला....
" प्रिय प्रभात,
   तू मला प्रचंड आवडतोस..माझं प्रेम आहे तुझ्यावर..तुझं आहे का ते माहीत नाही...पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे..."  उद्या तुझी महादेवाच्या डोहापाशी वाट पहाते.. येशील ना?...
    तुझीच
     ....राधा...

वाचून चिठी लपवून ठेवली. छाती धडधडत होती..कानातून गरम वाफा येत होत्या... राधा मलाही आवडत होती... पण बोलण्याच धैर्य होत नव्हतं..तिने ते दाखवलं...तिने शेवटी लिहिलेला तुझीच हा शब्द परत परत वाचला...तुझीच मधला च किती रोमँटिक...मला गुदगुदल्या झाल्या तो " च" वाचुन...खरंच प्रेम किती पझेसिव्ह असतं नाही!
    दुसऱ्या दिवशी मी तिला भेटण्यासाठी महादेवाच्या डोहावर निघालो तेव्हा सहा वाजले होते....
     *****
गाडीत बसल्या पासून मला गावाचीच तंद्री लागली होती...
राधेचाच विचार मनात पिंगा घालत होता..तिची आणि माझी पाहिली भेट आठवत होती....
*****
महादेवाचे मंदिर गावाच्या एकाबाजूला होतं... बाजूने बारमाही नदी वाहत होती...मंदिराच्या बाजूलाच डोह होता.. मंदिराच्या आवारात एक बेलाचे झाड त्या डोहात आपले प्रतिबिंब पाहत बसलेले असायचे. त्याचा बाजूला चाफ्याचे झाड होते..त्या सुनसान जागेत कधी कधी बेलाची फळ त्या डोहाच्या पाण्यात पडायची तेवढाच आवाज...बाकी सगळी निरव शांतता....
      मी डोहाकडे पोहोचलो तेव्हा राधा चाफ्याची फुल वेचित होती...
     " राधा.....मी
     "प्रभात....ती
बराच वेळ आम्ही बोललोच नाही...व्यक्त व्हायला शब्द असायलाच हवे अस नाही..
मी अलगद राधाचा हात हातात घेतला, म्हणालो...
राधा या तुझ्या हाताशिवाय दुसऱ्या हातांचा विचारही नाही करणार मी...
राधाचे डोळे भरून आले..म्हणाली,...
"प्रभात तू माझा श्वास आहेस...तुझ्याशिवाय राधा जगू शकत नाही...
     त्यानंतर आम्ही दोघे त्या डोहाच्या बाजूला बसलो .आमची दोघांची प्रतिबिंब पाण्यात दिसत होती.इतक्यात वरून एक चाफ्याचे फुल त्या डोहात पडलं....आमची प्रतिबिंब एक झाली...मी राधेला म्हणालो,
" बघ राधे आपण एकरूप झालो..."
"आपण कधीच एकरूप झालोय रे"...राधा
तिच्या डोळ्यांचा डोह नेहमीप्रमाणे भरून वाहू लागला...
     आम्ही वरचेवर भेटू लागलो..अखेर व्हायचं ते झालं...मी दहावीला असताना नानांपर्यंत बातमी पोहोचलीच त्या रात्री नानांनी मला खडसावून सांगितलं, "हे बघ प्रभात मला त्या सुताराच्या पोरीबद्दल सगळं समजलंय. हे थांबायला हवं...कुळाचार पाळलेच पाहिजेत..
    त्यानंतर मी मुंबईला आलो.राधेला दर पंधरा दिवसातून पत्र लिहीत होतो.तिची पत्र मिळत होती.मी सेटल झालो की मी राधेशी लग्न करणार होतो..नानांची पर्वा करणार नव्हतो...
      आज मी येतोय हे राधेला पत्राने कळवलं होतं आणि लग्नाबाबत पण कळवलं होत...राधेला कधी भेटतोय अस झालं होतं... पाच वर्षे फक्त पत्रातून भेटत होतो...

