Ad

Monday 28 December 2020

फसलेले शब्द....

फसलेले शब्द....

अतिमेकअप केलेली स्त्री जशी हास्यास्पद ठरते तसेच अनाठायी विशेषणे लावलेले शब्द हास्यास्पद ठरतात..
     श्रद्धांजली ही श्रध्दांजलीच असते त्यामागे विनम्र का जोडले जाते हे आजवर कळले नाही.उद्धट,उर्मट श्रद्धांजली असते का?☺️. काहीवेळा 'आमची अमुक तमुक यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे म्हटले जाते..आता श्रद्धांजली मध्ये भावच नसेल तर  ती श्रद्धांजली कसली?
    शुभेच्छांबद्दलही तसंच म्हणता येईल..शुभेच्छा हा देण्याचा विषय नाही..व्यक्त करण्याचा विषय आहे..माझ्या मनातली शुभ इच्छा मी देणार कशी ? व्यक्तच करणार ना....😊
     काही जण गुडनाईट नंतर टेक केअर म्हणतात... आता रात्री कसली केअर घ्यायची...झोपला की झोपला...आणि केअर घेत बसलं तर झोप कशी घेणार...कृतिशून्य अवस्थेत काळजी कसली घ्यायची...? कदाचित झोपेपर्यंत "कृतिशील" राहणाऱ्या लोकांसाठी हे टेककेअर असू शकेल😄
    "वाढदिवसाच्या" शुभेच्छा  हा एक आणखी गमतीदार शब्द... माणूस प्रत्येक क्षण,प्रत्येक दिवस वाढतच असतो..मग "वाढ"दिवसाच्या अशा स्पेशल शुभेच्छा कशाला?जन्मदिवसाच्या शुभेच्छा ठीक आहेत कारण जन्मदिवस वर्षातून एकदाच येतो.वाढीचा असा दिवस नसतोच वाढ ही निरंतर होतच असते..
      एका मराठी शब्दाला त्याच अर्थाचे इंग्लिश शब्दाचे कलम केलेले शब्दही खूप विनोद निर्माण करतात जसे..मी "रिटर्नपरत"आलो, तू मला "रिटनमध्ये लिहून" दे, हाऊस फुल्ल गर्दी, आमचे येथे "थंडगार कोल्डड्रिंक" मिळेल....

आहे ना गंमत...तुम्ही पण असे शब्द शोधा आणि हसून घ्या..हास्य अद्यापही विनामूल्य आहे...

☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Sunday 27 December 2020

फुलांच्या राज्यातला ऋषी...

फुलांच्या राज्यातला ऋषी...

मला पारिजात आवडतो...
तो साधा असतो...गुलाबाच्या काट्यांची मिजास तो करत नाही...असेल गुलाब फुलांचा राजा ...पण पारिजात हा फुलांच्या राज्यातला ऋषि आहे...तो फक्त देतो...घेत काहीच नाही...त्याच्यापाशी भुंग्याची फौज नसते...तो एकटाच असतो...आत्ममग्न तपस्वीच जणू...गुलाब म्हणजे मोह,माया..तिथे काट्याचा दंश ठरलेलाच..पारिजात म्हणजे समर्पण...गुलाब झाडावरच सुकून जाईल पण अहंकार सोडणार नाही..पण पारिजात तसा नसतो..त्याची वेळ आली की तो झाडाचा मोह सोडतो...झाडापासून तुटताना त्याच्या मनात फक्त समर्पण असत...खालची जमीन कसली आहे?फरशी आहे की शेणाने सारवलेली आहे, नुसतीच माती आहे  की कुणाची ओंजळ??...त्याला त्याची फिकीर नसते...त्याला फक्त त्याच्या सुगंधाची पेरणी करायची असते...
      गुलाब देखणा असला तरी त्याच्यासमोर अदबीने पेश व्हावं लागतं...कारण मनात काट्यांच भय असत...पारिजातकाच् तस नसतं.. त्याच्या एका फांदीला जरी स्पर्श केला तरी असंख्य पारिजात तुमच्याकडे झेपावतात...एखादं लहान मूल आईकडे झेपाव ना तस... पारिजातकात ही निरागसता जन्मजात असतेच...म्हणूनच की काय सुकून गेला तरी तो ओंजळ सुगंधीत करून जातो...
म्हणूनच
.
.
मला पारिजात खरच आवडतो
☺️☺️☺️☺️☺️😃

