Ad

Monday, 26 July 2021

व्हाट्सएप स्तोत्र

"व्हाट्सएप स्तोत्र"

प्रभाते समयी
आधी स्टेटस पहावे
त्या नंतर हळूच
गुडमॉर्निंग पोस्टावे

कराव्यात पोस्टी
इकडच्या तिकडे..
उपदेशाचे मग
व्हॅकसीन टोचावे..

बळे बळे हसून
सेल्फी काढावे
किती मी आनंदी
जगास दाखवावे

देवादिकांचे फोटो
सणासुदी पोस्टावे
किती मी भाविक
जगाला कळावे

कॉमेंटावे कोणाला
एक धोरण असावे
जिथे लाभ काही
त्याला नावाजावे

कोणी अलाणी फलाणी
तिला ऑसम म्हणावे
मित्रास परी सच्च्या
हळूच निगलक्टावे

समूहावर जन्मदिनाचे
जोशात भंडारे करावे
इतर वेळी "खोपच्यात"
गप्प लपुनी बसावे..

प्रसंगास इमोजी 
मदतीस घ्यावे
चेहरा मख्ख ठेवुनी
इमोजीस रडवावे

भले जळकूट आपण
आतल्या आत असावे
फुल्ल स्माईलिस त्या
त्वरेने सेंड करावे

असे खोटे आयुष्य
खोटेपणातच जावे
अन शेवटी शेवटी
एकटेच रडावे...

-प्रशांत शेलटकर
 8600583846
 27/07/2021

Saturday, 17 July 2021

लोक काय म्हणतील

लोक काय म्हणतील?


लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील
कधी नाव ठेवतील
कधी नाव काढतील
त्याना जे करायचं ना
तेच करतील
लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील

लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील
पुढ्यात नमस्कार करतील
मागून जोडे मारतील
जे करायचं ना त्यांना
नेमकं तेच करतील
लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील

लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील
लोक शुभेच्छा म्हणून
फक्त ईमोजी टाकतील
कधी कॅडबरी कधी गुलाब देतील
लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील

लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील
खोट खोट हसतील
खोटं खोटं रडतील
खऱ्या खोट्या भावना
इमोजीवर भागवतील
लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील

लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील
नको तिथे बोलतील
हवं तिथं मुके होतील
जसा माणूस भेटेल 
तशा तशा पुड्या बांधतील
लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील

लोक काय म्हणतील?
जे म्हणायचं ते म्हणतील
लोक असंही म्हणतील
लोक तसही म्हणतील
पाठ फिरवली लोकांकडे
तरच आपले दिवस जातील

-प्रशांत शेलटकर
 8600583846
 17/07/2021

Tuesday, 6 July 2021

क्लीक

पणती


दिवस जरी उदासवाणा
रात्र अशी ही सुरेख देखणी
विस्कटलेले आयुष्य कोणाचे
उगाच ना पाहते कोणी...

किती झाकावे स्वतःला
दिवसाची नजर वाकडी
अंग चोरून राहते उभी
जिंदगानी दीन बापुडी...

तरी चोरटे रंगेल कवडसे
हलकटच त्यांचे पक्के इरादे
उगाच करती काळोखाशी
उजेडाचे खोटेच वायदे...

फुंकर मारुनी उजेडाला
रात्र अशी कवेत  घेते..
काळोखाच्या वळकटीवर
जिंदगी अशी झोपून जाते

न दिसावे वार झेललेले
रात्र अशी घनघोर असावी
पण काळोखाच्या दारावरती
एक आशेची पणती असावी


-प्रशांत शेलटकर
 8600583846
 06/07/2021

पणती

पणती


दिवस जरी उदासवाणा
रात्र अशी ही सुरेख देखणी
विस्कटलेले आयुष्य कोणाचे
उगाच ना पाहते कोणी...

किती झाकावे स्वतःला
दिवसाची नजर वाकडी
अंग चोरून राहते उभी
जिंदगानी दीन बापुडी...

तरी चोरटे रंगेल कवडसे
हलकटच त्यांचे पक्के इरादे
उगाच करती काळोखाशी
उजेडाचे खोटेच वायदे...

