Ad

Sunday 29 January 2023

अन काळजात दिवे लागले

अन काळजात दिवे लागले

काय झाले आज सखी मला
मजला मुळीच कळले नाही
रुतले किती काळजात काटे
हे तुजला मुळी कळले नाही

थबकलो मी जिथल्या तिथे
तू दिसली सूर्यास्त पाहताना
आणि तुला तसे पाहताना
भान मला काहीच उरले नाही

विहरतो मुक्त केशसंभार हा
बटा  खेळती गालावरी
कसे सावरावे ओढणीला त्या 
ते तुला कळलेच  नाही

पाय रुतवुन  वाळूत उभी तू
काळजात रुतून का बसते?
प्रश्नाचे उत्तर जीवघेणे
मला कधी गवसले नाही

सूर्य गेला बघ अस्ताचली
भवताल  बघ ना अंधारला
अंधार जरी दाटला भोवती
काळजात बघ दिवे लागले

- @शांतप्रज्ञ

Thursday 26 January 2023

माणूस

माणूस....


अभिनय सुखाचा
करतात माणसे..
आभास सुखाचा
करतात माणसे

सल काटयाचा
लपवतात माणसे
तरी कशी तरी
हसतात माणसे

वठली तरी पुन्हा
रुजतात ही माणसे
भलतीच चिवट
असतात ही माणसे

बहाणे तरी किती
करतात ही माणसे
उखाणे तरी सुखाचे
घेतात ही  माणसे

संचित तरी किती
करतात ही माणसे
तरीही वंचित सुखाला
कितीतरी ही माणसे

गर्दीत माणसांच्या
किती बरे माणसे ?
मोजली तरी न मिळती
हवी तशी माणसे..

- @ प्रशांत शेलटकर
  8600583846

Tuesday 17 January 2023

ओढ तुझी

अशी ओढ तुझी
बेलाग लागते...
जशी चकोरा
चंद्राची लागते...

जशी आहेस तू
तशीच हवी मला
एकदाच चांदण्याची
मिठी हवी मला

हवेच कशाला ?
मापदंड सुंदरतेचे
मला वेडं तुझ्या
बुद्धिमत्तेचे

जसे आरशात
स्वतःला पहातो
तसेच तुला मी
माझ्यात पहातो

मन वेडे रे वेडे
ओलांडते ग रेषा
ओठांवर तेव्हा
हलकेच स्मितरेषा

हो थोडी ग धीट
बोल ग मनातले
येऊ दे ओठावर
शब्द हृदयातले

एक तुझी मिठी
इतकी घट्ट असावी
की स्पंदने हृदयाची
हृदयालाच कळावी

असे का वाटते मला
तुला शरणागत व्हावे
मिठीत तुझ्या रडावे
आणि फक्त रडावे

बोलू नयेच काही
पण हातात हात असावे
ओठ बंद तरीही
हे हृदय गात सुटावे..

❤️❤️❤️❤️❤️

-प्रशान्त

Tuesday 10 January 2023

हेट यू बट...

हेट यू बट......

आय हेट यू ...
शब्द फारच फसवे
मन अंधारले तरी
लूकलुकतात काजवे

राग राग केला तरी तो
किती लाघवी हसतो
डोळे घट्ट मिटले तरी
तोच का बरे दिसतो ?

किती पुसावे त्याला
तो क्षणात विरून जातो
पुन्हा हसत निलाजरा
तो परत फिरून येतो..

जा रे जा ना आता
किती मला छळतो ?
ज्योतीवरती का स्वतःला
जाळून तू का घेतो ?

हसणे तुझे वर वर किती
कळते रे मला कळते !
माझ्यावाचून तुझे रे
काळीज ना रे हलते !

उगाच नजर चोरून
तू भलतीकडे बघतो
ठाऊक आहे मला वेड्या
तू डोळे क्षणात टिपतो

मी ही हसते मग वरवर
पण आतून किती झुरते
कधीच कळणार नाही कुणा
मी प्रेम तुझ्यावर किती करते

मी प्रेम तुझ्यावर किती करते..

❤️❤️❤️❤️❤️

-प्रशांत शशीकांत शेलटकर
 8600583846

Friday 6 January 2023

उफ ये उर्फी..

प्रशांत शेलटकर यांची पोस्ट..


उफ ये उर्फी..


        कार मधून ती उतरते.. तिथेच घोटाळत असलेले पत्रकार (?) मॅडम मॅडम करत पुढे येतात..फटाफट फ्लॅश पडतात.. मॅडम थोडा आगे.. और आगे... हा ये ठीक है मॅडम...थँक्स मॅडम...
       ती स्माईल देते आणि निघून जाते...

