Ad

Monday 28 June 2021

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

हे विश्व निर्माण होण्याचे कारण म्हणजे बिगबँग हे आज पर्यंत सर्वात मान्य असलेले कारण.. बिगबँग झाला आणि विश्व निर्माण झाले अस सांगितलं जातं पण तो का झाला? हे अजून कळलं नाही..भविष्यात कदाचित कळेलही..एका तासाच्या (की मिनिटाच्या?) परिमाणात विश्वनिर्मितीचा इतिहास सांगितला जातो.पण त्यातही चार सेकंदापर्यंत जाता येते..पण पाहिले चार सेकंद काय झाले हे सांगता येत नाही.. काळाच्या पुढे अजून एखादी मिती  भविष्यात सिद्ध झाली तर कदाचित बिगबँग पासून पहिल्या चार सेकंदात काय घडले ते विज्ञान शोधून काढेल कदाचित...
      पण आपण एकवेळ गृहीत धरू की बिगबँग मुळे विश्व निर्माण झालं. तरी त्या क्षणापासून ते आजच्या क्षणापर्यंतचा प्रवास अनेक गूढ प्रश्न निर्माण करतो. अर्थात मला तस वाटतं. मी कोणतंही स्टेटमेंट अगदी फर्म करीत नाहीये..लहान मुलाच्या औत्सुक्याने मला ते प्रश्न पडले आहेत..
     बिगबँग झाला. त्यातून अनंत सूर्य निर्माण झाले,त्याच्या अनंत सूर्यमाला निर्माण झाल्या..आपलीही त्यातून निर्माण झाली. आपल्या सूर्याचे ग्रह एकमेकांशी टक्कर न घेता  सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरू लागले. त्यातील काही स्वतःचे उपग्रह स्वतःभोवती फिरवत राहिले. गुरुत्वाकर्षण नावाची अचाट शक्तीने या ग्रह उपग्रहांच्या कक्षा अशा काही ठरवून दिल्यात की ते आपली मर्यादा इंचभरही सोडत नाहीत.
हे एक गूढ....
      सूर्यापासून विशिष्ट अंतरावर एक ग्रह फिरत रहावा. आणि त्या विशिष्ट अंतरामुळेच त्याच्यावर जीवसृष्टी निर्माण व्हावी 
हे आणखी एक गूढ...
     आपली पृथ्वी सूर्यापासून विशिष्ट अंतरावर परिभ्रमण करत  स्वतःभोवती फिरत राहिली..फिरता फिरता थंड झाली..बरं फिरताना ती परफेक्ट गोल फिरत नाही ती उत्तर-दक्षिण थोडी कलली...तिचा आस थोडा कलला म्हणून पृथ्वीवर ऋतुचक्र निर्माण झाले, उन्हाळा आणि हिवाळा यामुळे पृथ्वीचे वातावरण "बॅलन्स" झाले ..पावसाळा हे उन्हाळ्याचे "बायप्रॉडक्ट" आहे.
 ऋतुचक निर्माण झाले म्हणून जीव निर्माण होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले हे पण एक गूढच...
     पहिला जीव निर्माण झाला,वनस्पती निर्माण झाल्या, पाण्यातील काही जीव पाण्यातच राहिले,त्यातले काही जमिनीवर आले, त्यातले काही जमिनीवर राहिले आणि काही आकाशात उडू लागले. 
      मूळ जीवामध्ये कदाचित टिकून राहण्याच्या प्रेरणेने जनुकीय बदल होत गेले, त्यामुळे काही जीव जमिनीवर राहू लागले त्याना जमिनिवर चालण्यासाठी पाय फुटले, असंख्य पायांच्या गोमी पासून चार पायांच्या वाघ,सिंह,वानर या सारख्या प्राण्यांपर्यंत असंख्य प्राणी निर्माण झाले. त्यातल्या काही प्राण्यांना जमिनीवर असुरक्षित वाटायला लागले,त्यांना पंख फुटले ते आकाशात उडायला लागले.त्याना पक्षी म्हणून ओळखल जाऊ लागलं.पुढे आदिमानव निर्माण झाला. पुढच्या दोन पायांचे रूपांतर हातात झाले..असे म्हणतात की माणसाच्या हाताच्या पंजात अंगठयाचे जे वेगळे स्थान आहे त्यामुळे माणसाने पुढची प्रगती फार झपाटयाने केली.माणसाचा अंगठा इतर प्राण्यांच्या तुलनेत गोल फिरू शकतो त्यामुळे कोणत्याही वस्तूवरची पकड अधिक मजबूत झाली.मला तर अस वाटत की या अंगठयाने माणसाला प्रचंड आत्मविश्वास दिला. स्वतःचे संरक्षण आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी तो अंगठयांच्या अद्वितीय स्थानामुळे तो करू शकला.

भाग -1

-प्रशांत शेलटकर
8600583846
 29/06/2021

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...