Ad

Tuesday 17 September 2024

सुवर्णमध्य

सुवर्णमध्य....

भावना घालते पसारा
बुद्धी घालते आवर
क्षणोक्षणी डोळे ओले
बुद्धी म्हणते सावर..

जस आहे जिथे आहे
तेच दिसते बुद्धीला
आकाश जणू ठेंगणे
भावनेच्या कल्पनेला

भावनेला फक्त हृदय
मेंदू फक्त बुद्धीला
दोन टोकावर दोघीजणी
आपल्या जागी अडलेल्या

आस्वाद घेऊन छान जगावे
भावना म्हणते बुद्धीला
लॉजिक लावून सावध जगावे
बुद्धी म्हणते भावनेला..

दोघाचे असे वाद होताना
विवेक मात्र शांत असतो
एकेक पाऊल मागे घ्या
दोघींनाही तो विनवतो

भावना बुद्धी दोन्ही हव्यात
आयुष्य हे जगताना..
कुठे थांबायचं कळलं पाहिजे
मार्ग आपले चालताना

का? कसे? केव्हा ? कधी
बुद्धी मांडते याचेच लॉजिक
भावना म्हणते बुद्धीला
आनंदाची अनुभव मॅजिक

थकून जेव्हा दोघी जाती
तेव्हा विवेक येतो कामी
तारतम्य असावे जगताना
नकोच नुसते मी मी..

डावं उजवं दोन्ही टाळू
एक असावा सुवर्णमध्य
मेंदूत जरी असले लॉजिक
हृदयाने गावे पद्य....

-© प्रशांत..

No comments:

Post a Comment

इथे पुन्हा जन्म नको..

इथे पुन्हा जन्म नको..  सत्कार सोहळा चालू असतो..स्टेजवर दांभिक माणसं बसलेली असतात..आपल्याला माहीत असतं की हे सगळे चोर आहेत..तरी देखील आपण हात...