फुंकर मारुनी उजेडाला
रात्र अशी कवेत  घेते..
काळोखाच्या वळकटीवर
जिंदगी अशी झोपून जाते

न दिसावे वार झेललेले
रात्र अशी घनघोर असावी
पण काळोखाच्या दारावरती
एक आशेची पणती असावी


-प्रशांत शेलटकर
 8600583846
 06/07/2021

Tuesday, 29 June 2021

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?भाग-3

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

भाग-3

माणूस हा विश्वापासून वेगळा आहे? की तो विश्वाचाच भाग आहे? तो विश्वाचाचा भाग असेल तर तो विश्वाचेच आकलन कसे करू शकतो? स्वतःचे डोळे स्वतःलाच कसे पहातील?
   हे विश्वनिर्माण झाले त्यातून माणूस निर्माण झाला. बरं झाला तो झाला त्या प्रक्रियेत त्याचा मेंदू इतका विकसित झाला की की तो आपल्याच निर्माण प्रक्रियेचे आकलन करू लागला, का आणि कसे हे प्रश्न विचारू लागला? मुळात ही प्रेरणा आली कुठून?
    आणि हाच प्रश्न बिगबँग ला विचारू शकतो की, बाबा तू झालास म्हणून हे विश्व निर्माण झाले कबूल पण तू झालासच का?  आणि कशासाठी? तुला कोणीतरी जाणून घ्यावे म्हणून तू अब्जावधी वर्षांनी माणूस जन्माला घातला का? 
      हे प्रश्न जसे विज्ञानाला पडले तसे अध्यात्मालाही पडले, द्वैत विचारते,कोsहम ..मी कोण आहे? अद्वैत उत्तर देते सोs हम
"तो मीच आहे" किंवा तो तूच आहेस? देह म्हणजे एक आकार आहे तो टेम्पररी आहे.पण त्यात जे चेतन आहे ते वैश्विक चेतनेशी जोडले गेले आहे. त्या वैश्विक चेतनेला स्वतःलाच स्वतः जाणून घेण्याची इच्छा झाली म्हणून तिने देह निर्माण केले का? फारच गुंतागुंतीचा प्रश्न.. स्वतःच स्वतःकडे पहायच कारण स्वतःलाच स्वतःला जाणून घेण्याची प्रेरणा स्वतःच निर्माण होते. फार तर स्वयंप्रेरणा म्हणूया पण यात "स्वयं" कोण? माणूस की माणसाचा मेंदू? की  देहात असलेले चेतन?? डोक्यात एकदम केमिकल लोचा होतो..
      बरं हे प्रश्न फक्त अध्यात्मालाच पडतात का? विज्ञानाचा प्रवास पण असाच इंटरेस्टिंग आहे. विज्ञानाच्या प्रथम टप्प्यात अस मान्य होत की सर्व जडच (मॅटर) आहे, पण नंतर लक्षात आलं की सगळंच काही जड नाही ,त्यात चेतन (एनर्जी) पण आहे. पुढच्या टप्प्यावर लक्षात आलं की सर्वच विश्व कण आणि लहरींनी बनले आहे. पार्टीकल अँड वेव्हज थियरी..अगदी जो जड ( मॅटर) समजला गेलेला दगड ही कणांनी बनलेला आहे..जसे सूक्ष्मात जाऊ तसे लक्षांत येत की दगडाच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन गतिमान असतो.
     अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही अस समजलं तर कधी कधी वाटत की विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आकलनाचे निकष आणि मार्ग वेगळे आहेत इतकच.

     बरं त्यातही एक गंमत आहे,विश्वाचे आकलन फक्त माणूसच करू शकतो? प्राणी करत नसतील? त्यांच्या पद्धती वेगळ्या असू शकतील. बर विश्वाच्या महाप्रचंड विस्तारात आपण एकटेच असू? आपल्या एलियन बंधूचे वेगळे विज्ञान आणि अध्यात्म असू शकते. जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज माणूस नावाच्या प्राण्याला असते, पृथ्वी शिवाय अन्य ग्रहावर ऑक्सिजन नाही म्हणून तिथे जीवसृष्टी नाही अस आपण ठामपणे म्हणू शकत नाही.मिथेन वर जगणारी प्राणिसृष्टी असू शकते ना भाऊ...?
     
