Ad

Saturday, 28 April 2018

प्रीती

कसं सांगू तुला ...
ओढ तुझी किती आहे..
तुझ्यासाठी मनामध्ये
अव्यक्त पण प्रिती आहे...

जरी दूर गेलीस तू
अंतरात निरंतर तू
पापण्यांच्या पंखामध्ये
दाटून नित्य येतेस तू....
तुला डोळ्यात मी
नित्य जपणार आहे...
तुझ्यासाठी मनामध्ये
अव्यक्त पण प्रिती आहे

जरी लक्ष दीप ते
उजळती देवालयी
तरी चित्तास शांती
देते ती स्निग्ध समई
तुला त्या समईत
नित्य पहातो आहे
तुझ्यासाठी मनामध्ये
अव्यक्त पण प्रिती आहे

-प्रशांत शेलटकर
  रत्नागिरी

Thursday, 19 April 2018

बट

तुझ्या डोळ्यावर येणारी ती चुकार बट...
अलगद बाजूला सारून ...
माझी नजर उतरते...
तुझ्या डोळ्यांच्या डोहात....
तेव्हा कळतं मला मी,
किती भिजून चिंब झालोय
तुझ्या प्रेमात....
आणि तू अलगद टिपून घेतेस
माझ्या ओठांवरचे तुझेच गाणे
तुझ्याच गुलाबी ओठांनी..
तेव्हा तन-मनाची  होते सतार
आणि छेडून जातो तुझ्याही मनात
एक अलवार ...मेघ-मल्हार

-प्रशांत शेलटकर

Wednesday, 18 April 2018

मी

अनादी मी अनंत मी
शिशिर मी वसंत मी
चराचरात व्यापलेला
विश्वेश भगवंत मी...

सागर मी सरिता मी
हिमालय मी सह्यकडा मी
त्रिखंड व्यापूनी उरलेला
विश्वरूपी वामन मी....

काम मी अन क्रोधही मी
मोह मी अन मद ही मी
षडविकारां पलीकडला
निर्गूण निराकार रामही मी

व्योम मी ...ओम मी
जड मी ..चेतन मी....
विश्व व्यापलेला केवळ
ओंकार मी ओंकार मी..

-प्रशांत शेलटकर

Tuesday, 17 April 2018

डीपी

मी किती सज्जन आहे
माझा डी पी तुम्ही बघा
मला काय म्हणायचे आहे
ते स्टेटस मधून  वाचा...

भेटलात जर सकाळी
तर मी हसणार पण नाही
Gm केलयं ना सकाळी
तुम्हाला कळत कस नाही..

तुमची रोजची खुशाली
मला मेसेज मधून कळते
बोलण्याची गरज सांगा
मग कुठे उरते...?

असाल आजारी जर तुम्ही
फक्त Take care म्हणेन....
आधारासाठी हवं तर एक
रडका ईमोजी टाकेन....

सकाळी लावीन तुम्हाला
Good morning चा टिळा
रात्री तुमच्यासाठी झुलवींन
Good night चा झुला...

कुणी देवाघरी गेलं तर
त्याला Rest in peace ठेऊ
वाढदिवसाला कुणाच्या
HBD चे status ठेऊ...

फसवे रंग अन फसवे ढंग...
फसव्या जगात सगळे दंग
कधी वाटते सगळे फेकून द्यावे
अन मुखवट्याच्या पल्याड जावे

प्रशांत शेलटकर

Friday, 13 April 2018

सांगा मी कशी दिसते

"सांगा मी कशी दिसते"

तू सुंदर दिसतेस....
जेव्हा तू तुझे ओले केस
झटकतेस ..आणि...
मान किंचित तिरपी करून टॉवेलने लपेटून  टाकतेस
तुझ्या रेशमी केसांना...
तेव्हा तू खरंच सुंदर दिसतेस..

तू सुंदर दिसतेस...
कोरड्या झालेल्या केसांची
एका लयीत वेणी घालताना
..किंवा त्याच केसांचा नजाकतीने नाजूक अंबाडा घालताना...
तेव्हा तू खरंच सुंदर दिसतेस..

तू सुंदर दिसतेस...
जेव्हा तुझी नाजूक बोटे
अलगद सारतात कानामागे
गालावर चुकून आलेली बट
आणि...
ती बट पुन्हा गालावर येते..
आता तू ती तशीच राहू देतेस
तेव्हा तू खरंच सुंदर दिसतेस..

