Ad

Tuesday 28 August 2018

माझं रितेपण

हल्ली मी फारसा,
माणसांत रमत नाही
का कोण जाणे पण
गर्दीत मला गमत नाही...

गर्दीला मुड्स असतात
अन मुखवटे पण....
गच्च भरलेल्या गर्दीलाही
असतं एक रितेपण...
हे रितेपण मला पेलत नाही
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही....

त्यापेक्षा पुस्तकं बरी
ती मनसोक्त बोलतात ..
शब्दांच्या पारंब्यांवर
अक्षरे छान झुलतात...
माणसांसारखी अक्षरे येथे
रंग कधी बदलत नाहीत..
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही....

इथे कविता प्रेयसीसारखीच
कधी कधी लाजते...
कधी कधी मर्दानीसारखी
तू फक्त लढ म्हणते....
तिच्यासारखं निर्व्याज प्रेम
हल्ली कुणी करत नाही
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही......

माणसांची नसली तरी
सुरांची गर्दी आवडते
हरवलेली लय मला त्यात
अलगदपणे सापडते...
आपल्याच माणसांशी लय
काही केल्या जुळत नाही
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही.....

सुरांचं एक बरं असतं...
"सा"असतो "सा"च्याच जागी
अन "रे"असतो "रे" च्या जागी
दुसऱ्याला इतकं जपायचं
माणसांना कधी जमत नाही
म्हणूनच मी हल्ली फारसा
माणसात रमत नाही....
का कोण जाणे पण,
गर्दीत मला गमत नाहीं....

-प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday 25 August 2018

साजणी

डोईवर पदर अन
पदरात चेहरा....
नजरेत लपला ग
लाजेचा पहारा...

तू अशी लाजरी
जणू लावण्याची खणी
वाट बघे सजनाची
जशी आतुर सजणी

ओठात रुतला ग
रंग जास्वंदी लाल
कुणासाठी रंगले ग
तुझे गुलाबी ग गाल

अशी दिसते ग तू
जणू स्वर्गीची अप्सरा
नजर लागू नये माझीच
माझा जीव होई बावरा

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Friday 24 August 2018

दूरदेशी गेलीस तू...

दूरदेशी गेलीस तू...
झाले फुलांना हुंदके अनावर...
पापण्यांना फुटले पाझर अन्
काळजात दाटे गहिवर..

दूरदेशी गेलीस तू....
आठवणींचा उठला कल्लोळ.
क्षण भासे युगासम अन्
जणू थिजून गेला काळ...

दूरदेशी गेलीस तू...
झाली पोरकी ग रात..
कुठे हरवून गेली ग
ती धुंद चांदणरात..

-प्रशांत शेलटकर....

Thursday 23 August 2018

ती गेली तेव्हापासून

काही विशेष असं ....
आजकाल  काही घडत नाही
आणि आजकाल कुणासाठी
डोळे भरून येत नाही...

ती गेली तेव्हापासून,
कुणाला लळा लागलाच नाही
ती गेल्यापासून कुणासाठी
दाटून गळा आलाच नाही...

ती होती तिच्यासारखीच
दुसरी कोणी शक्यच नाही
तिच्या अनवट मिठीची सर
अप्सरेला पण येणार नाही

फुलं वेचली तिथे आता
गोवऱ्या कधी वेचणार नाही
जे केलं तिच्यावर दिलसे..
प्रेम कुणावर करणार नाही

ती इतकं काही बोलून गेली...
आता कुणाच ऐकवत नाही
आता कुणाच्या लव यु साठी
माझ्या मनात जागा नाही...

-प्रशांत शेलटकर
8600583846

Wednesday 22 August 2018

खरं प्रेम

खरं प्रेम,

बरसणा-या पावसात ...
ओंजळ धरून उभी रहा..
ओंजळीतले  पावसाचे पिल्लू पहा
खरं प्रेम असंच असतं..
विशुध्द आणि सात्विक.....

तशीच चालंत रहा ..
मऊ ओल्या गवतावरून...
निसर्गाची रंगपंचमी चालू असेलच..
पण दूर कुठेतरी कोप-यात ..
फुललं असेल एखाद रानफूल..
खरं प्रेम असंच असतं ...
अव्यक्त आणि अबोल ...

तशीच चालंत रहा ....
दूरवरच्या मंदीरातून ऐकू येतायत
किर्तनाचे अवीट सूर...
मंदिरापाशी थांब..दिव्यांची आरास पहा,
महाद्वारापासून गाभा-यापर्यंत ...
सर्व काही प्रकाशाने भारलेले असेल
आता समईच्या प्रकाशात तेजाळलेला
राधेचा चेहरा बघ .....
खरं प्रेम असंच असतं
तेजोमय आणि सात्विक....

अग प्रेम असंच असतं
खरंच प्रेम असंच असतं.....