भाग-3

प्रशांत शेलटकर
8600583846
30/06/2021

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?भाग-2

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

भाग-2

डोक्यातला प्रगत मेंदू आणि हाताचा अंगठा यामुळे गुहेतील माणूस कच्च्या घरात आला,शिकार सोडून शेती करायला लागला, व्यापार करू लागला , शहर निर्माण झाली, टोळ्यांचे "समाज" झाले. निसर्गाला देव मानता मानता त्याची प्रतीके बनली, प्रतिकांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली, श्रेष्ठत्व ,कनिष्ठत्व निर्माण झाले, देव बाजूला झाले, प्रेषित निर्माण झाले, प्रत्येक प्रेषितांचे वेगळे तत्वज्ञान झाले. त्यांचे अनुयायी निर्माण झाले.त्यांच्यात संघर्ष झाले, रक्तपात झाले,
    मानवी इतिहासाला वेगळी वेगळी वळणे लागत गेली. धर्म आणि विज्ञान यात संघर्ष निर्माण झाले. विज्ञान आपल्या पद्धतीने विश्वाच्या रचनेकडे पाहायला लागले, धर्म आपल्या पद्धतीने विश्वाचे कोडे सोडवायला लागले. 
      जे दिसते, भासते,जे विज्ञानाच्या निकषावर टिकते तेच सत्य असे विज्ञान म्हणते.
      तू विश्वास ठेव म्हणजे तुला सत्याचे ज्ञान होईल असे अध्यात्म म्हणते.
      आजूबाजूचे जग हे सत्य आहे असे विज्ञान म्हणते. तर जग ही माया आहे असे अध्यात्म म्हणते.
    वैज्ञानिक निकषावर अध्यात्म टिकत नाही.पण वैज्ञानिक निकष ही काला प्रमाणे बदलत जातात.त्यामुळे विज्ञान आज जे निष्कर्ष काढेल ते अजून काही वर्षानंतर चुकिचे तरी ठरतात किंवा त्यात बदल होतो.आणि विज्ञान ते नम्रपणे मान्य करते.
     एकूणच हे सगळं मान्य केलं तरी आऊट ऑफ बॉक्स विचार केला तर काही वेगळेच प्रश्न निर्माण होतात.
     आपण सगळे मानव आहोत. आपल्या विकसनशील मेंदूच्या आकलनां नुसार ,शारीरिक आणि मानसिक मर्यादा आणि बलस्थानानुसार  जगाकडे पाहत असतो. एका माणसाला जे दिसेल तेच शंभर माणसांना,तेच हजार माणसांना,तेच लाखो कोट्यावधी माणसांना दिसत म्हणून ते सत्य आहे असे म्हणतो. जर एका माणसाने आंब्याचे झाड पाहिले तर हजार, शंभर, लाखो माणसाना पण तेच आंब्याचे झाड दिसेल.कारण सगळ्यांकडे "माणसाचा" मेंदू आहे. म्हणून सर्व माणसांसाठी तेच सत्य आहे. पण समजा अगदी रात्रीचा मिट्ट काळोख आहे.डोळ्यात बोट घातले तरी दिसत नाही.त्यावेळी कुठल्याच माणसाला ते दिसणार नाही.कारण अंधारात पहायची मानवी मेंदूची क्षमताच नाही. पण वटवाघूळ किंवा मांजराला ते दिसूं शकते. कारण अंधारात पाहण्याची विशेष क्षमता त्यांच्याकडे असते
     जे दिसते ते सत्य आहे असे मेंदूचे आकलन सांगते.वास्तवात ते वेगळे असू शकते तसेच जे दिसत नाही ते मानवी मेंदूला आकलन झालेले नसते पण ते वास्तवात तिथे असण्याची शक्यता असू शकते.
     एकूणच मानवी बुद्धी जेवढ आकलन करेल तेव्हढंच सत्य असते असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ते मानवी आकलनाच्या मर्यादेत राहून केलेले विधान असते.
     विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत माणूस निर्माण झाला आणि त्यानेच विश्वनिर्मितीची प्रक्रिया शोधून काढली किती विलक्षण आहे हे!