आणि तू खरच सुंदर दिसतेस  जेव्हा तू न्याहाळतेस स्वतःला
समोरच्या बिलोरी आरशात..
ओठ किंचित विलग करून
हसतेस स्वतःशीच ....
आणि....
मला विचारतेस अधिरपणे
"सांगा मी कशी दिसते"
तेव्हा तू खरंच सुंदर दिसतेस..
खरंच खूप सुंदर दिसतेस...

-प्रशांत शेलटकर
  रत्नागिरी

Wednesday, 11 April 2018

शून्य..

बरे झाले मी शून्य झालो....
कधी न इतका मी धन्य झालो

नकाराची न खंत आता
होकाराचा न आनंद आता...
चांदणे उन्हाचे  झेलीत चाललो
बरे झाले मी शून्य झालो....
कधी न इतका मी धन्य झालो

आलो कुठून हे ठाऊक नाही
जावे कुठे ते ठरवलेच नाही
उरी माझेच गाणे गात चाललो
बरे झाले मी शून्य झालो....
कधी न इतका मी धन्य झालो

देव शोधता शोधता देव झालो
देणे स्वतःचे स्वतःलाच देत गेलो
अन देता देता मी पूर्ण होत गेलो
बरे झाले मी शून्य झालो....
कधी न इतका मी धन्य झालो

ही शून्यावस्था की म्हणू समाधी
नको रे मनाला कसली उपाधी
जडातून असा मी चैतन्य झालो
बरे झाले मी शून्य झालो
कधी न इतका मी धन्य झालो

-प्रशांत शेलटकर
रत्नागिरी

Sunday, 8 April 2018

आता हे केलंच पाहिजे

बस्स झालं .....
आता हे केलंच पाहिजे
हे व्हाट्सअप  आता
सोडलच पाहिजे....

मॉर्निंग नसली गुड तरी
गुडमॉर्निंग म्हणावं लागत
मनात असो वा नसो
गुडनाइट करावच लागतं
बस्स झालं....
आता  हे थांबलच पाहिजे
हे व्हाट्सअप  आता
सोडलच पाहिजे....

Dp कसाही असो
छान छान म्हणावं लागत.
मनात नसल तरी..
लाइक हे द्यावच लागतं
बस्स झालं....
आता  हे थांबलच पाहिजे
हे व्हाट्सअप  आता
सोडलच पाहिजे....

वाढदिवस असो की जयंती
दात काढून हसावं लागतं
कोण गेलं जर का वरती
तर खोटं खोटं रडावं लागतं
बस्स झालं....
आता  हे थांबलच पाहिजे
हे व्हाट्सअप  आता
सोडलच पाहिजे....

बळेच घेऊन मांडीवरती
उपदेशाचे डोस पाजती
तेहतीस कोटी देवांनाही
सणा सुदीला वेठीस धरती
बस्स झालं....
आता  हे थांबलच पाहिजे
हे व्हाट्सअप  आता
सोडलच पाहिजे....

काळजातली काळजी
आता फक्त शब्दांत उरली...
Take care म्हटलं की
जबाबदारी माझी संपली
बस्स झालं....
आता  हे थांबलच पाहिजे
हे व्हाट्सअप  आता
सोडलच पाहिजे....

आता मात्र मी एक
नक्की  करणार आहे....
Virtual कडून Reality कडे
नक्कीच जाणार आहे
कारण खरंच....
बस्स झालं....
आता  हे थांबलच पाहिजे
हे व्हाट्सअप  आता
सोडलच पाहिजे....

-प्रशांत शेलटकर
  रत्नागिरी

Thursday, 5 April 2018

देव

देव मानावा की मानू नये
या भानगडीत मी पडत नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही

ज्यांना देव हवा आहे
त्यांच्यासाठी तो श्वास आहे
ज्यांना देव नकोच आहे
त्यांच्यासाठी तो  भास आहे..
आस्तिक नास्तिक वादात
मी कधीच पडत नाही....
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही....

हार घेऊन रांगेत कधी
मी उभा रहात नाही...
पाव किलो पेढ्याची लाच
मी देवाला कधी देत नाही
जो देतो भरभरून जगाला
त्याला मी कधी देत नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही...

जे होणारच आहे ....
ते कधी टळत नाही...
खाटल्यावर बसून
कोणताच हरी फळत नाही
म्हणून मी कधी ...
देवास वेठीस धरीत नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही...

देव देवळात कधीच नसतो
तो शेतात राबत असतो
तो सीमेवर लढत असतो
तो कधी आनंदवनात असतो
कधी हेमलकसात असतो...
देव शाळेत शिकवत असतो
कधी देवच  शिकत असतो
म्हणून ....
मी देवळात कधी जात नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही...

--प्रशांत शेलटकर
    रत्नागिरी

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...