बस्स एक विषय सोशल मीडियाच्या ऐरणीवर येतो..त्याविषयी माझे अल्प आकलन..

       नैतिक आणि कायदेशीर या दोन भिन्न कन्सेप्ट आहेत.त्यात सरमिसळ नाही करू शकत. उर्फी जे काही करत आहे ते बेकायदेशीर आहे का? हा प्रश्न  अनुत्तरितच रहाणार. कायद्यानुसार स्त्रीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करणे गुन्हा आहे , इथे ते वर्तन पुरुष करतो असे गृहीत धरले जाते परंतु एखाद्या स्त्रीचे वर्तन स्त्री च्या मनात लज्जा उत्पन्न करते का? या मुद्द्यावर चित्रा वाघ न्यायालयात जाऊ शकतील का हा मुद्दा पण रंजक ठरेल. 
    संविधानाने दिलेले आचार स्वातंत्र्य या मुद्द्यावर उर्फी आपल्या वर्तनाचे समर्थन करू शकते. कोणी कोणते कपडे घालावेत हे अन्य कोणी दुसरे ठरवू शकत नाहीत . मुळात कोणते कपडे परिधान करावेत निदान यात अल्प का होईना कपडे परिधान करणे हे गृहीत आहे. मग न्यूड क्लब चे काय करणार?
    दुसरा मुद्दा नैतिकतेचा, सर्व साधारणपणे एका विशिष्ट समूहात ज्या कृतीला सार्वत्रिक मान्यता असते ती कृती नैतिक मानली जाते.त्यामुळे नैतिकता नेहमीच समूह सापेक्ष असते. या समूहाच्या व्याख्येत जात,जमात, पंथ ,धर्म ,देश अशी अनेक वर्तुळे समाविष्ट असतात. काही आदिवासी समाजातील स्त्रिया फक्त कटीवस्त्र परिधान करतात . नागर संस्कृतीत पूर्ण वेष परिधान केला जातो, मुस्लिम समाजात बुरखा अपरिहार्य असतो.त्यामुळे वेशभूषेतील नैतिकता नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडते. 
    आणखी एक मुद्दा लैंगिकतेचा..प्रत्येकाच्या लैंगिक भावनेचा उत्कलन बिंदू वेगवेगळा असतो. त्यामुळे कपडे किती आहेत ?कसे आहेत?किंवा नाहीच आहेत या बाबी प्रत्येकासाठी वेगळा इफेक्ट करतात. त्यामुळे सरसकट एकच न्याय सर्वाना लावता येत नाही. त्यातही लैंगिक भावना तीन प्रकारे नियंत्रित होतात. दमन, संयमन आणि शमन ..आणि हे पुन्हा व्यक्तीसापेक्ष असते.आणि नैसर्गिक असते. त्यामुळे स्त्रीचे आचार स्वातंत्र्य आणि पुरुषाचे लैंगिक भावनेवरील नियंत्रण या दोन बाबीमध्ये कधी समन्वय तर कधी संघर्ष असतो.
     फॅशन च्या अंगाने पाहिलं तरी एक फॅशन काही वर्षानंतर परत येते.नवीन ट्रेंड जुना होतो काही वर्षांनी परत तोच येतो .सांस्कृतिक अंगाने पाहिले तरी मुक्तता-बंधन-मुक्तता हे चक्र चालू रहाते. नैतिकतेचे जुने निकष जातात नवीन येतात..तेही जातात परत जुने निकष नवीन रूप घेऊन येतात..चक्र चालू रहाते...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Monday 2 January 2023

ज्या अर्थी...

ज्याअर्थी....