******
गाडी वडगाव स्टँडला लागत होती..सहा वाजत आले होते. मी स्टँडवर उतरलो .सॅक खांद्याला लावली आणि निघालो....वडगाव तिथून चालत गेलं तर अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर होत.
निघालो...
नुकतीच पावसाची सर पडून गेलेली...पायवाटेवरचा          चिखल तुडवत मी चालत होतो. अर्धा तास चालल्यावर वडापाशी थांबलो.. ती माझी शाळेपासूनची सवय होती. तिथून पुढे दरीत माझं गाव वसलं होतो . वडापाशी थांबून सगळं गाव नजरेत घ्यायचं आणि मग घाटी उतरायला सुरुवात करायची ..हे मी नेहमीच करायचो शाळेत असताना..आताही तसच केलं आणि घाटी उतरू लागलो..
     थोडं खाली गेल्याचार दोन पायवाटा लागतात..  एक पायवाट माझ्या घराकडे जायची अन दुसरी महादेवाच्या डोहाकडे ...तीच पायवाट पुढे सुतारवाडीत. शाळेत असल्यापासूनच घरी जाताना मी प्रथम महादेवाच्या डोहाकडे जात असे.महादेवाचे दर्शन घेऊन पुढे घरी जात असे.राधा भेटल्यावर तीला भेटण्यासाठी तिथे जात राहिलो. बहुतेक वेळी ती तिथल्या चाफ्याची फुले गोळा करत असायची. मी गेल्यावर माझ्या ओंजळीत ती फुले द्यायची तन आणि मन मोहरून जायचं..मग आम्ही डोहात पाय सोडून बसायचो..ती तिथे नसली तरी मी तिथल्या डोहात पाय सोडून बसायचो..तिला आठवणीने मनात चाफा फुलायचा...
      आता पण मी तेच केलं . माझी पावलं डोहाकडे वळलीच.पावसाचे दिवस असल्याने नदीचा गंभीर आवाज दूरवर ऐकू जात होता..
      माझ्या मनात राधेच्या आठवणींची फुलपाखरं बागडत होती. ती असेल का तिथे.? तशीच असेल का चाफ्याची फुलं वेचत? मी पाठवलेलं पत्र जर मिळालं असेल का? आज मी तिला सगळं सांगणार आहे...दिवाळीत लग्न करायचं आणि तिला घेऊन मुंबईला यायचं...नानांचा विरोध असला तरी...किती खुश होइल ना ती! तिचे डोळे भरून येतील...कशी दिसत असेल ती ? आज पाच वर्षांनी पाहीन तिला...स्वप्नांच्या ढगांवर तरंगतच मी डोहा पाशी आलो..आणि खरंच ती होती तिथे..चाफे वेचत...मला पाठमोरी होती...जवळ गेलो..
"राधा"......मी
तिने वळून पाहिलं तिच्या चेहऱ्यावर काय भाव होते ते मी आजही वाचू शकलो नाही..प्रेम..अगतिकता..ओढ.सारं काही एकाच वेळी तिच्या चेहऱ्यावर नांदत होतं.... तिचे तिचे डोळे भरून आले होते...

