Ad

Saturday, 19 January 2019

बर्फ आणि अग्नी

वयात आलेली आग एकदा
लाजत बर्फाला म्हणाली,
लग्न करशील का माझ्याशी
तुझ्यावरती प्रीती जडली..

जवानीच्या ज्वाळा माझ्या
किती अन कशा झाकू,
तुझ्यासाठी लावेन म्हणते
लाल ठिणग्यांच कुंकू...

बर्फ झाला तरी पुरुषच तो
तिला बघून पांघळला...
आगी साठी त्याचा देह
थोडा थोडा वितळला...

म्हणाला अशी दूर का
थंडी खूप लागते...
जवळ ये ना जराशी
आता का तू लाजते..

बर्फ़ाचे उबदार बोल ऐकून
अग्निराणी सुखावली..
मिठीत घेण्या बर्फाला
त्याच्याकडे  झेपावली..

तिच्या उबदार मिठींमध्ये
तो असा विरघळून गेला
त्याच्या थंड मिठीमध्ये
तिचा देह शांत झाला

जगावेगळी प्रेमकहाणी
एक क्षणात संपून गेली
वाफ त्यांच्या प्रेमाची,
हवेमध्ये विरून गेली...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...