Ad

Monday, 17 November 2025

लेख -फुकटेपणाचा भस्मासूर

फुकटे पणाचा भस्मासूर....

सगळीच विचित्र सरमिसळ आहे.. जनतेचा दर्जा खाली गेलाय की नेत्यांचा दर्जा खाली गेलाय.. फुकट खायची वृत्ती ही मूलभूत आहे की तें एक नशा आहे.?. की फुकटे पणा एक उन्माद आहे?गरज असो वा नसो फुकट मिळतंय म्हणून तें ओरबाडून घ्यायच ही वृत्ती जात, पंथ, धर्म, गरीब, श्रीमंत, सो कॉल्ड प्रतिष्ठीत... अशा सर्वात आहे. इतिहास सांगतो दक्षिणेकडून ही प्रथा उत्तरेत आली.. सर्व नागरिक समान असताना यात लाडके दोडके करून मतपेट्या मजबूत करायचं काम सर्वच राजकीय पक्ष करतात..हे हत्यार वापरून जयललिता यांनी वर्षांनूवर्षे सत्ता उपभोगली.. तेच हत्यार वापरून बी जे पी सत्तेत आली आणि येत आहे.. याचा अर्थ इतर राजकीय पक्ष धुतल्या तांदळासारखे आहेत असे अजिबातच नाही.. राजकारण हे सत्तेसाठीच चालते हे कालातीत सत्य आहे आणि राहणार.. मुद्दा असा की नैतिकता फक्त बोलण्यात राहणार की व्यवहारात येणारं? नागरिकशास्त्र फक्त पुस्तकात राहणार की दैनंदिन जीवनात येणारं? की हे फुकटचे ओरबाडून खाणे हेच आपले आयुष्य होणार? सामान्य माणूस अर्थशास्त्र जाणायच्या भानगडीत  नाही.. मोह आणि लोभ कोणाला नसतो? पण त्याला आवर घालायचे काम कोण करणार?
    जनतेने, जनतेसाठी, जनतेचे चालवलेले सरकार हे वाचायला बरे वाटत असले तरी, जनतेला शहाणपण नसेल तर उपयोग काय? प्रवाशांचे ऐकून कॅप्टन बोट चालवायला लागला तर एक ना एक दिवस अराजकतेच्या खडकावर आदळून फुटणार हे नक्कीच..

    इस रात की सुबह नहीं...

    (टीप -हा लेख कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने अथवा विरोधी नसून जनतेत रुजत चाललेल्या स्वार्थी भावनेबद्दल आहे. किंबहुना एका पक्षाला नायक अथवा खलनायक करून फुकटेपणाच्या रोगाला सोल्युशन निघणार नाही. फुकट नको असे जनता कधी म्हणेल????कदाचित कधीच नाही.. ती देवावर आणि दैवावर सगळं लोटून देईल.. काळ नावाच्या महा ग्रंथाची पाने उलगडत राहतील...पुढे पडत राहतील)

-प्रशांत

Saturday, 8 November 2025

भय इथले

भय इथले....

तुझ्या भय कथांचेच 
भय मला वाटते आहे 
वाचुनच अंगावर  माझ्या
दाटून काटा येत आहे..

तें अतृप्त आत्मे 
रोज बसतात उशाशी 
चाळवून झोप माझी 
रडतात ओक्साबोक्षी 

त्या पडक्या हवेल्या
त्या कोरड्या विहिरी 
तें करकर दरवाजे 
देतात मेंदूत शिरशीरी 

भर मध्यरात्री कोणी 
का उगाच भयाण रडते 
ओसाड हवेलीत त्या 
कोणी का उगाच हसते 

घाबरवून लोकांना 
का उगाच असे लिहिती?
इथे एकांती वाचताना 
थरथर कापती मती

पुस्तकातली भय पात्रे
फिरतात भोवताली
बेफाम मुक्त सापळे
मागतात मलाच टाळी

फेकून पुस्तक तें करंटे
मीं चादर ओढून झोपतो
"थंडी लागते रे "म्हणोनी
एक सापळा कुशीत शिरतो

भय भीतीने  मग त्या 
बत्तीशी ही थरथरते
माझी की सापळ्याची?
तें मुळी न मजला स्मरते..

जळले मेले लेखक हे
कशास लिहिती भयकथा
की अतृप्त आत्मे यांच्या हस्ते
लिहितात त्यान्च्याच कथा?

मिटून मतकरी मीं
आता पुलं वाचतो आहे
भर मध्य रात्री मीं
खदाखदा हसतो आहे..

...  प्रशांत 😄

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...