"आलास , तुझीच वाट पहात होते"...राधा
" हो...राधे आत्ताच येतोय म्हटलं तुला भेटून जावं....मी
'पण तुला कसं कळलं की मी इथे आहे"....राधा
" माझं अंतर्मन सांगत होत की तू इथे असशीलच".....मी
तीचे डोळे भरून आले ती माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू लागली.तिचा चेहरा ओंजळीत घेऊन मी तिला म्हणालो, तू का रडतेस? अग आपण काही झालं तरी दिवाळीत लग्न करायचं आहे,
ती फक्त रडत राहिली...मी तिला थोपटत राहिलो लहान मुलासारखं...
" आता उशीर झालाय रे प्रभात....खरच खूप उशीर"
"हे बघ राधे फक्त दोन महिने थांब , मी नानांशी बोलतो आज रात्री आणि उद्या सकाळी तुझ्या बाबांशी..बापूंशी बोलतो...जर दोघांकडून नकार आला तर आपण पळून जाऊन लग्न करू"
     "नको प्रभात आता खूप उशीर झालाय...तू दुसरी मुलगी बघ आणि सुखी हो..."
" अग पण का?" मी जरा     त्राग्यानेच बोललो..
किती बदललीस तू? महिन्यापूर्वी किती स्वप्न पहिली आपण तू किती खुश होतीस पण आता अचानक अस काय झालं?"
"नाही रे असं काही नाही..पण काही गोष्टी दैवाधिन असतात रे प्रभात....आपण काहीच करू शकत नाही...राधा
काही क्षण असेच शांततेत गेले..वातावरण एकदम शांत होत एक त्या डोहाचा आवाज सोडला तर बाकी सगळीकडे शांत...इतक्यात परत पाऊस चालू झाला ..म्हणालो,
चल आपण देवळात बसू आणि निवांत बोलू ...
तशी ती झटकन बाजूला होत म्हणाली,
"नको मला निघायला हवं...तिनं पटकन माझा हात हातात घेतला अन चाफ्याची दोन फुल माझ्या हातात ठेवली..गालावर ओघळणारे अश्रू पुसत ती म्हणाली ,
" सुखी रहा प्रभात, तुझी आठवण या चाफ्यासारखीच दरवळत राहील मनात"...
"अग थांब ना..."   मी
"नको आधीच उशीर झालाय मला जायला हवं"...ती
बरं मी उद्या येतो तुझ्या घरी
..
..
नको रे त्रास होईल तुला...
काळजी घे रे...तिचा स्वर कातर झाला ...डोळे भरून पाहिलं माझ्याकडे एक हुंदका तिच्या गळ्यात दाटून आला तिने तो ओढणीने दाबून धरला आणि ती निघून गेली...मी स्तब्ध झालो...काही सुचत नव्हतं...आणि माझी पावलं घराकडे वळली....
घरी येऊ नको त्रास होईल या तिच्या वाक्याचा उलगडा उद्याच होणार होता....

घरी आलो. नाना घरातच होते...
आलास? ...इतका उशीर का? नानांनी  विचारलं , मी म्हटलं "नाना येता येता ,महादेवाच्या देवळात जाऊन आलो .
नाना काही बोलले नाह फक्त एबढेच बोलले मोरीत जा आणि हात पाय धुऊन घे...आणि चार घास खाऊन घे...नानांच्या  बोलण्यात माया असली तरी एक प्रकारची अस्वस्थता होती.त्यांना काहीतरी सांगायचं होत पण त्यांना सांगता येत नव्हतं...
     मला भूक लागली होतीच .चार घास खाऊन मी लगेचच झोपायच्या खोलीत गेलो. झोप येतच नव्हती.सारखा राधेचा चेहरा दिसत होता...ती अस का बोलली असेल.?.ती इतकी रडवेली का झाली असेल? सारे प्रश्न पिंगा घालू लागले. महिन्याभरापूर्वीच तीच पत्र आलं होतं किती आनंदी होती ती! आणि आज काय झालंय तिला? अशी निर्वाणीची भाषा ती का करतेय? ते काही नाही  उद्या सुतारवाडीत जायचंच असा निर्धार करूनच झोपी गेलो..
    
सकाळ झाली....चहा वगैरे झाला.नानांना सांगितलं की मी जरा बाहेर जातोय..आमच्या
घरापासून सुतारवाडी 15 मिनिटाच्या अंतरावर..निघालो पावसाळा असल्याने पायवाट निसरडी झालेली.. पायवाटेच्या बाजूला भात शेती ..चांगलं गुडघ्यापर्यंत भात वर आलेलं..सगळे दळे पाण्याने तुडुंब भरलेले..कुठे कुठे बांध फोडून पाणी बाहेर वाहत होतं. आणि मी राधेला भेटायच्या ओढीने झपझप चालत होतो.. कशी असेल ती? काय करत असेल?तीच लग्न दुसरीकडे ठरवत असतील का? नाही नाही तस होणार नाही...ती माझीच आहे आणि माझीच राहील...मी समजावेंन नानांना आणि बापुना..किती रडवेली झाली होती काल...! नाही मी तिच्याशिवाय नाही जगू शकत...तिला मी मुंबईला घेऊन जाईन नक्कीच ...
   माझ्या मनात हे विचारांचं काहूर चालू असतानाच मी सुतारवाडीपर्यन्त पोहोचलो होतो....

