जातिकडून जातिकडे ....
जाती असण्यातच काहींचा "मेंदू निर्वाह" असल्याने जाती जात नाहीत. भूतकाळाच्या ठसठसत्या जखमा तशाच उघड्या ठेवणे ही काहींच्या मेंदूची खाज असल्याने आणि मुळातच काहींचा उदरनिर्वाहच त्यावर अवलंबून असल्याने जाती-पातीची दुकाने उघडून बसणे त्यांची मूलभूत गरज आहे.कोणत्यातरी एका जातीला नायक किंवा खलनायक करून लोकांचे अहंगंड आणि न्यूनगंड प्रज्वलित ठेवणे हा कोणाच्या तरी अस्तित्वाचाच भाग झालाय..
माणसातले पशुत्व आदिम काळा पासून अनंत काळा पर्यन्त कुठे ना कुठे डोके काढतच असणार आहे.पण फक्त तेव्हढेच हायलाईट करून त्याला जातीयतेचा रंग फासून कुठल्यातरी एका जातीला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत रहाणे हेच पुरोगामीत्वाचे लक्षण मानले जात आहे.
पुढे जाणे,पुढचे पहाणे म्हणजे पुरोगामी असणे. पण प्रत्यक्षात आपण शेकडो -हजारो वर्षापूर्वी घडलेल्या घटनात रमणार की पुढच्या शंभर वर्षाचा विचार करणार? जातीअंत होणार आहे की नव्या काळाला अनुरूप नव्या जाती निर्माण होणार? जातींना विरोध करताना प्रत्येक अनुचित घटनांमध्ये जात शोधून संबंधित जात समूहालाच खलनायक ठरवणार? की तिथेही त्या त्या समाजाचे उपद्रव मूल्य पाहून आपल्या विरोधाची तीव्रता कमी जास्त करणार? हे प्रश्न महत्वाचे आहेत.
शेकडो वर्षांपूर्वी तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहून जी ग्रंथनिर्मिती झाली ती वादातीत रित्या नक्कीच सत्य होती. पण शेकडो वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती आज जशीच्या तशी आहे का? ते संदर्भ आज आहेत का? जे असतील ते ग्राह्य धरून आणि जे नसतील ते वगळून नव्याने विचार करायची दृष्टी आज आहे का?
तंत्रसत्ता आणि धनसत्ता यामुळे नव्याने निर्माण होऊ घातलेल्या आणि झालेल्या "जातीं" कोणा बुद्धीजीवी सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष आहे का? ए आय मुळे निर्माण होणारी नवी व्यवस्था जुन्या व्यवस्थेला आव्हान देत असताना त्यातून होणारी विषमता धर्म आणि जातींच्या पलीकडे असेल.
तेव्हा जुन्या त्याच त्याच पठडीतल्या विचारवंतांना सन्मानाने मनातून उतरवून भविष्यातल्या नव्या जातीव्यवस्थेकडे गंभीर पणे विचार करणारा पुरोगामी मनात सन्मानाने बसवला पाहिजे.
-प्रशांत शेलटकर
टीप- वरचा लेख हा माझ्या सामाजिक आकलनाच्या मर्यादेच्या अधीन आहे.याचा प्रतिवाद होऊ शकतो.तो झाला तर मला आनंदच आहे , त्यातून मला नवीन काही शिकता येईल. फक्त प्रतिवाद विधायक असावा)
No comments:
Post a Comment