सदाफुली...
का कोण जाणे मला सदाफुलीच विशेष कौतुक आहे. परिस्थिती कशीही असो पण सदैव हसत मुख असणाऱ्या माणसासारखी असते सदाफुली..गुलाबासारखे राजेपण ती कधीच मिरवत नाही..तिच्या वाट्याला चाफ्याची गूढता पण नाही आली कधी..बघा ना चाफ्यावर गाणी किती झाली..पारिजातकाला दैवी अधिष्ठान लाभले...मोगरा तर थेट ज्ञानेश्वरीत जाऊन बसला..मोगरा फुलल्याचे कौतुक करायचा मोह अगदी ज्ञानेश्वरांनाही झाला..गुलाब तर गालावर देखील फुलतात..आणि अबोल अबोली न बोलता स्वतःला गजऱ्यात माळून घेते..चाफ्याची सख्खी ,चुलत भावंडे म्हणजे सोनचाफा,कवठी चाफा ही देखील वेळोवेळी भाव खाऊन जातात....पण बिचारी आपली सदाफुली..ऊन असो वा पाऊस, कुठेही बांधाच्या कडेला फुलत रहाते... तीला कोणी कुंडीत लावत नाही की तीच कोणाला कौतूक नसत..एरवी फडया निवडुंगाची फुलं स्वतःला ब्रह्मकमळ समजून घेऊन मालकाकडून अर्ध्या रात्री पूजा करून घेतात..पण सदाफुलीला देवपूजेत स्थान नसतं... का तर ती म्हणे फुलातील वेश्या..काय एकेक समजुती असतात ना...वेश्या जशा कायम सजलेल्या असतात तशी सदाफुली म्हणे कायम फुललेली असते..मग तिला फुलांतील कान्होपात्रा का म्हणू नये??
परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल सदैव हसत राहणाऱ्या माणसाचे आपण किती तोंडभरून कौतुक करतो..मग एखादा शब्द ,एखादा गाणं व्हायला पाहिजे ना सदाफुलीसाठी..देवघरात नको पण एखादी कुंडी तरी असू देत ना तिच्यासाठी..बघा किती छान फुलेल ती...
-प्रशांत शशिकांत शेलटकर
03/09/2021
8600583846
No comments:
Post a Comment