मौन..
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे
जसा बोलतो मी स्वतः शी
तसा मी आतून उलगडत आहे
देत आहे जोवरी मी
तोवरी मी देव आहे..
कधी कणभर मागता
मी दानव ठरलो आहे
वागण्याचे तुझ्या कोडे
आता मज उलगडत आहे
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे
जे कधी ना प्राक्तनी
ते कधीच मिळणार नाही
कौतुकाने कधीच कोणी
मजवर भाळणार नाही
उजेडाचे पालिते विझवुनी
आता अंधार पांघरतो आहे
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे
हार फुलांचा नकोच होता
सोस मज पाकळीचाच होता
तुझ्यासाठीच एक दिवा
काळजात लावला होता
लावलेला तोच दिवा..
आता मीच मालवतो आहे
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे
प्रेम केले तुझ्यावर निरंतर
तरी तू ठेवलेस अंतर..
अंतरातले देखणे चित्र तुझे
आता पुसू पाहतो आहे
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे
बरा आज मी मौनात आहे
ना कुणाच्या मी मनात आहे
जसा बोलतो मी स्वतः शी
तसा मी आतून उलगडत आहे
-प्रशांत शशिकांत शेलटकर
रत्नागिरी 8600583846
No comments:
Post a Comment