-प्रशांत शेलटकर

Saturday 18 August 2018

तू

मी मोकाट मुक्तछंद
तू गझल वृत्तात बांधलेली
मी शब्दांचा केवळ पसारा
तू कविता छान गुंफलेली

मी  पाऊस सैरावैरा
तू अलवार श्रावण धारा
मी कायम विस्कटलेला
तू फुललेला मोरपिसारा

मी रखरखीत दुपार
तू नाजूक सोनसकाळ
मी शब्दांची मोडतोड
तू सरस्वतीचे बाळ...

मी अक्षरांचा गुलाम
तू अक्षरांची स्वामिनी
मी मिणमिणती ज्योत
तू लखलखती सौदामिनी

मी मागतो माझ्यापुरते
तू मागतेस पसायदान
मी तुझाच ग अनुगामी
तू देतेस मला शब्दभान

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

उधार चांदणं

तु उगाचच चार-पाच चंद्र
ठेवले आहेस तरंगत...
अगदी तुझ्या सुरक्षित कक्षेत..
मिळाव प्रत्येकाकडूनच,
हक्काचं उधार चांदण म्हणून..

ते ही बिचारे फिरत आहेत,
तुझ्या मायावी कक्षेत...
कधीतरी तुझ्या कुशीत,
त्यांचं अस्तित्व मिटवण्यासाठी

पण माझं ऐक....
केव्हातरी संपेल तुझं,
मायावी गुरुत्वाकर्षण...
आणि कक्षेत असलेले तुझे
चार-पाच चंद्र ...
जातील अवकाशात दूरवर..

आणि मग एका कातर क्षणी
तू शोधत फिरशील
तुझ्या हक्काचा एखादा चंद्र
अवकाशाच्या अथांग अफाट
अनंत निर्वात पोकळीत....
मिळतो का पाहशील,
एखादा चंद्रकवडसा कारण
अंधाराची तुला सवयच नाही..

म्हणून सांगतो माझं ऐक...
हक्काच्या चंद्राकडून,
हक्काचं चांदणं घे...
हक्काच्या चंद्रालाच
तुझ्या कुशीत घे....

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

Tuesday 14 August 2018

बळीराजा

आटे आभाळाची माया
काय करी काळी माय?
आला दुष्काळाचा फेरा
सारं रान जळून जाय...

किती हौसेनं पेरलं
हिरवं  सपानं वावरात
दिला आभाळानं दगा
धनी झुरतो मनात...

हात जोडते कारभारी
वंगाळ करू नका बाई
शिरप्या टांगून हो गेला
त्याला मरणाची घाई

धनी जातील हो बघा
लई वंगाळ हे दिस..
पेरा करू हो पुन्हा
येतील सुखाचे हो दिस

कधी थकला ना संपला
खरा राजा बळीराजा
रक्ता घामाचा करू पेरा
धनी माझा बळीराजा...

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Friday 10 August 2018

स्मृती

स्मृती

आठवते अजून मला
तुझी प्रगाढ मिठी
अन स्मरते अजूनही
तुझी भरलेली दिठी..

सरले कित्येक दिवस
सरल्या कित्येक रात्री
अजून तुझ्या चुंबनांचा
थरार उरला गात्री....

तुज मिठीत घेता सखे
आभाळ कवेत आले...
बकुळीचा सुगंध लेऊनी
हे श्वास चांदण्याचे झाले

चेहरा म्हणू की चंद्र हा
की ओंजळीत आनंद ठेवा
ओठांनीच तुझ्या ओठांचा
मधुरस हलकेच टिपावा..

जरी दूरदेशी असशी तू
मज स्मरते  ती लाघववेळ
पापण्यात दाटून येतेस तू
गाली आसवांचे ओघोळ...

-प्रशांत शेलटकर
  गोळप
  8600583846

Wednesday 8 August 2018

पूर्णविराम

"पूर्णविराम'

आयुष्य वाचताना...
एक गोष्ट जाणवत गेली...
आयुष्य नावाच्या  डायरीत
फक्त प्रश्नचिन्हांची गर्दी दिसली
मी आयुष्याला अन,
आयुष्याने  मला  विचारलेले
अगणित  असंख्य प्रश्न...

कुणीच कसं भेटलंच नाही
ज्याला "अवतारणात" बसवावं
मनातलं सर्व सांगावं...
आणि कधी घ्यावा ..
"स्वल्प विराम " त्याचे सोबत

आयुष्य अखंड धावत राहिले
अक्षरांला अक्षरे अन
शब्दांला शब्द जोडत राहिले
काना-मात्रा वेलांटीचे नियम 
कसोशीने पाळत राहिले          
पण या साऱ्या जंजाळात
आयुष्य वाचायचे मात्र...
राहूनच गेले....

आता मात्र एक करणार आहे
प्रत्येक अक्षर जगणार आहे
कोण जाणे कधी आयुष्याचा
"पूर्णविराम" असणार आहे.

-प्रशांत शेलटकर
  8600583846

.

Friday 3 August 2018

आयुष्य अजून छान आहे..

आयुष्य अजून छान आहे...

पेला अर्धा सरला तरी
अजून अर्धा भरला आहे
काट्याने भरली वाट तरी
आयुष्य अजून छान आहे...

अजून तिच्या नजरेमध्ये
लाजेचा पहारा आहे...
अजून तिच्या मिठीमध्ये
तोच उबदार सहारा आहे
म्हणूनच म्हणतो..मित्रा
आयुष्य अजून छान आहे..

वेदनांचा कल्लोळ  तरी
संवेदना अजून तीच आहे..
शब्द जरी मुके झाले...
मौन बोलके तेच आहे...
म्हणूनच म्हणतो मित्रा
आयुष्य अजून छान आहे

---प्रशांत शेलटकर

आरसा

आरसा...

आजकाल ...
आरशासमोर उभं राहणं ,
नकोसं झालंय...
आपलं भलतंच खरं रूप बघून
जगणंच नकोसं झालंय...

सवय नाही ना आजकाल
स्वतःलाच स्वतःकडे पहायची
मुखवट्याच्या अलीकडचा मी
हिमतीने पहायची....
म्हणूनच आजकाल ...
आरशासमोर उभं राहणं ,
नकोसं झालंय,
आपलं भलतंच खरं रूप बघून
जगणंच नकोसं झालंय...

तू किती छान ,तू किती सुंदर...
तुझ्यासारखा तूच कलंदर
आरसा असं काही ...
म्हणतच नाही,  अन्..
चेहरा माझा दाखवताना
दया माया दाखवत नाही..
म्हणूनच आजकाल ...
आरशासमोर उभं राहणं ,
नकोसं झालंय...
आपलं भलतंच खरं रूप बघून
जगणंच नकोसं झालंय...

परवा आरशाला,
चक्क request केली..
म्हणालो जरा बरी...
छबी दाखव माझी...
सुखी समाधानी अन आनंदी
तुसडेपणाने एवढेच म्हणाला
खोटेपणा करायला ..
मी काही डीपी नाही
माझी मैत्री इतकी सोपी नाही
म्हणूनच आजकाल ...
आरशासमोर उभं राहणं ,
नकोसं झालंय...
आपलं भलतंच खरं रूप बघून
जगणंच नकोसं झालंय...

म्हणूनच मी आजकाल
आरशाकडे फिरकत नाही
खोटा डीपी असला तरी
माझी काही हरकत नाही
नाइस,ऑसम, आणि क्युट
आरसा असं काही म्हणतच नाही...म्हणूनच...
आणि म्हणूनच आजकाल ...
आरशासमोर उभं राहणं ,
नकोसं झालंय...
आपलं भलतंच खरं रूप बघून
जगणंच नकोसं झालंय...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  गोळप, रत्नागिरी
  8600583846

Thursday 2 August 2018

देव बसला रुसून

देवघराच्या कोपऱ्यात
देव बसला रुसून....
कोणीच पहात नव्हतं तेव्हा
डोळे घेतले पुसून..

मी म्हणालो का रे देवा
बसलास असा रुसून
तुझं भजन म्हणतो ना
तुझ्यासमोर बसून

तुझ्यासाठी देवा बघ
काय काय केलं...
सागवानी देव्हाऱ्यात तुला
सिंहासनी बसवलं..

तुझ्यासाठी देवा बघ
किती फुले आणली
सोन्या चांदीची देवा
आरास बघ केली

तुझ्यासाठी देवा बघ
पंचपक्वान्न केले...
शुद्ध तुपाचे देवा
निरंजन लावले...

तरी देवा असा कसा
तू बसतोस रुसून...
आशीर्वाद दे ना रे
गालात जरा हसून

देव म्हणे मग मला
देव तुला कळला नाही
पेढ्यांची लाच घायला
मी भ्रष्ट झालो नाही

दीन झाले आईबाबा
त्यांना जरा बघ...
अरे वेड्या त्याच आहे
तुझ्या पुरतंच जग...

भजने माझी गातोस रे
किती किती सुंदर...
जाणून घेतले आहेस का रे
माता-पित्याचे अंतर...

माझ्याशी बोलण्यापेक्षा
त्यांच्याशी तू बोल...
त्यांच्याविना माझी भक्ती
शून्य आणि फोल....

म्हातारपण असत बाळा
दुसरं लहानपण...
किती समजून घेतलं तुला
आठव तुझं बालपण...

देव देव करतोस वेड्या
असा मी भेटेन का...
आई बाबा जर उपाशी
मी तुपाशी खाईन का

देव असा बोलला मला
डोळ्यात त्यांने घातले अंजन
दाटून आले अश्रू नयनी
धूसर झाले निरंजन...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  रत्नागिरी
  8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...