Ad

Thursday, 19 July 2018

तो तूच आहेस

रात्र नक्की संपेल...
आणि सूर्य नक्कीच उगवेल..
नव्हे, त्याला उगवावच लागेल
आणि तो उगवला की
आभाळभर पसरलेल्या...
या हलकट विवस्त्र चांदण्या ...
लपवतील आपले देह...
एखाद्या चुकार ढगाआड....
आणि विरून जातील या,
अथांग..अनंत अवकाशात...

सूर्य नक्कीच उगवेल...
आणि तो उगवला की ..
तो लंपट चंद्रही तोंड लपवून
जाईल क्षितीजाच्या पल्याड...
अनैतिकतेचा शेवट असाच असतो, करुण आणि एकाकी

सूर्य नक्कीच उगवेल...
आणि तो उगवला की ..
विरून जातील सावल्यांचे
भयानक सांगाडे, आणि
समजेल जगाला,...
ती झाडेच होती अन त्या टेकड्या...

सूर्य नक्कीच उगवेल...
आणि तो उगवला की ..
विरून जाईल काळोख
मनातला अन देहातला..
उजळून जाईल मनाचा गाभारा
अन एक उजळलेला क्षण देईल एक आश्वासन...
तो तूच आहेस
तो तूच आहेस
तो तूच आहेस....
तत्वमसी... तत्वमसी... तत्वमसी..
-प्रशांत शेलटकर
860048346

No comments:

Post a Comment

जातिकडून जातिकडे

जातिकडून जातिकडे .... जाती असण्यातच काहींचा "मेंदू निर्वाह" असल्याने जाती जात नाहीत. भूतकाळाच्या ठसठसत्या जखमा तशाच उघड्या ठेवणे ह...