Ad

Tuesday 26 November 2019

कसं सांगू तुला..

कस सांगू तुला...


कस सांगू तुला....
तू कोण आहेस माझ्यासाठी...
पुनवेचा चांद आहेस तू...
चांदण्याची रात आहेस तू...
रातराणीचा गंध आहेस तू...
चंदनाचा स्पर्श आहेस तू....
कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...

कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...
मस्त श्रावणसरी आहेस तू
चिंब आषाढ धारा तू...
कधी उबदार झुळूक तू..
कधी झिम्माड वारा तू...
कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...

कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...
तू सौदामिनी..
तू चैत्रयामिनी..
तू मेघमल्हार..
तू गोड गंधार...
कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...

कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...
बकुळीचा गंध तू...
मत्त्त हिरवा चाफा तू...
तळहातावर चितारलेला
मेहंदीचा मस्त मदनरंग तू
कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी..


कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी
मनातला मस्त मोर आहेस तू..
मनातला भाव विभोर आहेस तू
मनात जपलेलं पिंपळपान तू
अवचित सुटलेल भान तू...
कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...

कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...
तू देवघरातली समई .
तू मंदिरातली पणती ..
तू दारापुढची तुळस...
तू मंदिराचा कळस...
तू मत्त्त चाफा ..तू धुंद मोगरा...
तू सुगंधी सुगंधी श्वास गहिरा..
कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...

कस सांगू तुला...
तू कोण आहेस माझ्यासाठी...
माझ्या अस्तित्वाचा…..
गूढ अर्थ आहेस तू....

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Friday 15 November 2019

राजकारणाचा कुटणा

बस झाला  मित्रा आता
राजकारणाचा कुटाणा...
उगाच कोणाच्या नावे
का करावा ठणाणा...

कसल्या निष्ठा अन
कसली तत्वे....
फसवी वचने अन
फसवे दावे..
झुंजतात कार्यकर्ते
नेते टाकती दाणा...
बस झाला आता मित्रा,
राजकारणाचा कुटाणा...

कसला भगवा अन
कसला निळा..
बंडोबांच्या कपाळावर
आमदारकीचा टिळा..
पैशाचा धूर अन
डीजे चा दणाणा
बस झाला आता मित्रा
राजकारणाचा कुटाणा...

पंत गेले अन
राव चढले...
तुला कसले
सुतक आले..
कशासाठी आणि कुणासाठी
झालास रे दिवाणा
बस झाला आता मित्रा
राजकारणाचा कुटाणा...

बस झाला  मित्रा आता
राजकारणाचा कुटाणा...
उगाच कोणाच्या नावे
का करावा ठणाणा...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Friday 8 November 2019

नकोस करू प्रेम माझ्यावर...

नकोस करू प्रेम माझ्यावर
पण माझं तुझ्यावर  आहे ना...
तुझ्याही मनात आत कुठेतरी
थोडा मी खास आहेच ना...

शब्दांत व्यक्त नकोच करू ..
मौनातच  प्रेम बोलते ना
नजर बोलते किती तुझी
अग, तुला तरी कळते ना....

नकाराचा निर्धार तुझा
व्यर्थ किती तुझ्या वल्गना
पण एकांतात माझ्यासाठी
डोळे तुझे  भरतात ना....

भरलेले डोळे मग,
तू अलगद पुसतेस ना
मग एकटीच खुळ्यागत
गालात हलके हसतेस ना

तू ही करावे प्रेम मजवर
हट्ट माझा मुळीच ना...
असे जपावे अलगद तुला
की मलाही ते कळावेच ना

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Tuesday 5 November 2019

मृत्यू

मृत्यू


हिशेब सगळे चोख झाले
संचित आता काही नुरले
तोडुनी सारी दैहिक बंधने
आत्म्याने मग प्रस्थान केले

देहाला या फारच जपले
तन हे खूपच सजले धजले
पण येता तो  क्षण निर्वाण
देहाचेच किती ओझे झाले

क्षणभरच होतील ओले डोळे
क्षणभरच सारे मायेचे उमाळे
विरून जातील क्षणात एका
आप्तजनांचे शोकसोहळे...

संचिताचेच मग ओझे झाले
केविलवाणेच जगणे झाले
क्षण साधुनी मग मुक्तीचा
आत्म्याने मग प्रस्थान केले...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 गोळप ,रत्नागिरी

8600583846

Monday 4 November 2019

अध्यात्म

अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की ती फार थोड्या जणांना कळते..बाकीचे ती कळल्या सारखी दाखवतात..मुळात अध्यात्म ही बोलण्याची गोष्ट नाही ती अनुभवण्याची गोष्ट आहे..ती एक आयुष्यभर चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. नामस्मरण करणे, पोथ्या वाचणे, प्रवचनाला जाणे,ध्यान करणे ही सर्व साधनं आहेत मुक्कामाला पोहोचण्याची,  हे सर्व करताना वृत्तीत फरक पडत जातो. मी अशा काही व्यक्ती पाहिल्यात की त्यांच्या सानिध्यात खूप समाधान वाटत. काही व्यक्ती अशा असतात की त्या यातले काहीही करत नाहीत पण खूप समाधानी आयुष्य जगतात.त्या ही अध्यात्मिक व्यक्तीच असतात. 
     काही व्यक्तींना आपण एवढं वाचन करतो , नामस्मरण करतो, तीर्थयात्रा करतो,देवाची साग्रसंगीत पूजा करतो याचाच अहंकार असतो.मग अशा व्यक्ती चेहरा लांबुळका करून इतरांना अध्यात्म सांगत असतात. पण त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात असमाधान, चिडचिड , भरलेली असते.
     लोक माऊली माऊली करतील किंवा ग्यानबा तुकाराम करतील पण ज्ञानेश्वर, तुकारामांनी व्यक्तिगत आयुष्यात काय भोगलय हे पहाणार नाहीत. साधी बस स्टॉपला थांबली नाही तरी आमचा तडफडाट होतो..अध्यात्मिक शांती ही फार लांबची गोष्ट राहिली..
     नम्रपणे आपल्या आयुष्याला समजून घेऊन ,त्याला जस आहे तस स्वीकारलं तर बाकी काही वेगळं करायची गरज नसते...मला वाटतं हेच अध्यात्म

-प्रशांत शेलटकर

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...