"सांगा मी कशी दिसते"
तू सुंदर दिसतेस....
जेव्हा तू तुझे ओले केस
झटकतेस ..आणि...
मान किंचित तिरपी करून टॉवेलने लपेटून टाकतेस
तुझ्या रेशमी केसांना...
तेव्हा तू खरंच सुंदर दिसतेस..
तू सुंदर दिसतेस...
कोरड्या झालेल्या केसांची
एका लयीत वेणी घालताना
..किंवा त्याच केसांचा नजाकतीने नाजूक अंबाडा घालताना...
तेव्हा तू खरंच सुंदर दिसतेस..
तू सुंदर दिसतेस...
जेव्हा तुझी नाजूक बोटे
अलगद सारतात कानामागे
गालावर चुकून आलेली बट
आणि...
ती बट पुन्हा गालावर येते..
आता तू ती तशीच राहू देतेस
तेव्हा तू खरंच सुंदर दिसतेस..
आणि तू खरच सुंदर दिसतेस जेव्हा तू न्याहाळतेस स्वतःला
समोरच्या बिलोरी आरशात..
ओठ किंचित विलग करून
हसतेस स्वतःशीच ....
आणि....
मला विचारतेस अधिरपणे
"सांगा मी कशी दिसते"
तेव्हा तू खरंच सुंदर दिसतेस..
खरंच खूप सुंदर दिसतेस...
-प्रशांत शेलटकर
रत्नागिरी
No comments:
Post a Comment