भाग-2

प्रशांत शेलटकर
8600583846
29/06/2021

Monday, 28 June 2021

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

हे विश्व निर्माण होण्याचे कारण म्हणजे बिगबँग हे आज पर्यंत सर्वात मान्य असलेले कारण.. बिगबँग झाला आणि विश्व निर्माण झाले अस सांगितलं जातं पण तो का झाला? हे अजून कळलं नाही..भविष्यात कदाचित कळेलही..एका तासाच्या (की मिनिटाच्या?) परिमाणात विश्वनिर्मितीचा इतिहास सांगितला जातो.पण त्यातही चार सेकंदापर्यंत जाता येते..पण पाहिले चार सेकंद काय झाले हे सांगता येत नाही.. काळाच्या पुढे अजून एखादी मिती  भविष्यात सिद्ध झाली तर कदाचित बिगबँग पासून पहिल्या चार सेकंदात काय घडले ते विज्ञान शोधून काढेल कदाचित...
      पण आपण एकवेळ गृहीत धरू की बिगबँग मुळे विश्व निर्माण झालं. तरी त्या क्षणापासून ते आजच्या क्षणापर्यंतचा प्रवास अनेक गूढ प्रश्न निर्माण करतो. अर्थात मला तस वाटतं. मी कोणतंही स्टेटमेंट अगदी फर्म करीत नाहीये..लहान मुलाच्या औत्सुक्याने मला ते प्रश्न पडले आहेत..
     बिगबँग झाला. त्यातून अनंत सूर्य निर्माण झाले,त्याच्या अनंत सूर्यमाला निर्माण झाल्या..आपलीही त्यातून निर्माण झाली. आपल्या सूर्याचे ग्रह एकमेकांशी टक्कर न घेता  सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरू लागले. त्यातील काही स्वतःचे उपग्रह स्वतःभोवती फिरवत राहिले. गुरुत्वाकर्षण नावाची अचाट शक्तीने या ग्रह उपग्रहांच्या कक्षा अशा काही ठरवून दिल्यात की ते आपली मर्यादा इंचभरही सोडत नाहीत.
हे एक गूढ....
      सूर्यापासून विशिष्ट अंतरावर एक ग्रह फिरत रहावा. आणि त्या विशिष्ट अंतरामुळेच त्याच्यावर जीवसृष्टी निर्माण व्हावी 
हे आणखी एक गूढ...
     आपली पृथ्वी सूर्यापासून विशिष्ट अंतरावर परिभ्रमण करत  स्वतःभोवती फिरत राहिली..फिरता फिरता थंड झाली..बरं फिरताना ती परफेक्ट गोल फिरत नाही ती उत्तर-दक्षिण थोडी कलली...तिचा आस थोडा कलला म्हणून पृथ्वीवर ऋतुचक्र निर्माण झाले, उन्हाळा आणि हिवाळा यामुळे पृथ्वीचे वातावरण "बॅलन्स" झाले ..पावसाळा हे उन्हाळ्याचे "बायप्रॉडक्ट" आहे.
 ऋतुचक निर्माण झाले म्हणून जीव निर्माण होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले हे पण एक गूढच...
     पहिला जीव निर्माण झाला,वनस्पती निर्माण झाल्या, पाण्यातील काही जीव पाण्यातच राहिले,त्यातले काही जमिनीवर आले, त्यातले काही जमिनीवर राहिले आणि काही आकाशात उडू लागले. 
      मूळ जीवामध्ये कदाचित टिकून राहण्याच्या प्रेरणेने जनुकीय बदल होत गेले, त्यामुळे काही जीव जमिनीवर राहू लागले त्याना जमिनिवर चालण्यासाठी पाय फुटले, असंख्य पायांच्या गोमी पासून चार पायांच्या वाघ,सिंह,वानर या सारख्या प्राण्यांपर्यंत असंख्य प्राणी निर्माण झाले. त्यातल्या काही प्राण्यांना जमिनीवर असुरक्षित वाटायला लागले,त्यांना पंख फुटले ते आकाशात उडायला लागले.त्याना पक्षी म्हणून ओळखल जाऊ लागलं.पुढे आदिमानव निर्माण झाला. पुढच्या दोन पायांचे रूपांतर हातात झाले..असे म्हणतात की माणसाच्या हाताच्या पंजात अंगठयाचे जे वेगळे स्थान आहे त्यामुळे माणसाने पुढची प्रगती फार झपाटयाने केली.माणसाचा अंगठा इतर प्राण्यांच्या तुलनेत गोल फिरू शकतो त्यामुळे कोणत्याही वस्तूवरची पकड अधिक मजबूत झाली.मला तर अस वाटत की या अंगठयाने माणसाला प्रचंड आत्मविश्वास दिला. स्वतःचे संरक्षण आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी तो अंगठयांच्या अद्वितीय स्थानामुळे तो करू शकला.

भाग -1

-प्रशांत शेलटकर
8600583846
 29/06/2021

मग मोराने काय करावे?मग मोराचे काय करावे?

मग मोराने काय करावे? मग मोराचे काय करावे? मोर नाचतोय.. प्रेक्षकपण आहेत.. काही समोर..काही मागे.. पण समोरचे मागे आणि मागचे समोर कधीच येत नाहीत...