Ad

Monday, 12 February 2018

डोळे बेंइमान होतील म्हणून

डोळे बेंइमान होतील म्हणून

क्षणभर तू नजर चोरलीस
अश्रू  बंड करतील म्हणून
अन मी ही हसलो उगाचच
डोळे बेंइमान होतील म्हणून...

कधीतरी अन कुठेतरी...
नजरा आपल्या  मिळाल्या...
हृदयातल्या सतारीच्या तारा
अगदी अलगद छेडून गेल्या...
तू म्हणालीस तेव्हा....
तू नाही जाणार ना मला सोडून
अन मी ही हसलो उगाचच
डोळे बेंइमान होतील म्हणून...

तू विचारायचीस जेवलास का?
न जेवताच पोट भरायचं...
तुझ्या वरचं प्रेम तेव्हा...
डोळे भरून वहायचं....
विचारायचीस तू गमतीने
काय करशील तू रे ?
जर तुला गेले मी सोडून..
अन मी ही हसायचो उगाचच
डोळे बेंइमान होतील म्हणून...

आज तुझी अनोळखी नजर
मला अस्वस्थ करते....
एक  अनामिक अदृश्य सूरी
काळीज कापून जाते...
पण एका सावध क्षणी मग
मीही बसतो सावरून.....
अन तुझी नजर टाळून
हसतो उगाचच.....
डोळे बेंइमान होतील म्हणून

© प्रशांत शेलटकर ©

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...