शासन निर्णय ( जी .आर.) इतके किचकट आणि दुर्बोध असतात की ते वाचून पूर्ण झाले की एकच गोष्ट आपल्याला कळते की आपल्याला काही घंटा कळलेले नाही...
    कायदेविषयक लेखा वाचून बघा..
    ज्या अर्थी... अमुक तमुक इथपासून जी सुरवात होते ते पान /दोन पान ज्याअर्थीच पसरलेले असते..मग कुठे तरी शेवटी " त्या अर्थी" लपून बसलेले असते...ज्याअर्थीची अनेक मायाजाले पार केल्यावर त्या कागदाचा प्राण असलेला " त्याअर्थी" चा पोपट शेवटच्या परिच्छेदाच्या पिंजऱ्यात बंद असतो.. पण तिथे पोहचेपर्यंत मतीने माती खाल्लेली असते..
     माणसाने खाण्यापासून शौचापर्यन्त सगळं काही "सुलभ" केलंय पण कायदा सुलभ करणे त्याला जमलेले नाही.क्लिष्टता हा कायद्याचा प्राण आहे. कायद्याचा एक आणि एकच अर्थ लागावा म्हणून क्लिष्टता अपरिहार्य असली पाहिजे..तो क्लिष्ट आहे म्हणून तर अनेकांचे उदरनिर्वाह चालतात ना..
     लोक पण किती नाटकी असतात ना कायदा समजत नाही म्हणून त्याला गाढव करून मोकळे झाले ,खरं तर आपल्याला कायदा समजत नाही म्हणजे आपणच गाढव असतो पण नावडतीचे मीठ अळणी तसा कायदा पण गाढवच..
     माणसातला सुसंवाद संपला की वादी आणि प्रतिवादी तयार होतात.. लांबत जाणारा दिवाणी खटला पाहून फिर्यादी " ऐसी " दिवाणगी" देखी नही कभी" अस म्हणत असेल का? मुळात खटला हा शब्द कसा निर्माण झाला असेल?? माणसाचा जन्म खाटल्यावर होतो आणि शेवटही खाटल्या वर होतो..खटला असा आयुष्य भर चालत रहातो म्हणून तर त्याला " खटला" म्हणत नसावेत ना...
    पहिल्या वाचनात शासन निर्णय समजला तर तो जी आर तयार करणाऱ्याना म्हणे देह दंड होतो...म्हणून तो दुर्बोध असावा असा नियम आहे म्हणतात. बरं जी आर येताना संदर्भाचे भालदार चोपदार सोबत घेऊन येतो... बर जी आर च्या शेवटी मानकरी असतातच..
    मला तर जी आर वाचताना लग्नपत्रिकेचा भास होतो. नवरा नवरीची नावे सोडली तर ज्यांना प्रति द्यायच्या आहेत त्यांची नावे..मुलीचा मामा, मुलीचा काका अशी वाटतात . आणि शेवटची कार्यालयिन नस्ती वगैरे तर आमच्या ताईंच्या लग्नाला यायचं हं या प्रकारातली वाटते...
     ज्या अर्थी... 
     जि आर हे फार अगम्य असतात 
     त्या अर्थी ते वाचण्यासाठी नसतात.
     ते फाईलला लावून ठेवण्यासाठीच असतात

- प्रशांत शेलटकर
   8600583846

बखर

© प्रशांत शेलटकर यांची पोस्ट.

इतिहास जेवढा वाचाल तितके अधिक गोंधळात पडाल...एक पुस्तक वाचलं की बरोबर त्याच्या विरोधी विचाराचे दुसरे पुस्तक निघते.ते वाचले की त्याचे म्हणणे खोडून टाकणारे तिसरेच निघते. सत्य लपाछपी खेळत बसते. त्याचा शोध घेणे दमछाक ठरते. मग आपण थकतो.जे आपल्याला सोयीचे असतं, जे आवडत , ते आपण स्वीकारतो. द्विधा अवस्था माणसाला फार सोसत नाही. एक कळप तर पकडावाच लागतो.तो जे काही सांगतो तेच सत्य मानावे लागते.बघता बघता आपला झोंबी होतो. 
      तर्कनिष्ठ असणे सोपे नसते.इतिहास वाचताना तर ते जास्त गरजेचे असते. एखादी घटना जशी आहे तशी मांडणे बखरकाराना जमले असेल असे वाटत नाही. स्वतंत्र पणे बखर लेखन करणारे दुर्मिळ असावेत.राजाचे दरबारी बखरकार थोडेच तटस्थ लिहिणार? शिवाय त्या त्या बखरकारांची बौद्धिक क्षमता,आकलन क्षमता, त्यांचे पूर्वग्रह त्यांच्या लेखनावर परिणाम करणारच.मग त्यातल्या आपल्या मतांचे परिपोष होईल अशाच बखरकारांचे वाचन करून अर्वाचीन काळात पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांचे लिखाण सत्याला धरून कितपत असेल. दुर्दैवाने ब्लॅक अँड व्हाइट पद्धतीने लिहिणारे लेखक आज लोकप्रिय होताना दिसत आहेत. आपल्या " मनातले "लिहिणारे लोकप्रिय होतात. मग असत्य वेगाने प्रस्थापित होते.
     
   इतिहास ही दुरून तटस्थपणे पहाण्याची ,अभ्यासण्याची गोष्ट आहे.फार जवळ गेलं तर झपाटते लांब गेलं की थोडी फार समजते. माणसाला आपल्या पूर्वसूरींशी इतकं का कनेक्ट रहाव वाटत हा परत मानसशास्त्राचा विषय...

- प्रशांत शेलटकर
  8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...