मी म्हणालो देवाला...
तू असं का रे वागतोस
जे हवं आहे ते न देता
भलतंच काही देतोस..
देव म्हणाला मला
तू तरी काय करतोस
हवं ते दिल तर....
मलाच विसरून जातोस
परीक्षा, लग्न आणि नोकरी
यावेळीच मी आठवतो....
कधी व्हावं मूल म्हणून
तू माझ्या दारी रडतो....
कधी तरी येते दया
शेवटी मी देव आहे ना
देतो तुला हवे ते...
म्हणून तू मला भजतो ना ?
अरे अरे माणसा..
एवढही तुला कळेना..
चटक्या शिवाय भाकर
कधीच कुणाला मिळेना..
रोज रोज गोड मिठाई
सांग कधी खाशील का?
मिठा शिवाय अन्नाला
चव कधी लागेल का?
मानलसं जर देव मला
तर मी देव आहे..
नाही मानलस तर ...
मी फक्त दगड आहे..
सुख आणि दुःख फक्त
कल्पनेचा खेळ आहे..
स्वीकारलंस जर हे सत्य
तर आयुष्याला मेळ आहे..
मी म्हणालो देवाला...
आता मी मागणार नाही
तुझ्या दरबारात आता
कसली तक्रार करणार नाही
देव म्हणाला टाळी देऊन
आता कसं बोललास...
माझ्यावरचा भार मात्र
एकाने तरी कमी केलास..
मला बाय बाय करून
देव गेला देवळात...
देहाचेच देऊळ झालं
त्या सुगंधी क्षणात...
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment