आई..
अंधारात मिट्ट घनघोर
ही रात्र झोपलेली
"दिवस" गेले दिवसाचे
हे कळून चुकलेली
तम गहिऱ्या गाली
ती खुदकन हसते
जणू बाळ दिवसाचे
पोटात लाथ मारते
दूर कुठे कुक्कुटरव
येइ जसा कानी
आली समीप प्रसववेळा
ती सुखावे मनोमनी
किंचित जाग येउनी
झाडे मग किलबिलती
लुकलूक चांदण्या नभीच्या
मग खेळ आवरता घेती
सुमंगल सुवेळी सुमुहूर्ती
दिनमणी जन्मास येई
रक्तवर्णी बाळास पाहुनी
क्लांत निशा हरखुनी जाई
बाळ जन्मता आईचे
वेगळे आयुष्य कुठे?
जन्मताच रविराज तो
उरते निशेचे अस्तित्व कुठे?
-प्रशांत शेलटकर
8600583846