🌿☘️🌿☘️🌿☘️🌿☘️

--प्रशांत शेलटकर
  8600583846

Saturday 26 December 2020

राजकारण आणि पोस्ट

आता सगळी आबादीआबाद होणार किंवा आता सगळंच बरबाद होणार अशा दोन टोकाच्या राजकीय पोस्ट मनोरंजन करतात.सरकार कोणाचेही असुदे.त्यांनी अंमलात आणलेली धोरणे 100 टक्के निर्दोष असत नाहीत. त्यात काहींना काही दोष राहून जातात,आणि ते प्रत्यक्ष अंमल बजावणी करताना जाणवत जातात.त्यात वेळोवेळी सुधारणा करीत जाणे आवश्यक असते.अशावेळी एखादा कायदा मंजूर झाला की आता कसे सगळे छान होणार असे वाटून घेणे जसे चूक आहे तसेच आता सगळेच बरबाद होणार असे समजणेही चूकच आहे.
       राजकारण म्हणजे चित्रपट नव्हे.जिथे कोणीतरी नायक असतो कुणीतरी खलनायक असतो.तिथे मेंदू बाजूला ठेऊन आपण सगळं एन्जॉय करतो.कारण नायक आणि खलनायक स्पष्टपणे दिसत असतात.राजकारणात तस नसतं. तिथे नायकात खलनायकाच्या छटा असू शकतात.खलनायकात किंचित नायक असू शकतो.तिथे आजचे खलनायक उद्याचे नायक असू शकतात.आजचे नायक उद्याचे खलनायक असू शकतात.
       गंमत म्हणजे हे नायक आणि खलनायक ठरवणारे राजकीय जीन्स प्रत्येकात वेगळे असू शकतात.जर मला एखाद्या राजकीयपक्षा बद्दल सहानुभूती असेल तर मला त्या राजकीय पक्षाच्या प्रत्येक धोरणात सकारात्मकता दिसेल. जर एखादा राजकीय पक्ष आवडत नसेल तर मी फक्त नकारत्मक बाजू पाहीन
     व्यक्तिशः मी दोन्ही बाजूच्या पोस्ट वाचतो.त्यामुळे दोन्ही बाजूंचा लसावी काढता येतो. बरयाच पोस्ट या फॉरवर्डेड असतात.हल्ली एक बरं आहे.आपल्याला हवी ती पोस्ट उचलता येते आणि फॉरवर्ड करता येते☺️
    पण या सर्व उपदव्यापात आपण सत्याच्या जवळपास तरी जातो का? वर्तमानाच्या अभ्यास करून भविष्याचा वेध घेण इतकं सोपं आहे?? भविष्यकाल नेहमीच unpredictable राहिला आहे. 
    शासनाचे मूळ धोरण, त्या अनुषंगाने येणारे किंवा आलेले कायदे,आपले संविधान, कृषी,उद्योग,कामगार,पर्यावरण, न्यायव्यवस्था या सर्व एकमेकात गुंतलेल्या गोष्टी असतात. एखादा कायदा येतो तेव्हा त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात होतो. मग हे सगळे तानेबाने सोडवण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ असतो का?नसेल तर आपण आपले मत (बरयाच वेळी आपले मत म्हणजे फॉरवरडेड पोस्ट असते) ठामपणे मांडू शकतो का? बरं व्यक्त होण्याचा अधिकार सर्वाना असला तरी आपण नम्रपणे ,अभ्यासपूर्ण व्यक्त होतो का? आपलं चुकलं तर आपले मत मागे घेण्याच स्पोर्टिंग स्पिरिट दाखवतो काय?
 
राजकीय आखाड्यात आपला मेंदू शाबीत राहूदे
       बस्स इतकंच

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Sunday 20 December 2020

बस्स झाले आता

जे हवेच होते
ते आयुष्याने नाकारले
जे नकोच होते
ते भरभरून मिळाले

वाट पाहता सुखाची
आयुष्य सरून गेले
स्वप्नांतच एक स्वप्न
असे कधीच विरून गेले

खेळ असा जीवघेणा
कुणी कधी खेळू नये
अन सुखाचे फक्त कवडसे
कधी कोणा मिळू नये

जे हक्काचे 
ते कधी मिळालेच नाही
हक्काची पूर्ण भाकरी
चतकोरही मिळाली नाही

जळो ते सुखही आता
नको ते हात पसरणे
नकोच ते केविलवाणे
जंतूसम जगणे

कुणाला काय त्याचे
कसले देणे घेणे नाही
सुखाचे सोबती सारे
दुःखाला बाप नाही

सुधार आता गड्या
थांबव तुझे रडगाणे
थांबव आता गड्या
दारी कुणाच्या रेंगाळणे

उपहास अपमान
आता पुरे झाला
जे न मिळणार कधी
ध्यास आता पुरे झाला

क्षणभर उपहास आता
सहन तू करू नको
पेटते रक्त तुझे
पाणी त्या समजू नको

बस झाले सांभाळणे
आता कुणाच्या मनाला
उडत गेली दुनिया
आता पर्वा कुणाला

-प्रशांत









Monday 7 December 2020

जगून घे

जगून घे...

संपले किती उरले किती
हिशेब आता सोडून दे
आला क्षण गेला क्षण
 क्षण प्रत्येक जगुन घे...

धडधडते काळीज जोवरी
काळजात कुणी ठेऊन घे
पंखात आहे बळ जोवरी
तोवरी  उंच उडून घे...
 
दर्द दिल मे जोवरी 
गझल तोवरी गाऊन घे
लागतो सूर जोवरी
मस्तपैकी गाऊन घे

चालतात पाय जोवरी
तोवरी असा भटकून घे
कधी वेड्यागत उलटा फांदीला 
मस्तपैकी लटकून घे

नजरेत इष्क जोवरी
तोवरी नजरबंदी करून घे
जोडी आहे जोवरी
तोवरी जुगलबंदी करून घे

प्यास ओठी जोवरी
ओठ कुणाचे पिऊन घे
ओढ आहे जोवरी तिची
मिठीत तिला ओढून घे

दस्तक न जोवरी मृत्यूची
मेलो नाही हे समजून घे...
मस्तक जोवरी धडावरी
मान उंचावून जगून  घे..

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583848

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...