सुतारांची चार घर ओलांडली की बापू सुताराचं घर लागतं. मी अंगणात पोहोचलो.त्याच दुपाकी कौलारू घर नुकतच जाग झालं होतं. त्याच्या कौलातून निळा धूर येत होता. दार बंदच होतं.म्हणून रेजातुन आत डोकावलो... ओटीवर कोणीच नव्हते..मी दरवाजाची कडी वाजवली...थोड्यावेळाने  बापू सुतारानेच दार उघडलं ..करकर करीतच दरवाजा उघडला..जणू त्या दरवाजालाच माझं येणं आवडलं नसावं...
"कोण परब्या बाबू तू?" ये...
माझ्याकडे पाहत बापू ने आत बसण्याची खूण केली..थोडं वाकुनच मी आत आलो.बापूंनी बसायला खुर्ची दिली आणि पाणी आणण्यासाठी आत गेले...
      मी खुर्चीवर बसलो. मी जिथं बसलो होतो ती लांबलचक पडवी होती. त्यात सुतारकामाचे सामान पडले होते.पडवीला लागूनच ओटी ...त्यामागे माजघर ...माजघराच्या दरवाजाच्या भिंतीच्यावर देवांचे फोटो लावले होते त्याच ओळीत पुढे राधाच्या आजी-आजोबांचे फोटो लावलेला होता.आणि त्याच्या बाजूला राधाच्या आईचा फोटो होता...आणि त्याच्या बाजूला एक नवीनच फोटो लागला होता..कुणाचा बरं... जवळ जाऊन पाहावं म्हणून मी उठून ओटीवर गेलो...फोटो  पहिला अन मी हादरलोच...सगळं घर आपल्याभोवती गरगर फिरतेय असा भास झाला... घशाला कोरड पडली...राधा....अस काहीस मी बोललो आणि तीथेच चक्कर येऊन पडलो....
       परब्या सावध हो...असे काहीसे शब्द  कानावर येत होते... पाण्याच्या हबकऱ्याने चेहरा भिजला होता...डोळे अलगद उघडले तर बापू सुताराचा अंधुक चेहरा दिसू लागला..क्षणभरात मी जागा झालो.. मी स्वप्नात की वास्तवात तेच कळेना..राधा या जगात नाही यावर मी विश्वासच ठेवायला तयार नव्हतो...
"कसं शक्य आहे बापू काका मी कालच पहिली हो तिला...
"कुठे पाहिलीस परब्या अरे कालच तीच बारावं झालं लेका..." अस म्हणून बापू लहान मुलासारखं रडू लागला..नक्षत्रासारखी लेक माझी साध्या तापाने गेली रे....
शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाव घेत होती..सारख म्हणत होती प्रभात आला की चाफ्याची फुल देणार आहे त्याला...
     मी बाहेर आलो..सारं काही संपलं होतं..घरी येऊ नकोस त्रास होईल तुला या राधाच्या बोलण्याची आठवण झाली आता त्याचा अर्थ समजला होता....
बापुची समजूत घालून मी घरी आलो..नानांना म्हटलं नाना मी उद्या निघतोय सकाळी...नाना काही बोलले नाहीत फक्त इतकंच म्हणाले, जितका गावापासून लांब राहशील तितकं विसरशील रे...
    मी निघालो..महादेवाच्या डोहापाशी आलो...चाफा अबोल झाला होता... बेलाच झाड नेहमीप्रमाणेच आपलं प्रातिबिंब पाहत उभं होत..
   मी डोहात पाय सोडून बसलो ...आणि स्वतःला मोकळं केलं..रडून घेतलं...डोहात फक्त माझंच प्रतिबिंब दिसत होतं.. माझी राधा दिगंताच्या प्रवासाला निघून गेली होती...आता मला चिमण्या दातांनी अर्धी गोळी तोडून देणार कोणी उरल नव्हतं... माझ्या रित्या ओंजळीत चाफ्याची फुल घालणारी तो परिमळ माझ्यासाठी सोडून निघून गेली होती... दूर कधीच परत न येण्यासाठी....
      मी मुंबईला आलो.. चाफ्याची फुलं काचेच्या बरणीत ठेवली..बरणीचे झाकण घट्ट लावून घेतलं नेहमीसाठी....परत कधीही न उघडण्यासाठी...

समाप्त

प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

मनातलं-#४

मनातलं -# -4 स्वसंवेद्य.. सखोल विचार केला तर आपण जिवंत आहोत म्हणजे मानवी मेंदूच्या मर्यादेत राहून केलेले आकलन आहे. सगळ्या जीवंत माणसांनी जिव...